(freelance writer , शिक्षिका )

दुसर्‍यांना सांगतांना आपण बर्‍याचदा खोट्याच गप्पा करतो.विशेषतः आईवडीलांबद्दल सांगतांना एक आदरयुक्त भावना, त्यांच्याबद्दल आपल्या मनात असतीच पाहीजे..असा एक संस्कार आपल्या मनात लहानपणापासूनच रूजत घातलेला असतो. आई नावाची कुणीतरी एक सामान्य बाई असणं आणि ‘बाप’ नावाचा एक साधासरळ आयुष्य जगणारा माणूस असणं, आपण गृहीत धरतचं नसतो.

आई बाप म्हणजे आपल्यासाठी ‘जगात देव सगळीकडे पोहोचू शकत नाही ,म्हणून त्याने आई बाप घडवले’ अशा अर्थाच्या वाक्यात घट्टमिट्ट बसणारे चेहरे असावेत, असं काहीतरी आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. पण , ते खरचं तसचं असायलाच हवं का? नसलं तसं तर ? आई बाप सामान्य असू शकतातच ना? भित्रे, लाचार, दुबळे, कुठल्याही गरजा धडपणे पुरवायला असमर्थ…तरी काळजी करणारे आणि कधीतरी ती ही धडपणाने न दाखवता येणारे …असेही आईबाप असतातच..आणि मग तरिही ते पुस्तकातल्यासारखे नाहीत म्हणून आपण त्यांना आईवडील मानणं बंद करू शकत नसतोच !

आपल्याला आईवडीलांच्या सगळ्या गोष्टी पटतीलच असं नाही. त्यांनी आपल्याबाबतीत घेतलेले सगळेच निर्णय ,अचूक,कायम बरोबरच निघतील असंही नाही. खूपदा ते कमी पडतील, जिथे त्यांच्या आधाराची नेमकी गरज आहे, तिथेच त्यांची ताकद कमी पडेल, किंवा मग नको त्या वेळी नको ते निर्णय ,जबाबदारी आपल्यावर लादून ते आपल्याला ताणात टाकतील. काहीही होऊ शकतं…काही जण याबाबतीत नशीबवान असतात. खंबीर, आर्थिक,मानसिक दृष्ट्या सक्षम आईवडील कायम पाठीशी असणं, ही माणसांची ताकद असते ,’आई माझा गुरू ,आई कल्पतरू’ या उक्तीप्रमाणे त्यांची आई त्यांना प्रत्येक लहानमोठ्या प्रसंगात धीराची शिकवण देत राहाते, ती शिकलेली असते, परिस्थितीची तिला जाण असते. वडीलही धडधाकट, कमावते, हवं ते सगळं देणारे, गरजा पुरवणारे असतात. आधार. घराची भिंत वगैरे.

अशांना कुणा तिसर्‍याची पायावर उभं राहातांना गरजही पडत नाही. घरचाच पाया, घरचीच भिंत त्यांना आधार द्यायला धडधाकट असते…त्यांना त्यांची जाणीव कितपत असते, तो भाग वेगळा. पण ,सगळेच या बाबतीत नशीबवान असतील, असं नसतं. बर्‍याचदा आई अशिक्षीत असते आणि वडील कमकुवत. पण, ते असतात !आपले हक्काचे असे असतात..आणि धीर यायला तितकचं पुरेसं असतं.

काही दिवसांपूर्वी Upsc गावात राहून पास झालेला ‘ओंकार’ म्हणतो त्याप्रमाणे, ‘मी यशस्वी झालो कारण माझ्या आईवडीलांची माझ्याकडूनच कुठलीच अपेक्षा नसणं. त्यांना मी नेमकी कुठली परीक्षा देतोय, याचीही जाण नसणं..आणि त्यामुळे त्या परीक्षेत काय होईल ,याचा मला जराही ताण नसणं, हेच माझ्या यशाचं कारण आहे” तर असंही असतचं. आपल्याला धीर देणारे आईवडील जितके आपल्यासाठी महत्वाचे असतात. तितकेच महत्वाचे असतात …आपल्या धीराची, आपल्या हिमतीची गरज असणारे आईवडील. आपले आईवडील आपल्याला मानसिक, आर्थिक किंवा इतरही कुठल्या बाबतीत धीर देऊ शकत नाहीत, उलट आपला कमकुवतपणा ‘त्यांचाच’ धीर खचल्यात जमा करू शकतो, ही जाणीव ज्या क्षणी आपल्याला होते, तो क्षण ‘हात न पकडता’ चालणं शिकवून जाण्याचा असतो. त्यांची ताकद बनण्याचा असतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात तो येण्याचा काळ वेगळा असतो. काहींना लहानपण गमवून ते शिकावं लागतं, काहींना स्वतःचं म्हातारपण येईपर्यंतही ते शिकण्याची तितकीशी गरज लागत नाही. पण एक वेळ येतेच, जिथे माणसाच्या डोक्यावरचा हात थरथरायला लागतो. कमजोर होतो. आपल्या चालण्याच्या वाटेवर सोबत करण्याइतकी ताकद त्या सुरकुत्यात उरत नाही. तिथे आपण मोठे होतो.

कुठल्याही बाबतीत कमजोर असणारे आईवडील कदाचित आपल्याला आधार द्यायला पुरेसे नसतील पण ते कायम सोबत देतात. पलंगावर पडून राहीलेला बापही डोळ्यांनी देतो ती सोबत, आपल्या आसपास सतत आधाराचं वर्तूळ तयार करते. आई एकवेळ दररोज भांडली तर चालेलं पण तिने आपल्या काळजीने रडणं.. सहन होणंही माणसाला असह्य असतं. काही माणसे त्यांचे श्वास घेतात, तोपर्यंत आपलं जगणं असतं, …त्यानंतरही जगतोच आपण, नाही असं नाही…पण नंतर प्रत्येक क्षणात ते जे हरवलेलं ‘जगणं’ शोधतं राहातो ना…ते सापडत नसलं की जगण्यातही जी एक बेचैनी राहाते.. ती असते… सुंदर, सुखावह, पण कधी निसटून,कुठे जाईल, याची शाश्वती नसलेली.

माणसे आहेत तोपर्यंत जपली पाहीजेत !
स्वाती भगत
swatibh@yahoo.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us