छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला जगण्याची दिशा देऊन गेले. महाराजांनी त्यांच्या जगण्यातून दिलेल्या वैचारिक, सामाजिक आणि राजकीय शिकवणुकीला समजून घेत आजही असंख्य मावळे तत्कालीन इतिहासाचा, गड-किल्ल्यांचा आणि घटनांचा अभ्यास करत आहेत. याच असंख्य मावळ्यांपैकी एक हरहुन्नरी मावळा म्हणजे स्वप्निल कोलते पाटील. स्वप्निलसाठी महाराज, रायगड आणि इतिहास म्हणजे जीव की प्राण. त्यांच्या याच इतिहासप्रेमातून ‘मुकद्दर’ या अप्रतिम कादंबरीची निर्मिती झाली.
गेल्या वर्षभरात या कादंबरीने हजारो मराठी वाचकांची मनं जिंकली आहेत. स्वप्निलच्या नवनिर्मितीची ही फक्त सुरुवात होती, ते अजून खूप बहरले असते, पण ‘मुकद्दर’ लिहिणाऱ्या स्वप्निलसोबत नियतीनेच घात केला. वर्षभरापूर्वी स्वप्निल आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांची उणीव कधीच कुणी भरून काढू शकणार नाही.
छत्रपती, रायगड आणि इतिहास याच्याही पलीकडेही स्वप्निल हे एक गोड कवी, एक प्रेमी आणि एक संवेदनशील माणूसही होते, हे अनेकांना माहीतही नव्हतं. स्वप्निलच्या कविता वाचून एखाद्या नाण्याच्या दोन्हीही बाजू एवढ्या खणखणीत कशा असू शकतात, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
उनाड म्हणून जगणाऱ्या व्यक्तीचा ‘उनाड’ हा कविता संग्रह.