अक्षय्यतृतीयेला सूर्य जणू कासराभर जवळ आल्याचा भास होतो. गावाकडं मातीची ढेकळं लाह्यांसारखी तापतात. शहरात डांबरी रस्त्यांशिवाय तापायला काहीच उरलेलं नाही. पण इथं गुलाबी त्वचा काळवंडण्याचा धाक गावच्या तुलनेत जास्त आहे. एटीएमच्या खोलीतल्या थंडाव्याला चिंचेखालच्या गारव्याची सर नाही. एटीएममधला वॉचमन अन चिंचेखाली निवांत रवंथ करत बसलेली गाय यांच्यात मात्र एक साम्य आहे. दोघंही वैश्विक चिंतेपासून कोसभर दूर आहेत.

आडाच्या कठड्यावर बसून कपाळाला उपडा हात लावून उन्हाच्या झळा आडवत येणाऱ्या-जाणाऱ्याला उगाच दूरपर्यंत न्यायहळणारं एकलकोंडं म्हतारं…खोल-खोल आडाच्या कपारीतून झुळझुळणाऱ्या झऱ्यात मस्तीत डुंबणारी उनाड साळुंखी… आडाच्या बाजूला साचलेल्या गटारात खपाटीला गेलेलं पोट लयीत खालीवर करत पहुडलेलं कुत्र्याचं पिलू…

भाद्रपदात गाभ जाऊन ३ महिने ३ दिवस पुरे करून सांदीकोपऱ्याला बुळबुळ व्यलेल्या भटक्या कुत्र्यांची नुकत्याच डोळे उघडून गल्लीबोळात फिरणारी अन दिवाळीच्या थंडीत विझलेल्या शेकोट्यांच्या राखेत ऊब शोधत झोपी जाणारी पिल्लं नेहमीप्रमाणे कधी ट्रॅक्टरच्या चाकाखाली, कधी आडात पडून तर कधी भुकेनं व्याकूळ होऊन मेली. त्यातून एकअर्ध वाचलेलं पिलू असावं ते. गावातल्या वैशाखात टिकून राहणाऱ्या मोजक्या शाश्वत गोष्टींपैकी तेही एक.

मोकळं जगायला मोकळं आकाश पाहिजे. झाडांमधून डोकावणारा चंद्र दिसावा लागतो. खळ्यावर झोपून सगळं आभाळ बोकांडी घेत चंद्र जिथं पाहिजे तिथं उभा करून मनभरून निरखता येतो. इथली शहरी झाडं, फुलं, इथलं आभाळ नी या हॉस्टेलच्या छोट्याशा खिडकीतून दिसणाऱ्या चतकोर आभाळातला चंद्रही उदास होऊन आपल्याकडं बघतो.

आज अशीच अचानक अंधारलेल्या संध्याकाळी त्याने आपल्या आगमनाची चाहूल दिली. कुंडीतलं इवलंसं मलूल रोपटं नुकतंच झोपेतून उठून अळोखे देणाऱ्या बाळासारखं तजेलदार दिसलं. उंच उंच इमारतींना वारा कोडग्यासारखा भिडला. त्याच्यामुळं उडायला इथल्या रास्यांवर धुळही शिल्लक नाही. पावसात काही भिजेल म्हणून आत घ्यायला सुद्धा काही नाही. त्याच्या येण्यानं कोणाचं काहीच बंद पडत नाही. रस्त्यावर फेरीवाल्यांची चाललेली धडपड आणि फेसबुकवर कवितांचा फुटलेला तुंबारा एव्हढीच काय ती त्याच्या आगमनाची वार्ता.

गावाकडच्या पावसाला नादान, उनाड वासरासारखं खिंदळत मस्ती करत येण्यात मजा वाटते. किवली, तकलादू पत्र्याची घरं बघून वाऱ्याला आणखीच फुऱ्यान चढतं. पारावरच्या लिंबाच्या झाडाला तो गदागदा हलवून घाबरवतो. लाईट क्षणात घालवून अंधारून आलेल्या वातावरणात आणखी गुडूप काळोख करून गाव रातकिडे आणि बेडकांच्या हवाली करून शांत होतो. पाण्याच्या पहिल्या थेंबाबरोबर दारात वाळत घातलेलं वाळवण अन दोरीवरचं धुणं आठवतं. पत्र्यावरच्या लाल मिरच्या पावसाबरोबर पणाळीतून अंगणात पसरल्या तेव्हा लक्षात येतात. पत्र्यांवर आदळणारे टपोरे थेंब लयीत ताशा वाजवल्यासारखे घर दणाणून सोडतात. त्यामुळे अधिच मोठ्याने बोलणारी माणसं आणखी मोठ्याने बोलताना गमतीदार वाटतात. गोठ्यात अन शेतात असलं-नसलं झाकायला विजांच्या उजेडात अनवाणी पळणारी मळकट माणसं आणि त्यांच्याच चिंतेत ओल्या सरपणावर रॉकेल ओतून चूल पेटवणारी घरधणीन यांना पाऊस खुनशी पण नाजूक सोयरा वाटतो.

इथं आधारलेलं आभाळ पाहायला पाऊसवेड्यांची रस्त्यावर गर्दी झाली. अपार्टमेंटच्या खिडक्यांमधून बाहेर आलेले हात भरलं आभाळ झेलायला आतुरले. गॅलरीत आभाळाकडे नजर लावून बसलेल्या पेन्शनरांचे डोळे हसायला लागले. धुळकटलेली झाडे तजेलदार व्हायला उत्सुक झाली. बाहेरचं आभाळ बघून खिडकीवर टेकलेलं डोकं खिडकीशी अधिकच सलगी करू लागलं. कित्येक जणांना पावसात मनसोक्त भिजत असलेल्या गावाकडच्या मातीचा खरपूस गंध थेट इथेही आला. रानातला पावसाने सादळलेला पालापाचोळा अनवाणी पावलांना मनातल्या मनात गुदगुल्या करून गेला. डोंगरावरच्या उंच सागांच्या झाडांवर उतरलेले ढग मनातल्या मनातच कित्येकांनी मुठी आवळून बंद करून घेतले. हातातल्या चिप्समध्ये गुराख्याच्या फडक्यात भिजलेल्या भाकरीची चव क्षणभर तरळून गेली.

मावळतीची वेळ. अर्धवट अंधार अर्धवट प्रकाश. बाहेर भरून आलेलं आभाळ नि त्या आभाळाच्या वेड्यावाकड्या आकाराच्या प्रत्येक ढगात भरून आलेल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी. त्या आठवणींना सोबत करणारी प्रत्येकाची वेगळी वेगळी गाणी. त्या गाण्यांना सोबत करणारे हळूहळू ओघळू लागलेले खिडकीच्या काचेवरचे थेंब. स्वतःतच स्वतः भिजणारा हा शहरी पाऊस.

शहरातल्या उरल्यासुरल्या मातीचा दरवळणारा गंध मात्र इथंही भाव खाऊन जातो. गावाकडचं भिजरं अंगण डोळ्यासमोर तरळत असताना त्या मातीशी नातं सांगायचा इथल्या मातीचा प्रयत्न फार केविलवाणा वाटतो. पण तो मनापासून स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. घटकाभर चाललेल्या या पावसाला शहरातला इवलासा निसर्ग तजेलदार रूप मिरवत, गूढ हसत सामोरा गेला. गुलमोहराच्या लालभडक फुलांमध्य पळस शोधावा तसा त्यांच्या पाकळ्यांवर बसून हसणारा आणि पानांवरून निथळणारा पाऊस आम्हाला लोभाच्या भावकीतला वाटला.

पाकळ्यांवरचे ते हसरे पावसाचे थेंब पाहिल्यानंतर आम्हाला जाणवलं की शहरातला पाऊसही गावाकडच्या पावसासारखीच माया करतो….!
सोमनाथ कन्नर
Kannarsomnath@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us