विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण आजपर्यंत अनेक आजारांवर लसी विकसित केल्या, औषधे शोधून काढली. देवी, क्षय, कॉलरा यांसारख्या अनेक जीवघेण्या रोगांपासून मुक्तता मिळविली. आज संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोव्हिड आजारावर अत्यंत कमी वेळात विविध लसी निर्माण करण्याचे श्रेय मानवतावादी विज्ञानालाच जाते.
ज्ञानाचा हा प्रवाह असाच चालू राहणार आहे.
प्रस्तुत पुस्तकातून विज्ञान कसे विकसित होते, नवे आयाम कसे जोडले जातात, कोडी कशी उलगडली जातात, याचा वेध घेतला आहे. जीवविज्ञानाचे क्षेत्र कसे विकसित होत गेले, त्याचा प्रवास आज कोणत्या टप्प्यापर्यंत येऊन पोहचला आहे, याची झलक यातून पहायला मिळते. या प्रवासातील थांब्यावर वाचकांची भेट प्रतिभावंत जीवशास्त्रज्ञांशी होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू समजून घेतांना त्यांच्या मौलिक संशोधनाच्या योगदानाचा पट उलगडला जातो.