भारतजोडो यात्रेमुळे इथल्या मातीतला सलोख्याचा, सौहार्दाचा मूळ विचार कन्याकुमारी ते काश्मीर अशा विविध ठिकाणी नाना रंगाढंगात अभिव्यक्त तर झालाच; पण राजकीय प्रतलातही काँग्रेस खऱ्या अर्थाने पुन्हा प्रमुख विरोधी पक्ष आणि राहुल गांधी काँग्रेसचे निर्विवाद नेते म्हणून पुढे आले. समाजात एकूणच वाढत चाललेल्या अशांततेच्या-अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी एक अनोखे पाऊल उचलले – ‘भारत जोडो यात्रे’चे.
१३६ दिवस, १४ राज्ये, ७५ जिल्हे, ३५७० किमी अंतर आणि भारतभरातील विविध जातीधर्मांचा, पंथांचा, भिन्न विचारधारांचा लाखोंचा जनसमुदाय… मरगळलेल्या काँग्रेसला आलेली उर्जितावस्था, राहुल गांधींची नवीन लोकनेता ही प्रतिमा आणि भयाचा-दडपशाहीचा दर्प पसरलेल्या समाजात बोलू पाहणाऱ्या भारतीयांची निर्भयता हे होते भारत जोडो यात्रेचे फलित.
या यात्रेचा पहिलावहिला विस्तृत लेखाजोखा, ध्रुवीकरणाच्या आणि विद्वेषाच्या विरुद्धच्या संघर्षाचा इतिवृत्तान्त पहिल्यांदाच येतोय ‘भारत जोडो यात्रा’ या पुस्तकात.