कवी नैनेश तांबे यांच्या ‘या शहरानं दिलेलं रिटर्न गिफ्ट’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर नैनेश तांबे यांच्या आई-वडिलांच्या शुभहस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. हा क्षण उपस्थितांसाठी विशेष भावनिक आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नितीन शिंदे यांनी पुस्तकाचा प्रवास, त्यामागील भावना आणि नैनेश यांच्या काव्यलेखनाविषयी अत्यंत समर्पक भाष्य केले. प्रकाशक म्हणून मनोगत व्यक्त करताना. अमृता तांदळे मॅडम यांनी पुस्तकनिर्मितीची प्रक्रिया, प्रकाशकाच्या दृष्टीने या संग्रहाचे महत्त्व आणि या पुस्तकामागील साहित्यिक मूल्य याविषयी आपले विचार मांडले.
नैनेश यांचे जवळचे मित्र आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अपूर्व राजपूत यांनी नैनेश यांच्या कवितांचा, त्यांच्या दीर्घ मैत्रीचा आणि एकूणच समकालीन काव्यविश्वाचा वेध घेतला. आजच्या काळात नैनेश यांची कविता का महत्त्वाची आहे, तिच्यातील प्रामाणिकपणा आणि माणसांशी जोडून घेण्याची ताकद याविषयी त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यातील सर्वाधिक भावनिक क्षणांपैकी एक क्षण म्हणजे नैनेश यांचे वडील संतोष तांबे यांचे मनोगत. उपस्थित मान्यवरांचे आणि रसिकांचे आभार मानताना मुलाविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेले.









