(तहसीलदार)

पुढे जे काही लिहिणार आहे मीसुद्धा त्याचाच एक भाग आहे. मी यापेक्षा वेगळा आहे असे अजिबात नाही. व्यक्त होताना भावनेला शब्दांचा आधार घ्यावा लागतो. कधीकधी भावनेला शब्द सापडत नाहीत मग ते अश्रू, क्रोध, नैराश्य, शांतता या रूपाने बाहेर पडतात. पण कधीकधी भावनांना बाहेर येण्यास पोषक वातावरण नसल्याने ते आपण आपल्या आतमध्ये दाबून ठेवतो. यामुळे आपला श्वास कोंडतो. एकट्यात आपण त्या भावनांशी अनेक वेळा संवाद साधत असतो. ते आपल्याला सोडत नसतात. त्यांच्याशी निगडित काहीही घडले की त्या उफाळून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांना योग्य मार्ग सापडला तरच ते खळाळत बाहेर पडतात. आणि तो योग्य मार्ग सापडत नाही तोपर्यंत आपण भावनांचा हा नाजूक विषय काळजीपूर्वक सांभाळायचा असतो. याच भावना व्यक्त करण्याविषयी काही अनुभव आले.

तर व्यक्त होणे हे नेहमीच समाधानकारक असते असे नाही. मुळात नेहमीच व्यक्त व्हायला पाहिजे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. व्यक्त होणे ही साधी गोष्ट नाही. पण आपण त्याला मर्यादा नाही घातल्या तर ती एवढी साधी गोष्ट होऊन जाते की आपल्या व्यक्त होण्याला कोणी प्रतिसाद देत नाही किंबहुना ती इतरांना डोकेदुखी वाटू शकते. त्यामुळे वेळीच स्वतःला आवरलेले चांगले! आपल्या भावना आपल्यासाठी अमुल्य असतात पण आपण ज्या व्यक्तीसमोर त्या व्यक्त करणार आहोत त्यांच्या नजरेत आपले मूल्य जाणणे पण तितकेच महत्वाचे.

कोणापुढे व्यक्त व्हावे याचे पण काही एक गणित असते. 2-4 भेटीत अथवा काहीवेळा तर पहिल्याच भेटीत ओळख झालेल्या व्यक्तीसमोर आपण आपल्या भावना मोकळ्या करून टाकल्या तर त्यांच्या मैत्रीच्या बेराजेतून आपण वजा झालो म्हणून समजायचे !

पण काही वेळा एखाद्या व्यक्तीला आपण खूप जवळची समजतो. आपण त्यांना ओळखतो असे वाटते. मग आपण आपल्या मनातील निखळ भावना जशास तशा व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. पण ते हास्यास्पद ठरू शकते. याला कारण आहे. त्या व्यक्तीच्या जीवनात असणाऱ्या priorities, आपले त्यांच्या जीवनात असणारे महत्व, आपली त्यांच्याशी जुळणारी tuning, त्या व्यक्तीकडे आपल्यासाठी असलेला वेळ, इत्यादी गोष्टींची चाळणी लावून ती व्यक्ती आपल्या व्यक्त होण्याकडे पाहत असते. त्यामुळे आपल्याला वाटलं म्हणून आपण व्यक्त होणे चालू करण्याऐवजी समोरच्याचा प्रतिसाद पाहून व्यक्त झालं तर त्या व्यक्त होण्याला एक अर्थ आहे. आणि व्यक्त होण्याणे मिळणारा आनंद असेल, समाधान असेल, मोकळा श्वास असेल त्याचे आपण पूर्ण हक्कदार होतो. नसेल तर ओझे कमी करण्याच्या प्रयत्नात व्यक्त होऊन चूक केली याचे ओझे वाढून बसते !

व्यक्त करताना व्यक्ती इतकेच महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे वेळ. आता जग खूपच ‘फास्ट’ झालं आहे. पूर्वीसारखे तासंतास गप्पा मारणे दुरापास्त होत चालले आहे. त्यामुळे जे वाटतेय ते अचूक आणि कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य विकसित करणे काळाची गरज आहे. समोरच्या व्यक्तीच्या वेळेची आपण कदर केली तर ती व्यक्ती आपल्या व्यक्त होण्याची नक्कीच कदर करेल. तसेही खूपच वेळ बोललो तर नक्की कोणती गोष्ट महत्वाची होती हे ठरवणे पण अवघड होऊन जाते! जास्त बोलण्याने आपले महत्व कमी होते असे बहुतांश लोक मानतात (वादाचा मुद्दा आहे).

व्यक्त व्हा, पण जपून, मास्क लावून..!
– योगेश नागनाथराव टोंपे.
Tyogesh.s@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us