बॉम्ब आणि पिस्तुल पलिकडचा भगतसिंग जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा आपली भगतसिंहासोबत खास मैत्री होते…तेव्हा आपल्याला समजु लागते भगतसिंग आपल्यासारखाच एक कार्यकर्ता. थट्टा मस्करी करणारा, पुस्तक वाचणारा,सिनेमे पाहणारा,सौंदर्याची तारीफ करणारा, कलेवर प्रेम करणारा, मित्रांसोबत रात्ररात्रभर चर्चा करणारा, मित्र चुकल्यावर त्यांना खडेबोल सुनवणारा आणि वेळेप्रसंगी त्यांना पाठीशीही घालणारा भगतसिंग जेव्हा आपण जाणतो तेव्हा तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कधी होऊन जातो हेही आपल्याला लक्षात येत नाही.

द्वारकादास लायब्ररी आणि भगतसिंग यांच खास नात…कॉलेजमध्ये असताना आणि जेल मध्ये कैद असतानाही भगतसिंगांच नात या लायब्ररीबरोबर तुटल नाही.कॉलेजमध्ये असताना भगतसिंग आणि त्यांच्या साथिदारांच कायम लायब्ररीत जाण-येण असायचं…कधीकधी प्रेमावरही चर्चा व्हायच्या…भगतसिंग कधी हा विषय काढत नसायचे..पण मित्रांनी विषय काढल्यावर ते त्या चर्चेत कायम भाग घ्यायचे…

एकदिवस असेच राजाराम शास्रींनी त्यांना कायम क्रांतीच करणार का कधी लग्नाचा सुद्धा विचार करणार हा प्रश्न विचारला ? तेव्हा भगतसिंग म्हणु लागले, भाई उच्चकोटीचे प्रेम करायचे म्हणल्यावर समाजामध्ये स्वातंत्र्याचे वातावरण पाहिजे जिथे प्रेममय जीवन जगताना त्या मुलामुलीवर कोणी हात दाखवता कामा नये…आपण गुलामीच्या वातावरणात जन्मलेलो आहे..आपला समाज असा नाहीये कि जिथे मुलगा मुलगी प्रेम करण्यासाठी स्वातंत्र्य आहेत…खर प्रेम माणसाला खुप वर नेते, संकटांत सावरत असते, एकमेकांवर मोहित झाल्याची भावना निर्माण होते परंतु तेव्हा फक्त दोघांमध्ये प्रेम असायला हवे त्यामध्ये विलासिनतेची भावना असायला नको…

आणि राहिला माझा प्रश्न, आपण गुलाम देशाचे युवक आहोत , आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपल्या मातृभुमीची पारतंत्र्यात अडकलेली बेडी सोडवण्याचा असेल…या जन्मात तरी मला देशासाठी हौतात्म्य पत्करायच आहे…कदाचित फाशीच्या फंद्याचे चुंबनही घ्यावे लागेल…त्यामुळे या वातावरणात आणि या परिस्थितीत मी प्रेमाकडे आकर्षित होऊ शकत नाही.

देश स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा कधी मी दुसरा जन्म घेईल तेव्हा मात्र मी प्रेमिकेच्या मांडीवर डोके ठेवलेले असेल, तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी बोलेल इतकच नाहीतर माझ संपुर्ण जीवन तिच्या प्रेमात आकंठ बुडवलेले असेल. मात्र या जन्मात तरी मी लग्न करणार नाही. .तसा मी पण तरूण आहे, माझ्या अंगातही गरम रक्त वाहतय, माझ्या मनातही प्रेमाची भावना निर्माण होते पण इतकीही नाही कि, माझे माझ्या ध्येयावरून लक्ष विचलित होईल.

स्वप्नील सुरेश घुमटकर
ghumatkars@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us