‘यूपीएससी’मध्ये चमकलेल्या पोरा-पोरींच्या कौतुकाच्या बातम्या सध्या गावभर सुरू आहेत. जोडीला ‘कोचिंग क्लासेस’च्या मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत. बापाने जमीन विकली आणि पोरगी अधिकारी झाली; टेम्पोचालकाचा पोरगा कलेक्टर झाला, वगैरे बातम्यांचा पाऊस पडतोय.
अशावेळी ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही”, अशी स्थिती असलेल्या पोरा-पोरींकडे कोणाचे लक्ष नाही. स्पर्धा परीक्षांचा बाजार सध्या एवढ्या तेजीत आहे की अशा मुलांकडे लक्ष जाण्याचेही कारण नाही. बाजाराला दरवर्षी नवे नायक मिळतात. हे नायक ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ होऊन जातात. त्यांच्या भाषणांनी बाजाराला आणखी नवे बकरे मिळतात. असा हा प्रवास सुरू असतो.
‘यूपीएससी’साठी बारा लाख अर्ज आले तर त्यातल्या आठशे लोकांना पोस्ट मिळते. ‘एमपीएससी’मध्येही हे असेच प्रमाण आहे. हे आठशे लोक सगळीकडे झळकतात. बाकीच्या लोकांची स्थिती काय आहे, हे कोणी विचारायला जात नाही पुणे, मुंबई, नागपूर आणि दिल्ली ही आपल्याकडे ‘यूपीएससी’ची मुख्य सेंटर आहेत. इथं भरपूर विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला येत असतात. त्यांच्यासाठी राहायला खोल्या, पेइंग गेस्ट्स, अभ्यासिका, पुस्तकं, क्लासेस, खाणावळी असा एक वेगळा बाजारच उभा राहिला आहे. कोणी हरो वा जिंको, बाजार तेजीत असतो. दरवर्षी नव्या हीरोंवर गुलाल उधळला जातो आणि त्याचवेळी कोणीतरी गळफास घेऊन आत्महत्या करत असतो. या आत्महत्यांच्या बातम्या लक्षणीय प्रमाणात असूनही त्यांची दखल घेतली जात नाही. बाजार या परीक्षेचा असो अथवा आयपीएलचा, बाजाराला स्टार लागतातच. त्यामुळे चमचमते स्टार महत्त्वाचे. या अशा आत्महत्या होतच राहणार.
वयोमर्यादा संपेपर्यंत पोरं अभ्यास करत असतात. शेवटी ती पोरंही राहात नाहीत, अशा वयाची होतात. वंचित समूहांची वयोमर्यादा अथवा ‘ॲटेम्प्टस’ची संख्या यात शिथिलता असल्यामुळे त्यांची स्थिती आणखी भयंकर होते. तिशीच काय चाळीशी उलटलेली अशी अपयशी माणसं या बाजारात रुतलेली असतात. अखेर त्यांचा बाजार उठतो आणि आयुष्यात काय करायचं हा प्रश्न अनुत्तरित राहातो. शनिपारावर बेघर- गरीब लोकांसाठी जे अन्नदान केले जाते, त्या रांगेत ही माणसं दिसतात. सगळेच दोर कापले गेले की अखेरीस ते गळ्याला लागतात. पण, या संदर्भात कोणीच कधी बोलत नाही.
जी मुलं ‘क्वालिफाय’ होतात, ती फार बुद्धिमान असतात, असं नाही. जी होत नाहीत, ती अपात्र असतात असंही नाही. परीक्षा नावाचं प्रकरण फार विश्वासार्ह असतं, असंच मुळी नाही. काहींचा मटका लागतो. काहींचा लागत नाही. लागला तर एकदम मालामाल. नाही लागला तर आयुष्याची दाणादाण. कोणाचं काही होवो, क्लासेसच्या नव्या इमारती उभ्या राहातात. प्रकाशनं आणि पुस्तक विक्रेते गब्बर होतात. यांच्यासाठी खाणावळी चालवून मेसमालकांची पोटं सुटतात. अभ्यासिका सुरू करणारे विनासायास श्रीमंत होतात.
मुळात, हे घडते कशामुळे?
अमेरिका वा युरोपातल्या देशात सरकारी नोक-यांचे हे असले गारूड नाही. तिथं बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी मुलं संशोधन, व्यवस्थापन, तंत्रज्ञान, पत्रकारिता, कला, शिक्षण, आरोग्य, लॉ, फायनान्स, बॅंकिंग, राजकारण, स्वतंत्र उद्योग अशा अनेकविध क्षेत्रांकडं वळतात. आपल्याकडं सगळ्यांना सरकारी नोकरी किंवा मग आयआयटी- आयटी एवढंच कसं करायचं असतं? त्यातही शहरातल्या मुला-मुलींचा कल आयटी-आयआयटीकडं आणि खेड्यातल्या मुलांची भिस्त स्पर्धा परीक्षांवर. त्याशिवाय जगात कोणाला काही करायचं नसतं!
ब्रिटिशांनी ज्या देशांवर राज्य केलं, तिथं हे साहेबी नोक-यांचं आकर्षण भयंकर आहे. शिवाय, त्यांना मिळणारा मानमरातब, त्यांचे नोकर-चाकर, त्यांच्याकडं असणारी निरंकुश सत्ता, पैसे मिळण्याच्या वेगवेगळ्या वाटा आणि कमाल सुरक्षितता यामुळं या नोक-यांचं भयंकर आकर्षण. अशा अधिका-यांना ‘आयकॉन’ वगैरे मानण्याची मानसिकता. माध्यमांनी ती आणखी वाढवली. व्यवस्थेविषयी नाराजी असते. राजकीय नेत्यांविषयी घृणा असते. पण, तीच व्यवस्था चालवणारे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारीही सगळ्यांचे आयकॉन असतात. दुसरा मुख्य मुद्दा आहे तो वेगळाच.
आपल्याकडे, ‘आयुष्यात पुढे काय होणार’, याचं फार कौतुक असतं. अगदी लहान मुलालाही ‘मोठा झाल्यावर तू काय होणार?’ असले प्रश्न विचारायला आपल्याला भलतं आवडतं. मुलांना खरंतर बरंच काही व्हायचं असतं.
मला आठवतं. माझ्या मुंबईस्थित सहका-याचा मुलगा परवा वडिलांसोबत आला होता. त्याला कोणीतरी विचारलं – “मोठा झाल्यावर तू कोण होणार?” बारा-तेरा वर्षांचा तो गोड चिमुरडा भारी हसला. म्हणाला, “मला राष्ट्रपती व्हायचं होतं. कारण त्यांचं घर मोठं असतं. पण, आता प्लान मी चेंज केला. आता मला ‘आर्किऑलॉजी’ शिकायचंय. किंवा वैमानिक व्हायचंय. पण, आई म्हणते की सायंटिस्ट हो. बघू, काय ठरतंय!”
अशा अनेक वाटा पोरांना खुणावत असतात. पण, त्यांच्या नकळत्या वयात आपण त्या वाटा बंद करतो. एकच वाट त्याला दाखवतो किंवा तीच दिसेल, अशी व्यवस्था करतो. आणि मग ‘फोकस्ड’ काम करायचं. एकदम ‘एकच तारा समोर आणि पायतळी अंगार’! अरे, कशाला एकच तारा समोर. अवघं आकाश आहे समोर. मस्त सगळं बघ. सगळ्यातली मजा घे. धमाल कर. ठरव आयुष्यात काय करायचंय!
जगायला असे किती पैसे लागतात? आणि, हव्या त्या वाटेने छान पैसे मिळतातच. अगदी ओला-उबेर चालवणारा महिन्याला लाखभर रूपये मिळवतो. पुस्तकं विकणारे लोक आनंदात जगू शकतात. स्पर्धा परीक्षा करणा-या पोरांना वेगवेगळ्या रंगात सोडा विकणारा गडीही मस्त नोटा छापतो. पैसे मिळतात कुठेही आणि जगायला फार काही पैसे लागत नसतात. आपल्याला आपल्या टर्म्सवर जगता येणं महत्त्वाचं.
‘फोकस्ड’ याला मी तर एकारलेले असे म्हणतो. आता एखादा चिमुरडा आठवीत असतानाच कोट्याला आयआयटी तयारीला जाईल, तर त्याचं बिचा-याचं आयुष्य काय असणार आहे पुढं? तो झाला अथवा नाही झाला तरी! मुलांना हवं ते करता आलं पाहिजे. करू दिलं पाहिजे. आणि, काही केलंस वा काही नाही झालास, तरी काही बिघडत नाही, हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. एका साच्यातनं काढून सगळ्यांनी एकसाची व्हावं, असा मूर्खाग्रह त्या पोरांचं अख्खं आयुष्य बरबाद करत असतो. शिवाय, त्यातून त्या त्या क्षेत्रांना हवं असणारं टॅलेंट मिळत नाही, ही आणखी वेगळीच सामाजिक समस्या.
आनंदानं जगता येणं आणि आपल्याला हवं ते करता येणं हेच महत्त्वाचं असेल, तर जगण्यापुरते पैसे मिळवणे ही फार मोठी अडचण नसते. पण, नस्त्या प्रतिष्ठेच्या- सामाजिक धारणांच्या ओझ्यामुळे आपण ही संधी घेतच नाही. लोकांनी आपल्याला सॅल्यूट ठोकावा, वरचे पैसे मिळावेत आणि नोकरी कायमस्वरूपी असावी या असल्या फालतू आकर्षणापोटी स्पर्धा परीक्षांचं खूळ आपण तयार करून ठेवलं आहे.
दरवर्षी दोनेक हजार मुलं सरकारी अधिकारी होत असतील. गेल्या दहा वर्षांत अशी वीस-पंचवीस हजार मुलं अधिकारी झाली असतील. कुठं गेली ती मुलं? आज तुमच्या समाजाचे खरेखुरे आयकॉन कोण आहेत? ते वेगळेच आहेत. वेगवेगळ्या वाटा चोखाळणारे आहेत. निवृत्त झालेल्या आयएएस अधिका-यांना विचारा. मग ते तुम्हाला त्यांच्या एकाकीपणाच्या कथा सांगतील. याउलट सृजनशील माणसं निवृत्तीनंतरच्या वयात अधिकच बहरलेली दिसतील. मग ते, बाबा आढाव असोत की आमच्या ज्योती सुभाष. जयंत नारळीकर असोत की रतन टाटा किंवा सुनील गावसकर. भालचंद्र नेमाडे असोत की तारा भवाळकर वा यशवंत मनोहर.
‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ असलं एकारलेपण तुमच्या मुलांना देऊ नका. त्यांच्या पायतळी अंगार पसरवू नका. आणि, समोर अवघं आकाश खुणावत असताना, त्यांना एकाच ता-यावर ‘फोकस’ करायला सांगू नका.
विजय तेंडुलकर म्हणाले होते ते खरं. माणसानं मांजरासारखं असायला पाहिजे. किचनच्या ओट्यावर दिसेल त्या भगुन्यात (पातेल्यात) तोंड घालायला हवं. एका भगुन्यात तोंड घातलं की जिभेला काही चव लागते. लगेच दुस-या भगुन्यावरचं झाकण पायानं दूर सारायचं आणि त्यात तोंड घालायचं. सगळ्या चवी बघा लेको. आयुष्य छान आहे. तुमच्या मुला-मुलींना मोठेपणी काही करू नका. मुळात त्यांना असलं मोठंच करू नका की जे त्यांचं बालसुलभ कुतुहल संपवून टाकेल. कोणत्याही साच्यात टाकू नका मुलांना.त्यांना जगायला शिकू द्या. त्यांना जगू द्या.मग बघा, घरोघरी आनंदाचे झरे सापडतील.
संजय आवटे ( sunjaysawate@gmail.com )