Ravan : Raja rakshancha (रावण)

450

Availability: 91 in stock

SKU: 9788193446812 Category: Tag:

रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान, वेदपंडीत, कट्टर शिवभक्त अशा लंकेच्या राजाची कथा आहे. आजवरची पुराणे, कथा, साहित्य, कला यामधून रावणाला दुर्गुणी आणि अवगुणी प्रवृत्तीचे प्रतिक बनवलं गेलं. परंतु याच रावणाने रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडव स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती केली. एवढा विद्वान कित्तेक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला? सर्व देवांना पराभूत करणारा, सर्व दैत्य, दानव, असुर आणि कित्तेक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी कादंबरी, रावण राजा राक्षसांचा.

रावणाने बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावणसंहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्तोत्र, यातून ज्ञानाच्या नवीन कक्षा रुंदावल्या. दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून त्याने राक्षस संस्कृतीचा पाया रचला. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद, इत्यादी सारख्या अनेक विषयात पांडित्य मिळवूनही रावणाला खलनायक ठरवून रावणाची कायम उपेक्षाच केली गेली. अवहेलनेच्या फेऱ्यात गुरफटलेल्या त्याच्या आयुष्याचं सार वाईट विशेषणांची बरसात करत मांडलं गेलं. आजही हजारो वर्षांपासून रावण दहनाचा सोहळा आनंदाने साजरा केला जातो. विध्वंस हा कधीच चांगला नसतो, हे माहीत असूनही रक्ताच्या नात्यांसाठी रक्तचंदन कपाळी घ्यावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि वेळ पडली तर तत्वांसाठी मरावं आणि मारावही लागतं.

रावणाच्या आयुष्यात घडलेल्या घटना, आलेली अनपेक्षित वादळं, त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वतःच्या हिमतीवर तो लंकाधिपती झाला. इतर राजांसारखी त्याने एकट्याने सुखं उपभोगली नाहीत. त्याची जनताही सोन्याच्या घरात राहत होती. हजारो वर्षांपासून अनुत्तरीत असलेल्या रावणाच्या वैयक्तिक आयुष्याचा, व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा घेतला का कधी? त्याचे आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी आणि चित्तथरारक कर्तृत्वाने भारलेलं आहे. रावणाने स्वतःच्या बळावर सर्व देवांना पराभूत केलं होतं.

रावणाला न जाणता त्याची प्रतिमा जाळणाऱ्या लोकांच्या अज्ञानाची कीव येते. सीतेचे अपहरण केल्याचा दोष देताना रावणाने तिची विटंबना केली नाही, हे लोक का विसरतात?

कादंबरी वाचा आणि ठरवा… रावण खरोखरच खलनायक होता की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक…!

Weight 200 g
Writer

Sharad Tandale

Number of Pages

432

Reader's Reviews

  1. Review 1 : सत्या
    #रावणा
    भलेही आयुष्याने ठोकरलं तुला,
    तुझ्याच बापानेच नाकारलं तुला..
    परिस्थितीनं घेतल्या कित्येक परीक्षा
    तरीही तू उभारलास ताठ कणा,
    कारण तू रावण होतास…तुझ्याच जिद्दीवर तू उभारलास,
    गुरूला देखील बुद्धीने नमवलास..
    केलास सहन कित्येक वेळा अपमान,
    तरीही ताठ मानेने पुन्हा उभा राहिलास…
    कारण तू रावण होतास…आपल्या मातेच्या अपमानाचा बदला तर घेतलासच,
    पण त्याचबरोबर आपले गमावलेले राज्य देखील सुलामी ला परत केलंस..
    कुबेराला तू सेवक बनवलास,
    आणि कीर्तीचा झेंडा रोवलास…
    कारण तू रावण होतास…

    जगाच्या व्यापारावर सत्ता तर तू मिळवलीसच ,
    सोबत तू समुद्रातून जगावर राज्य करायची प्रणाली देखील दाखवून दिलीस…
    लंकेला सोन्याची बनवून तू आदर्श राजा बनलास,
    लोकांना स्वातंत्र्य देऊन नवीन धर्म देखील उभारलास..
    कारण तू रावण होतास…

    सर्व जाती धर्माच्या लोकांना लंकेत सामावून घेतलंस,
    आपल्या युद्ध नितीच्या जोरावर तू इंद्रा ला देखील नमवलस..
    इर्षेला पेटल्यावर तू यमा ला देखील कैद करून दाखवलस,
    आणि गुरूच्या आज्ञेवरून इंद्रा ला भयमुक्त देखील केलंस..
    कारण तू रावण होतास…

    बहिणीच्या प्रेमासाठी तू रामाला ललकारल,
    सीतेला कैद करून देखील तू पुरुषमर्यादा ओलांडली नाहीस..
    सख्या भावाने जरी विरोध केला तरी तू मागे हटला नाहीस,
    भलेही बदला पूर्ण झाला नाही पण शरण मात्र तू गेला नाहीस..
    कारण तू रावण होतास…

    राम जरी युद्ध जिंकला,
    तरी मन मात्र तूच जिंकलास..
    अजून तू कोणाला समजलाच नाहीस…
    कारण तू अजिंक्य रावण होतास…

  2. Review 2 : रेश्मा यादव
    सुरुवातीलाच वाचताना रावणाचं बालपण, घर, घराजवळचं वातावरण, हे सर्व काही आपल्या ग्रामीण भागातील, आपल्या अगदी घराजवळच घडलं आहे, इतकं ते सध्याच्या परिस्थितीशी जुळणारे आहे असे वाटते.
    या कादंबरीमध्ये निसर्गसौंदर्य, आजूबाजूच्या परिसरातील अचूक निरीक्षणे, फुलपाखरांच्या पंखाचे रंग, फुलांचा सुगंध, फळझाडे, चुलीवर शिजणाऱ्या भाताचा सुवास ही वर्णने वाचताना मनाला नकळत भूरळ पाडणारी आहेत.
    लहानपणापासूनच, रावणाची इतर भावंडांपेक्षा विचार करण्याची पद्धत, त्याची अभ्यासू वृत्ती त्याच्या अनोख्या बुध्दीची साक्ष देतात. दशग्रीवा म्हणून त्याची ठाम विचारसरणी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला कशी पूरक ठरते हे अनेक प्रसंगातून कळते. उदाहरणार्थ जेव्हा जेवताना मंत्र म्हणायचा असतो तेव्हा दशग्रीवा म्हणून त्यानं भावंडांना सांगितले की, पात्रात वाढलेल्या अन्नाला ताटकळत ठेवणं हा निर्मात्याचा अपमान नाही का? कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर ती निसर्गाप्रती, भात पिकणाऱ्या प्रती, किंवा ते शिजवणाऱ्या प्रती व्यक्त करावी, जिचं ह्या अन्ननिर्मितीत काहीच योगदान नाही ती अन्नपूर्णादेवी मध्येच कुठून आली. आपली माताच ही खरी अन्नपूर्णा आहे. तिच्यासाठी एखादा मंत्र तयार करा म्हणावं त्यांना… हा विचार निसर्गाच्या आणि आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सत्यवादी आहे.
    आपल्या आई आणि मावश्यांवर झालेला अत्याचार, आपल्या जन्माचा जाणत्या वयात कळालेला इतिहास साहजिकच त्यामुळे दशग्रीवाच्या कोवळ्या मनावर प्रचंड झालेला आघात वाचतानाही सहानुभूती निर्माण होते. त्यातूनच निर्माण झालेलं नैराश्य आणि मग सूड घेण्याची निर्माण झालेले भावना, सारं काही भयाण…
    आईचे वडील, आजोबा सुमाली यांचा उपदेश त्याला यामधून बाहेर पडण्यासाठी मदत करतो. वडिलांचे वडील असलेले पौलस्त्य आजोबा त्याला संघर्ष करण्याची प्रेरणा देतात.अनेक प्रेरक वाक्यांमधून दशग्रीवाच्या मनामध्ये सकारात्मक बदल झालेला लक्षात येतो. त्यामध्ये तुम्हाला संघर्षात दुसऱ्यांची मदत घेऊन अळी व्हायचंय की स्वत: लढून फुलपाखरू व्हायचं, या आजोबांच्या वाक्याने वाचक म्हणून मलाही प्रचंड प्रेरणा मिळाली.
    मला श्रेष्ठत्व हवं आहे आणि मी मरणार नाही, ही सिंहगर्जना करुन सर्व सैन्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा हा रावण आणि त्याची प्रचंड महत्त्वाकांक्षा याची जाणीव होते.
    ब्रम्हदेवाकडून घेतलेले ज्ञान, महादेवाच्या प्रती असलेली निस्सीम भक्ती आणि त्यामुळेच महादेवाने दिलेले रावण हे नाव त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण ठरतात.
    असूर, दैत्य, दानव आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून स्वतंत्र रावणसंहिता तयार करून राक्षस साम्राज्य तयार करणारा हा बलाढ्य रावण राजा, सर्व देवांना आपल्या सामर्थ्याने पराजित करणारा हा महानायक आणि त्याचा चित्तथरारक प्रवास वाचताना शहारे आणणारा आहे.
    सोन्याची लंका निर्माण करुन, स्वातंत्र्य, समानता व समता यावर आधारित राक्षस संस्कृती निर्माण होते.
    असुर दैत्य दानव या जमातींना एकत्र करून स्वतंत्र व राज्याची स्थापना केली आणि स्वतःच्या कर्तुत्वावर सोन्याची लंका निर्माण करुन आपल्या प्रजेला सुख, समाधान आणि स्थैर्य देणारा राजा फार वेगळी अनुभूती देतो.
    शिव तांडव स्त्रोत, रावण संहिता, रुद्रवीणा, बुद्धिबळ, व्यापारदर्शन, राज्यशास्त्र या सर्वांमध्ये रावणाने स्वतःला सिद्ध केलं. यारून त्याच्या प्रचंड बुद्धिमत्तीची प्रचिती येते. पत्नी मंदोदरी विषयी असणारे प्रेम, मुलांबद्दल असणारे प्रेम, बहिण शूर्पणखाविषयी असणारे बंधूत्व तसेच मातृसत्ताक असणारा राजा वाचताना त्यावेळच्या परिस्थितीची माहिती मिळते.
    बहिणीवरच्या अत्याचाराने व्यथित होऊन संतप्त झालेल्या रावणाने केलेले सीतीचे अपहरण आणि तरीही राखलेलं मर्यादांचं कुंपण रावणाच्या सदृढ मानवतेची साक्ष देते.
    शेवटी ऐनवेळी भावानेच दिलेला दगा आणि लंकाधिपती म्हणून सारं काही मिळवल्यानंतर आलेली शिथिलता,अतिआत्मविश्वास रावणाला शेवटी रक्ताच्या नात्यांचा मृत्यू पहायला भाग पाडतो. हा प्रसंग वाचताना प्रचंड वेदना होतात, इतक्या ताकदीने लेखकाने हे प्रसंग लेखणीने कागदावर उतरवले आहेत.
    रावणाच्या मृत्यू समयी रामानेही त्याचं पांडित्य कबूल करुन लक्ष्मणाला या ज्ञानी राजाकडून गुरू उपदेश घेण्यासाठी पाठवलं, यातच या ज्ञानी राजाची प्रचिती येते.
    एकंदरीतच सुरूवातीपासून कांदबरी वाचताना लेखकाने इतक्या सहजतेने प्रसंग लिहिलेले आहेत की जणू समोर सारं काही घडत आहे. कुठेही अतिशयोक्ती किंवा कल्पनाविलास नाही. उलट जे न पटणारे आहे ते दहा तोंडी रावण, मायावी हरीण यासारख्या गोष्टींना फाटा देऊन वास्तविक लेखन केले आहे.
    फक्त विज्ञान अध्यापिका म्हणून मला, उडणारे पुष्पक विमान ही संकल्पना नक्की होती का असा एकच प्रश्न पडलेला आहे. बाकी तो पुराणापासूनच संदर्भ ऐकून आहे.
    पराभूत झालेल्या एका खलनायकाची सुद्धा एक बाजू असते हे पहिल्यांदा लेखकाने या कादंबरीद्वारे दाखवून दिले. हजारो वर्षांपासून आपण परंपरा म्हणून रावणाला जाळत आलेलो आहोत.
    आपण रुढी-परंपरेच्या इतक्या आहारी गेलो आहोत की चिकित्सा करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवत नाही. आजवर अनेक कथा साहित्य नाटक याद्वारे रावण किती नीच, दुर्गुणी होता हे दाखवण्यात आले.
    जिंकणाऱ्याबद्दल जास्तीत जास्त चांगलं आणि पराभूताबद्दल जास्तीत जास्त वाईट लिहिण्याची मानसिकता असते.
    हजारो वर्षांनंतर लेखकाला हा विषय घेऊन चिकित्सा करावी वाटली हीच फार मोठी धाडसाची गोष्ट आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने रामायणातून खलनायक ठरलेल्या रावणाला आज मुक्ती मिळाली आहे, असं ही कादंबरी वाचून मला वाटते.
    एकूणच साहित्यातील अतिशय अभ्यासपूर्ण कांदबरी वाचकांपर्यंत पोहोचवून विवेकवादी विचार करण्यास भाग पाडणाऱ्या या कांदबरीची पुढील काळात सुवर्णाक्षराने नोंद घेतली जाईल, ही खात्री वाटते.
    पुनश्च लेखक शरद तांदळे यांना लेखणीच्या या कार्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद…
  3. Review 3 : निता वाघ
    #रावण राजा राक्षसाचा
    #मला भावलेला रावण…!
    खूप प्रतिक्षेनंतर अखेरीस लेखक शरद तांदळे यांची रावण राजा राक्षसाचा ही कादंबरी हातात पडली. लहानपणापासून माझ्या वडिलांनी विष्णुपुरान, रामायण या मालिका बघण्याची सवय लावलेली. या मालिका बघताबघताच मोठी झाले. घरात पुरोगामी विचारांची रूजवण असली तरी विविध प्रकारचे आध्यात्मिक, धार्मिक मासिक, साप्तहिक घरी नित्यनेमाने येत असत. त्यामुळे धर्म, अध्यात्म, इतिहासवरचं लिखाण कायम वाचत आलेले व त्याच वाचनातून रावण मला भेटत गेला आणि राम-लक्ष्मण-रावण यांच्या चांगल्या वाईट प्रतिमांचं चित्र मनावर उमटलं गेलं. राम म्हणजे एक स्वच्छ, निर्मळ, साहसी व्यक्तिमत्व तर रावण म्हणजे दहा तोंड असलेला एक वाईट राक्षस, ज्याचं कायम दसऱ्याच्या दिवशी दहन होताना बघत आलेले. पुढे चालून देशात गरम झालेल्या वातावरणामुळे अयोध्याच्या राममंदिराच्या मुद्यामुळे रामराज्य हा शब्द सतत कानावर पडायला लागला. मग रामाचा शोध सुरु झाला व अनेक लेखक, विचारवंतांच्या लेखणीतून मला राम समजला, रामराज्य समजलं व खाडकन मनातल्या रामाची प्रतिमा बदलली गेली. जर राम असा होता तर मग खरा रावण कसा असेल? हा प्रश्न मला पडला. सीतेला पळवून नेणारा रावण माझ्यादृष्टीने वाईटच होता. म्हणजे एकंदरीत ना राम, ना रावण या मतापर्यंत मी पोहचले होते.
    अशातच योगायोगाने ‘रावण राजा राक्षसाचा’ या कादंबरीचे रावणाबद्दलचे चांगले अभिप्राय माझ्या वाचण्यात आले. पुन्हा डोक्यात द्वंद्व सुरु झाला रावण चांगला कसा असू शकतो? हे उत्तर शोधण्यासाठीच कादंबरी वाचण्यास सुरु केली.
    रावण वाचायला सुरु करण्यापूर्वी, वाचताना, कादंबरीच्या प्रत्येक पानामधला रावण व अगदी रावणाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्याची विविध रूप मनाला भावली, शब्दाच्या माध्यमातून अनुभवता आली. या कादंबरीमधला शाब्दिक संवाद मला माझ्या विचाराचं प्रतिबिंब वाटलं व त्यामुळे वाचताना अजून उत्सुकता वाढली. ही कादंबरी आहेच अशी प्रत्येकाला स्वतःची, आपलीशी वाटणारी. हृदयात आठवणींचं मोरपीस ठेऊन जाणारी. अगदी साध्या, सोप्या भाषेत लिहिलेली ही अप्रतिम कलाकृती माझी सर्वात आवडती झाली.
    रावणाचा संकरित जन्म त्यातून आलेलं नैराश्य, भावनांचं धसमुसळेपण, भूतकाळातील वाईट घटनांमुळे त्याच्या मनाची होणारी सततची घालमेल, शांततेत त्याचा मनाशी होणारा संवाद, शिक्षणातून ज्ञानाचा शोध, निसर्गाच्या सानिध्यात त्याने घेतलेला ‘स्व’ चा शोध, पौलस्थ्य आजोबा, सुमाली आजोबा व त्याला ज्ञानार्जन करणारे ब्रम्हदेव यांना सतत प्रश्न विचारून त्रस्त करणारा रावण, गुरुने दाखवलेल्या प्रकाशाच्या वाटेनेच जाणारा रावण, त्याची चिकित्सक वृत्ती, मेहनत, ज्ञान घेण्यासाठीची धडपड, त्याच्या डोक्यात घोंगावणारा विचारांचा वारा नकळत आपल्या मनात एक वादळ निर्माण करून जातो.
    नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या रावणाची प्रबळ इच्छाशक्ती, अफाट अशी महत्वकांक्षा उद्विग्न मानवी मनाला जिवंत करते. वर्तमानात फुलपाखराला आपल्या मुठीत बंदिस्त करणारा रावण भविष्यकाळात याच फुलपाखराला मुक्त स्वछंदी उडताना बघून हर्षभरीत होतो. आयुष्यात होणाऱ्या नव्या बदलांना स्वीकारून, नव्या मूल्यांवर आधारित असणारी व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न बघणारा रावण आपल्याला आपला वाटणार नाहीतर नवलच.
    तारुण्यातील सुंदरशी नाजूक अवस्था व त्या अवस्थेमधला त्याचा बंडखोरपणा, त्याचा स्वतःच्या मनाशी विद्रोही संवाद, मनाच्या अपरिपक्व असणाऱ्या अवस्थेत त्याने घेतलेले टोकाचे निर्णय, त्या निर्णयामुळं सर्वांच्याच भविष्यावर झालेला चांगला-वाईट परिणाम, रावणाचं कुटुंबावर असलेलं अफाट प्रेम व त्या कुटुंबाच्या साथीनेच आईवर झालेल्या अन्यायचा प्रतिशोध घेणारा रावण, त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मानवी मनाला प्रेरित करते.
    स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी लग्न नको असं म्हणणाऱ्या रावणाचं मंदोदरीच्या प्रेमात पडणं, तिच्यावर असलेल्या निस्सीम प्रेमापोटीच समस्त स्त्री जातीचं मन जपण्यासाठी त्याने स्वतःमध्ये केलेला बदल, सावत्र बहिणीच्या सुखासाठी, स्वतःचं तिच्यावर असलेलं प्रेम सिद्ध करण्यासाठी रणांगणात रक्ताच्या चिरकांड्या उडवणारा रावण, तिच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी सीतेचं अपहरण करणारा एकमेव रावण या ना त्या रूपात आपल्याला खूप काही शिकवून जातो.
    स्त्री-मनाच्या चष्म्यातून रावणाकडे बघितलं तर प्रतिशोध घेण्याच्या सूडाच्या भावनेत त्याच्या कडून झालेल्या काही अक्षम्य चुकांना माफ करता येणार नाही. परंतु त्यावेळची वाईट परिस्तिथी, पुरुषी मन, तारुण्य, राग, द्वेष, विचारांचा अपोक्तेपणा यात भान हरपलेल्या माणसाकडून झालेल्या त्या चुका होत्या व त्या त्याला मान्य होत्या. त्या चुका सुधरवण्यासाठी त्याने घेतलेलं प्रायश्चित व पश्चताप यामुळं तो माणूस म्हणण्याच्या व एका नायकाच्या भूमिकेत येण्याची लियाकत ठेवतो. यापलीकडे जाऊन मातृहत्यच्या आरोपावरून स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याचा वध करणारा रावण, विधवा स्रियांचे पुर्नविवाह घडवून आणणारा रावण, स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे जोडीदार निवडण्याचा अधिकार देणारा रावण. त्राटीका, लंकिणी या सारख्या स्त्री योद्ध्यांना नेतृत्वाची संधी देऊन समस्त स्त्री जातीसमोर आदर्श निर्माण करणारा रावण. मंदोदरीला स्वतःच्या मृत्यूनंतर सती न जाऊ न देता जिवंत राहून राक्षस संस्कृतीचा आदर्श आपल्या लेखणीतून मांडण्याचा सल्ला देणारा रावणराजा त्याच्या अशा कितीतरी भूमिकेतून त्यान स्त्री-मन जपलेलं दिसून येतं.
    ज्ञान, स्वातंत्र्य, समता, शांतता, प्रजेचं सुख, ऐश्वर्य यांवर आधारित असलेली एक नविन संस्कृती ‘रक्ष: इति राक्षस’ सर्वांचं रक्षण करणारी ‘राक्षस संस्कृती’ निर्माण करून पुढच्या पिढीला एक आदर्श घालून दिलेला महानायक. आजोबांनी दिलेल्या शब्दांला जागूनच त्याने अशी नवनिर्मिती केली की त्याचे विरोधक असणारेही त्या संस्कृतीचं जतन करतील. असा हा बंडखोर रावण आजच्या युवापिढीसाठी आदर्श ठरू शकतो.
    धर्म, वेद, शिक्षण, ज्ञान मग राजकारण या सर्वांवरची त्याची स्वतःची स्वतंत्र मतं, चिकित्सकवृत्ती बघता त्याची नीती, तत्व, नियम व इतिहास बघता आजच्या युवापिढीशी व राजकारणाशी जर संबंध जोडला तर दशग्रीव ते रावणाचा प्रवास आजच्या आधुनिक काळातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. या जगात शाश्वत असं काहीच नाही हे मानून त्याने धर्माची केलेली नवनिर्मिती आजच्या काळात तरुण पिढीला फायदेशीर ठरू शकते.
    असा हा मला भावलेला आईचा लाडका पुत्र, सख्खा व सावत्र असा भेद न करता बंधू प्रेमाला जागणारा, पत्नीवर अगाध प्रेम करणारा रावण, पुत्रावर जीव ओवाळून टाकणारा पिता, प्रजेला सुखी ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा रावण, बुद्धिबळाचा संशोधक रावण, शिवतांडव स्तोत्राचा रचनाकार रावण, जन्मानं श्रेष्ठत्व नाकारलेला पण स्वकर्तृत्वानं स्व-अस्तित्व निर्माण करणारा महापराक्रमी रावण, समतेचा पुरस्कर्ता रावण, ज्ञानोपासक रावण, आर्यांनी ज्यांना मान-सन्मान नाकारला अश्या सर्व जाती-जमातींना सन्मानाचं, हक्काचं जगणं जगू देणारा राक्षस संस्कृतीचा संस्थापक रावण, स्वत:च्या सुंदर महालासारखचं प्रजेसाठी सुद्धा सोन्याची घरे बनवून देणारा, सोन्याची लंका वसवणारा एकमेव लंकाधिपती रावण मला प्रचंड भावला व तो माझ्यासाठी नायक ठरला.
    अतिशय सुंदर अशी ही कलाकृती ‘रावण राजा राक्षसाचा’ सर्वांनीच वाचावी. मंदोदरीच्या रूपात समस्त स्त्री जातीला स्फुर्तीदायक ठरेल अशी कादंबरी नव्याने आपण घेऊन याल हीच आशा. पुढील लिखाणासाठी आपणास खूप खूप सदिच्छा..
  4. Review 4: साक्षी विवेक मोरे.
    आजवर रावण काय होता कोण होता हे काहीच माहित नसताना सतत त्याच्याबद्दल वाईट बोलणं, त्याची विटंबना, त्याच्या बद्दल असणारे फक्त आणि फक्त अविचार ऐकले. ना कधी शाळेत, ना कधी पुस्तकात, ना कधी घरच्यांकडून त्याच्या बद्दल चांगली-वाईट गोष्ट ऐकली होती. नेहमी होळीला रावणाची होणारी विटंबना, निघणारी धिंड, दहन करतानाचा पुतळाच बघितला. तेव्हा कधी प्रश्न पडला नाही हे सगळं असं का? किंवा कोणी सांगितलही नाही. ते तर काय सांगणार.. त्यांनाच रावण काय व कोण होता त्याचा जन्म कसा झाला काही काही माहित नाही व त्याच्या जन्मापासून मृत्युपर्यंत रावणाला जसा होता तसा आपल्या समोर ठेवण्याचं काम शरद तांदळे सरांनी केलंय. आता आपण खरोखरच रावण समजून घ्यायला हवा. रावण तो होता ज्याने स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. रावण तो होता ज्यानं सोनं शुध्द करून समुद्रमार्गे ते सुखरूप आणण्यासाठी खडतर प्रवास व युध्द केली व सोन्याची लंका साकारली. पण आपल्याला त्यानं केलेला प्रवास कधी कळला नाही किंवा आपण तो जाणून घेतला नाही. आपल्याला दिसली ती फक्त आणि फक्त सोन्याची लंका. बालवयापासून स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाला सिध्द करण्यासाठी त्याने घेतलेले कष्ट बघितले व समजून घेतले तर कळेल तो काय होता व कोण होता.
    महत्त्वकांक्षा, नेतृत्व, कर्तृत्व, बुध्दीचातुर्य, धैर्य, प्रत्येक गोष्टीचं संपूर्ण ज्ञान, सामर्थ्य, आयुष्यातील प्रत्येक वळणावर चढउतार सोसत केलेली वाटचाल असा सर्वगुणसंपन्न हा रावण!!
    स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक रावण राजा राक्षसांचा!!!
  5. Review 5 : Ratnabhushan Wadhave
    रावण राजा राक्षसांचा हे ऐकायलाच किती भयंकर वाटत नाही का. रावण म्हणजे एक विनाशकारी, स्त्रीलंपट, देवांच्या विरोधात उभा राहणारा राक्षस येतो. काही प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतात.
    १) रावणाला खरंच १० मस्तक होती का?
    २) रावणाजवळ एखादी विद्या होती का? ज्याने करून तो कोणाचाही वेश घेऊ शकेल?
    ३) रावणाचे आई वडील कोण?
    ४) रावणाच खरं नाव काय?
    ५) रावण खरच क्रूर होता का?
    ६) रावणाला एकूण किती भावंड होती?
    ७) रावणाजवळ पुष्पक विमान होते का?
    ८) लंका खरच रावणानी बांधली होती का?
    ९) लंकासोन्याची होती का?
    १०) दशग्रिव ते लंकाधिपती रावण पर्यंतचा प्रवास कसा होता?
    ११) रावण आर्य होता की अनार्य?
    १२) रावण खरच विद्वान होता का?
    अशाच प्रश्नांची विज्ञाननिष्ठ उत्तरे लेखकाने या कादंबरीत दिलेली आहेत. रावणाच्या भूमिकेला मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे, तरीही कुठेही प्रभू श्रीराम, लक्ष्मणाबद्दल दुजाभाव केलेला आढळत नाही आणि हीच या कादंबरीची ताकद आहे.
    प्रत्येकाच्या मनात ज्याच्या बद्दल लहानपणासूनच वाईट बिंबवलं त्या रावणावर काही तरी लिहावं, असा विचार लेखकाच्या मनात कसा आला असेल? सप्टेंबर २०१३ लंडनमध्ये होणाऱ्या प्रिन्स ऑफ वेल्स ट्रस्टचा “Young enteprenuer award” उद्योजक असलेल्या शरद तांदळे यांना मिळाला. हा पुरस्कार घेण्यासाठी पहिल्यांदाच विमानात बसतात आणि त्यावेळी सरांना रामायणातील रावणाची आठवण होते. भारतात पौराणिक कथेनुसार त्या काळात रावणाकडे विमान होते. त्यामुळे रावणाला जाणून घेण्याची लेखकाला इच्छा होते आणि इथून पुढे रावण राजा राक्षसांचा या अद्भुत, अफलातून कादंबरीच्या एक एक पानाला गुंफवण्याची सुरुवात होते.
    रावण राजा राक्षसांचा हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी अगदी हातावर मोजण्या इतकीच पुस्तके बाजारात होती. चार वर्ष रावणाचा वेध घेत, संशोधन करत करत “रावण राजा राक्षसांचा” ही अफलातून, अद्भुत कादंबरी लेखकांनी आपल्या हातात सुपूर्त केली आहे.
    ही कादंबरी एकूण २९ प्रकरणातून पुढे जात असते. ही सगळी प्रकरण वाचत असताना जणू रावणच ती आपल्याला सांगतो आहे की काय असा भास होतो. काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टींना लेखकांनी वैज्ञानिक व सर्वांना समजेल अशा भाषेत उत्तर दिली आहेत आणि कमालीचे यशस्वी झाले आहेत. कादंबरी वाचल्यावर येत्या दसऱ्याला रावणाची प्रतिमा जाळायची का हा प्रश्न निर्माण होणार हे नक्की.
  6. Review 6: सुनिता रामचंद्र
    #रावणदहन !
    आज दसरा, रावणदहनाचा दिवस!
    शतकानुशतके आपण या दिवशी रावण जाळताना बघत आहोत. आजही परंपरेने चालत आलेला एक तथाकथित राक्षस बाहेर नष्ट होत आहे आणि माझ्या आत रावण एक माणूस म्हणून जन्मास येत आहे. “रावण राजा राक्षसांचा” या कादंबरीच्या निमित्ताने मला भावलेल्या एका नव्या रावणाला मी तुमच्या समोर ठेवताना सुरुवातीला हे स्पष्ट करणे गरजेचे आहे की मुळात ही कादंबरी रामाच्या विरोधात नाही. पण तो कल्पनाविस्तारही नाही. यात लेखकाची अभ्यासपूर्ण अभिव्यक्ती आहे. मात्र कथेच्या अंगाने लिहिले गेल्याने कादंबरीची मांडणी क्लिष्ट न होऊ देण्यासाठी रंजकेतेचा आधार घेतलेला आहे.
    खरं तर “रावण राजा राक्षसांचा” या पुस्तकाची जादू नावापासूनच सुरू होते. कारण नायक आणि खलनायक इतकीच समज असलेल्या वयात आयुष्यात आलेला हा राजा!
    सीतेला पळवून नेणारा दृष्ट राक्षस, दहा तोंडे असलेला विकारी दशानन इतकीच रावणाची भाबडी तोंडओळख आपल्याकडे आहे. मात्र मोठे होताना जसं जशी समज वाढीस लागते तसं तसं लक्षात येऊ लागतं की पूर्णत: वाईट किंवा चांगलं असं काहीच नसतं या जगात.
    या आपल्या वैचारिक परिवर्तनाच्या काळात मग आपण आजवर ऐकलेला, वाचलेला रामही मग पूर्णपणे निर्दोष वाटत नाही आणि रावण केवळ खलनायक कसा या प्रश्नाची कोंडी फोडण्यासाठी आजवर काहीच उपलब्ध न झालेलं नसतं. मग त्या राहून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास या पुस्तकाची मदत होईल असं वाटून पाऊले आपोआप त्या दिशेने वळतात. सुरुवातीची काही पानं चाळतानाच आपल्या लक्षात येतं, हा आपल्या आत होत जाणारा वैचारिकतेचा प्रवास आहे म्हणून.
    मुळात दोन भिन्न आर्थिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीत जन्माला आलेल्या या व्यक्तीरेखा आहेत. एकाचा जन्म नवसाचा तर दुसऱ्याचा उपेक्षेचा, वंचनेचा एक राजमहालात कोड कौतुकात वाढणारा तर दुसरा ऋषी पित्याच्या प्रेमाला वंचित पर्णकुटीत खडतर बालपण जगणारा.
    यात तुलनेचा भाग यासाठी येतो की एकाला जे सहज वडिलोपार्जित म्हणून मिळालं ते वैभव दुसऱ्याच्या प्रचंड झगडून मिळवावं लागतं. मग राम रावण ही तुलनाच बालिश वाटू लागते.
    सुरुवातीपासूनच रावणाचा हा प्रवास आपल्या मनाची पकड घेतो. आपल्याला मोहात पाडतो. रावणाला त्याच्या जन्माचा इतिहास त्याच्या कळत्या वयात कळतो आणि तेव्हा पासून सुरू होतो त्याच्यातील संघर्षाचा प्रवास. कुणाला वाटेल ही कादंबरी सुडाचा प्रवास आहे म्हणून. परंतु कधी भावनिक गुंतागुंत कधी महत्वाकांक्षा कधी कर्तव्य तर कधी राजनीतीचा तो भाग आहे. जो रामालाही चुकलेला नाही (पण एकदा देवत्व दिल्यावर आपण डोळ्यावर झापडं बांधतो हा भाग अलहिदा.)
    ‘वयानुसार प्रत्येक जण प्रगल्भ होत जातो’ असं म्हणताना रावण स्वतःच्या चुकांची मंदोदरीजवळ कबूली देतो तेव्हा त्याचा परिपक्व होत जाणारा वैचारिक प्रवास दिसू लागतो. रावण, एक विचार वाटू लागतो, कारण विचार हा शब्द मानवाशी निगडीत आहे. मानवच स्वतःच आत्मपरीक्षण करून स्वतःकडे स्वच्छ नजरेने बघू शकतो. असं असूनही त्या चुका तो दुसऱ्यांसमोर सांगण्यात असमर्थ ठरतो. त्या मान्य करण्याचं धाडस असणारा रावण म्हणूनच जास्त प्रगल्भ आणि परिपक्व वाटतो. आपल्या जवळचा वाटू लागतो.
    याचा अर्थ त्याच्या चुका क्षम्य आहेत असं मुळीच नाही, पण त्या म्हणजेच रावण हा आजवरचा समज बाजूला ठेवला तरच आपण प्रामाणिकपणे त्याला समजून घेऊ शकतो. कारण एखादी व्यक्ती समग्रपणे समजण्यासाठी त्याच्या व्यक्तीत्वाचा एकच भाग बघून चालत नाही.
    एक सामान्य ऋषीकुमाराचे बलाढ्य राजात रुपांतरण होताना तो प्रजेला विसरत नाही. प्रजेच्या घरांची कौले सोन्याची असावीत म्हणून धडपडतो. प्रजेला समृद्धता देऊ बघतो. मानवाच्या अनेक जातींना एकत्र करून त्यांना आत्मभानाची दिशा देतो.
    रामाला यश मिळावं म्हणून घातलेल्या पुजेचं दायित्व स्विकारतो. मृत्यूशय्येवरही आपल्याकडे ज्ञान
    घेण्यासाठी आलेल्या शत्रूला शत्रू म्हणून नाकारत नाही.
    हा सगळा प्रवास वाचताना आजवर वाचलेला रावण मग कुठल्या कुठे विरून जातो. रामाइतकाच कदाचित रामापेक्षा काकणभर जास्त आवडू लागतो.
    मला वाटतं या देशाने जेव्हापासून मानवाला, देव आणि दैत्य म्हणून विभाजित केलं, तेव्हापासून हा संपन्न देश रसातळाला गेला. कारण मनुष्य योनीत जन्माला आलेल्या प्रत्येकाची माणूस म्हणून घडण्याची प्रक्रियाच आपण नाकारून टाकली आहे.
    लेखक शरद तांदळे यांनी देव आणि दैत्य या संकल्पनांच्या पलिकडे जाऊन एक माणूस म्हणून होत गेलेला रावणाचा प्रवास इतके दिर्घ परिश्रम घेऊन आपल्यासमोर कांदबरीच्या रूपात मांडून विविध अंगांनी जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित केला आहे.
    सहज ओघवती भाषाशैली हे या कादंबरीचं वैशिष्ट्य. यातील पात्रे, प्रसंग जिवंत करण्याची लेखकाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.
    एखाद्या वटवृक्षाला मुळापासून बघत जावं तसं रावणाचा हा संपूर्ण प्रवास उलगडताना वाटतं रहातं. खूप वर्षांनी एखादं पुस्तक सलग बसून वाचावं इतकी मोहिनी या पुस्तकाने नक्कीच घातली आहे.
    ही कादंबरी केवळ चांगलं आणि वाईट या मानसिकेतून जगाकडे बघणाऱ्या आणि केवळ फोलकटांवर विसावून आपण सांगू तेच सत्य अशी स्वतःची छबी निर्माण करणाऱ्या व्यवस्थेला चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.
    मला वाटतं, ज्याला कुणालाही आपला प्रवास “माणूस” म्हणून करावयाचा आहे त्यांच्यासाठी रावणाचा हा प्रवास जगण्याची एक संहीता ठरू पाहात आहे…
Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us