Sagla Ulathvun Takala Pahije (सगळ उलथवून टाकलं पाहिजे)

250

Availability: 99 in stock

SKU: 9789385565403 Category: Tag:

‘सगळे उलथवून टाकलं पाहिजे’ या कवितासंग्रहात कवी देवा झिंजाड यांनी जगण्याच्या मुशीत तावूनसुलाखून निघालेले अनुभव शब्दबद्ध केलेले आहेत. अनेक पदरी अनुभवांचा सुंदर गोफ म्हणजे या कविता आहेत. या कवितांमध्ये ओळी-ओळींतलं सामाजिक भान आपल्याला विचार करायला भाग पाडतं. कोवळ्या मनानं गावखेड्यात सोसलेले चटके, गरिबीनं होरपळलेलं हळवं मन विचारी झाल्यावर तुलना करू लागतं. तो काळ आणि हा काळ यातली स्थित्यंतरं टिपू लागतं. विरोधाभास, उपहास सहजपणे बोलण्या-लिहिण्यात येऊ लागतो. मग सगळं उलथवून टाकण्याची उर्मी भाषेत येते. क्रांतीची भाषा बोलली जाते.

अंतरीची ओल घेऊन आलेलं साहित्यच काळाच्या पटलावर टिकून राहतं. डोक्यावरून ओझं न्यायचं असेल तर रूतू नये म्हणून आपण ओझ्याखाली चुंभळ घेतो. ओझं जरा सुसह्य करतो. तशाच प्रकारे कवितेची चुंभळ करून वास्तवाचं ओझं पेलत कवी झिंजाड आपलं जगणं सुसह्य करतात.

Weight 191 g
Writer

Deva Zinjad

Number of Pages

141

Reader's Reviews

  1. Review: 1
    ‘माणसाचा मेंदू नांगरून काढणारा सात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह- सगळंं उलथवून टाकलं पाहिजे.'(मी समीक्षक किंवा परीक्षक नाही परंतु मनाला जे वाटलं ते मी लिहित आहे.)

    कवी-लेखक देवा झिंजाड यांचा “सगळंं उलथवून टाकलं पाहिजे” हा भयंकर वादळी व थेट भाषेत लिहिलेला कविता संग्रह वाचायला घेतला आणि कुठे थांबावसंच वाटेना..
    पुढे काय? पुढे काय? पुढच्या कवितेत अजून काय परखडपणे मांडलंय? अशी मनाला ओढ लागली.
    खरंतर. अशी ओढ कथा वाचताना निर्माण होत असते. परंतु हया कवितासंग्रहातील कविता वाचताना मन इतकं हळवं झालं की, पुढील कविता कोणती असेल हया उत्सुकतेपायी एका बैठकीत कविता संग्रह संपूर्ण वाचून काढला. तरीही मनाचे पूर्ण समाधान झालेच नाही. त्यामुळे निवांत वेळ मिळाल्यावर पुन्हा काही निवडक कविता वाचून काढल्या. मन तृप्त झाले. बऱ्याच वर्षांनी मराठी कवितेत काहीतरी दर्जेदार वाचायला मिळाल्याचं समाधान लाभलं. ह्यातल्या प्रतिमा आणि प्रतीके आजवर तरी मला कुठं वाचायला मिळाली नाहीत.
    एखादं बियाणं जसं मातीत रुजून छोटंसं रोपटं जमिनीवर हळूच डोकावतं आणि पुढे हळुहळू त्याचा वटवृक्ष होऊन वा-यावर डौलाने डोलू लागतो. त्याप्रमाणेच प्रत्येक कविता ही कवी मनात रुजून परिस्थितीशी झुंज देत त्याचा भला मोठा वटवृक्ष कवितासंग्रहाच्या रूपाने दिमाखाने डोलत आहे. प्रत्येक कवितेतून जिवाभावाच्या मातीचा सुगंध दरवळतो आहे, असे प्रत्येक कविता वाचताना वाटत राहतं.
    कविता वाचल्यावर कवितासंग्रहाचं नाव “सगळंं उलथवून टाकलं पाहिजे” किती समर्पक आहे याचा प्रत्यय आला. कवितेची भाषा जीवाला कवितेचा लळा लावते. अनेक कविता मी स्वत: जगत असल्याचा भास होतो. भुतकाळातील अनेक आठवणींना पुन्हा कवितेतून उजाळा मिळाला.
    स्त्री मनाचा वेध घेण्यात देवा सर उजवे ठरले. एखाद्या स्त्रीलाही जमणार नाहीत एवढे हळवे कंगोरे टिपून स्त्रियांच्या वेदना, दुःखे फार परखडपणे कवितेतून मांडली आहेत. ह्या कविता वाचताना माझं मन पुन्हा चुल, भाकरी, वासरं, शेतातील माती यांच्या भोवती घुटमळू लागलं, क्षणभर वाटलं उगंचच आपण लहानाचे मोठे झालो.
    प्रत्येक कविता काळजात खोलवर रुतून विचार करायला भाग पाडते. तसेच प्रत्येक कवितेवर एक कथासंग्रह लिहावा इतकी, मनाला व्याकुळ करून गेली प्रत्येक कविता.
    कवितासंग्रहात अनेक सामाजिक समस्यावर वास्तवाचे भान ठेवून लिहिण्यात आले आहे. प्रत्येक कविता समाजात जागृती घडविण्यासाठी मोलाचे योगदान देतील ह्यात अजिबात शंका नाही.
    कविता म्हटलं की अवघड भाषा, परंतु ह्या विचाराला छेद देत अत्यंत सोप्या भाषेत सरांनी कविता लिहिल्या आहेत. त्यामुळे वाचताना माणूस कवितांशी एकरुप होऊन समरस होतो. प्रत्येक कवितेविषयी लिहायला खूप काही आहे.
    हा संग्रह भाकरायन, अगतिकरण आणि हरवलेल्या हिरव्या बांगड्या ह्या तीन विभागात हा संग्रह आहे. प्रत्येक विभागातल्या कविता त्या-त्या शीर्षकाच्या नावाला न्याय देणाऱ्या आहेत. हिरव्या बांगड्या वाचून तर मला अनेकदा गलबलून आलं.
    1. ह्या संग्रहातली आई विषयी वाटणारी कवींची तळमळ आपल्याही जीवाला हुरहूर लावते,
    2. स्त्रीयांची कवितेतून मांडलेली व्यथा मन पिळवटून टाकते,
    3. महापुरुषांच्या चुकीच्या पद्धतीने साजरा होणा-या जयंती-पुण्यतिथी ह्याचा समाचार घेतला आहे,
    4. जगाचा पोशिंदा शेतक-यांच्या व्यथेचं वर्णन जीवाची घालमेल करणारे आहे,
    5. शहरीकरणामुळे माणसाचं झालेलं आगतिकरण मांडलेलं वाचताना अंतर्मुख व्हायला होतं.
    एकूणच कविता संग्रहाबद्दल लिहायला अजून खूप काही आहे. आपणही हा कवितासंग्रह आवर्जून वाचायला हवा म्हणून थांबते.
    सरांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा… तसेच पुढील कादंबरी, कवितासंग्रह लवकरात लवकर आम्हाला वाचायला मिळेल अशी अपेक्षा ठेवते व त्यासाठी शुभेच्छा देते.

    सुनिता दहिभाते, कोथरूड, पुणे

  2. एका वाचनवेड्या कवयित्रीचा अनमोल अभिप्राय.
    प्रस्थापित प्रश्नांकडे लक्ष वेधणारा-काव्यसंग्रह
    काव्यसंग्रह वाचताना खूप गोष्टी उलगडत गेल्या. खूप गोष्टी फक्त दिसल्या. खूप गोष्टी जाणवल्या आणि बऱ्याच गोष्टी दुर्लक्षित राहिल्या, असंही वाटलं. कवितेत सगळंच मावतं असं नाही आणि काहीच कवितेनं होत नाही असंही नाही.
    अशा वेळी नेमकं कवितेनं काय होतं? तर सभोवताली चाललेल्या घडामोडींची दखल कविता घेते. कविता काही घटनांच्या, स्थल, काळाच्या नोंदी ठेवते. प्रस्थापित व्यवस्थेला मांडण्याचं धाडस करते. त्यामुळे देवा झिंजाड हे कवी माणूस म्हणून जगताना कोणत्या परिस्थितीत जगले वागले हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. कवीची नाळ जर ग्रामीण जीवनाशी जोडलेली असेल, त्यात त्याला शहरी जगण्याची धग सोसावी लागली असेल तर, कवी मन प्रचंड अस्वस्थ असते. अशी कविता वाचक मनालाही अस्वस्थ करते.
    देवा झिंजाड हे नाव पहिल्यांदा वाचले आणि कुतुहल वाटलं. त्यांचं वास्तववादी लेखन मनाला भेदून गेलं. म्हणून हा काव्यसंग्रह मी मागवला. काव्यसंग्रह वाचताना कवीच्या वास्तववादी, परखड लेखणीचा अंदाज येऊ लागला. कल्पना दुधाळ या कवयित्रीनं प्रस्तावनेची एक सुंदर शिदोरी या काव्यसंग्रहाला दिली आहे. त्या म्हणतात, देवा यांच्या कविता स्वतःला भाकड होऊ न देणाऱ्या कविता आहेत आणि ते अत्यंत खरं आहे. या कवीच्या लेखणीनं स्वतःची नैसर्गिकता जपली आहे.
    या काव्यसंग्रहांतील देवा झिंजाड यांच्या पहिल्याच “टायघाल्या” कवितेनं मन उद्विग्न झालं. व्यवस्थेचा हा टायघाल्या. त्याला शेतकऱ्यांची दुःख कळत नाहीत.
    एकता कपूरच्या मालिका पाहून डोळ्यांत पाणी येऊन उपयोग नाही. तर शेतकऱ्यांची तडफड कळावी यासाठी कवी परखड भाष्य करताना दिसतात. ते म्हणतात,
    हैपी न्यू ईयरला विश करणाऱ्यांपेक्षा विषारी असतात
    मेथीचा भाव करून हाॅटेलात टीप देणारे फाईवस्टार हात
    पण कुणालाच कसे दिसत नाहीत
    जगाला जगवण्यासाठी स्वतःचं आयुष्य खुरपणारे
    करोडो अनामिक काळे हात
    शेतीवाडी पिकवली नाही तर
    कसा होणार आहे कंट्रोल..?
    आपण कधीच आपल्या अवतीभोवतीच्या जगाकडे डोळसपणे पाहात नाही. खूपदा डोळेझाक करतो. या काव्यसंग्रहात तीन विभाग आहेत.
    पहिला अगतिकीकरण- कवितेची शीर्षकही खूप बोलकी आणि समर्पक आहेत. उदा. चुंभळ, इंदिरा, त्याच त्याच कविता, डिजे, अर्धी बादली, वाटण्या, कोरडी बेटं, तहानलेले, भाकड प्रश्न, पाकिटातल्या कविता, नापीक डोकी, सगळंं उलथवून टाकलं पाहीजे, खऱ्याखुऱ्या रानात, वासुदेव, मेनुकार्डा शिवाय, कुलपं, इत्यादी मनात खोल उतरलेल्या कविता…
    दुसरा विभाग भाकरायण- अर्धी भाकर, एल्गार, श्रीमंत तुकडे, चूल, दुतोंडी इत्यादी.
    तिसरा विभाग-हरवलेल्या हिरव्या बांगड्या.. खरंतर तेच ते वाटण्याची शक्यता आहे. परंतु ही शीर्षक तितकीच महत्त्वाची आहेत. अडाणी, चिंचा, तरण्याबांड देवा, चिमनी, बोरी, आई म्हणते, लाल फेटा, बांगडी, कावळा शिवला की, बेसन भाकर, आढा, मायेचा देव्हारा…
    किती वैशिष्ट्यपूर्ण, समर्पक शीर्षक तितकीच बोलकी, तितकीच वाचकमनाला कविता अंर्तमुख करणारी आहे.
    जागतिकीकरणाच्या रेट्यात परिवर्तनाचं वारं सुटलं असताना माणसं अगतिक झाली आहेत. यंत्रयुगात परस्परांपासून दुरावत आहेत. उरल्यासुरल्या शाबूत मेंदूचे करत आहेत तंदूर, मोठमोठे कर्णकर्कश्श डीजे लावून बहिरे केले जात आहेत आपलेच महापुरुष. केवढं बोचरं शल्य उरात घेऊन फिरत आहे देवाची डिजे कविता..
    माणसांच्या मेंदूत विचारांची ज्योत पेटावी यासाठी देवा झिंजाड यांच्या कवितेनं रणशिंग फुंकले आहे. ते म्हणतात..
    जयंत्या, पुण्यतिथ्यांच्या नावाखाली भाजल्या जातात स्वार्थाच्या पोळ्या. ते मिटवत नाहीत कुणाच्याही नागड्या भुकेला..
    “सगळंं उलथवून टाकलं पाहीजे…!”
    खरंय प्रत्येक संवेदनशील आणि कष्टकऱ्यांच्या मनातली बोच, मनातली गोष्ट या कवितेत कवी सांगतात..
    मध्यमवर्गीयांना वेळ नाही
    श्रीमंतांना गरज नाही
    गरिबाला भिती वाटते
    ज्याच्याकडं सगळंं आहे त्याला लाज वाटते
    कशी करणार आहे क्रांती
    असल्या मनःस्थितीतला समाज?
    की लावायचे आता रोजाने क्रांतीकारक?
    कुठून आणायचे आता पुन्हा फुले-शाहू-आंबेडकर?
    काहीतरी केलं पाहिजे….!
    केवढी ही अस्वस्थता. कवीचं अंतःकरण किती ढवळून पिळवटून निघतं आहे, याची जाणीव होते. काहीतरी केलं पाहिजे. सगळंं उलथवून टाकलं पाहिजे. समाजव्यवस्था बदलली पाहिजे…
    अशा अनेक व्यथा वेदनांची कहाणी मांडून समाजातील अनेक स्तरांतील अनेक समस्यांवर, असाध्य रोगांवर आपल्या शब्दागणिक शस्त्रक्रिया करणाऱ्या कवितेला देवा झिंजाड मांडत आहेत.
    वाटण्या कवितेत कवी म्हणतात-
    एक आईवर गेला एक बापावर गेला
    वाटणीच्या टायमाला लेक बायकोवर गेला…
    बा घेतला थोरल्याने आई नेली धाकल्याने
    सही घेऊन बहिणीची केली वाटणी व्याह्याने
    किती वास्तव परिस्थिती लिहिलीय.. किंबहुना समाजाला निश्चितच काही विचारू पाहणारी, देऊ घालणारी देवांची कविता असं म्हणायला हरकत नाही.
    कमाल वाटणारी भाषाशैली साधी सरधोपट म्हटलं तर कितीतरी वाक्ये फक्त गद्यच आहेत. यामध्ये उत्तरोत्तर अजून दमदार अशी त्यांची कविता बहरत जाईल यात शंकाच नाही.
    तरीही वैशिष्ट्य म्हणजे काव्यरूपात परखड भाष्य करणारा धारदार विषय आशय मांडला. अनेक विषय ग्रामीण भागातील प्रश्नावर भाष्य करत आहेत. जागतिकीकरण आणि त्याचे मानवी जीवनावर प्रत्यक्ष होणारे परिणाम, गाव आणि शहर यातल्या अनेक समस्या या मानवनिर्मित आहेत. माणसांच्या अविचारी बोलण्यात, वागण्यात आहेत. राजकारण्याची सत्तापिपासू वृत्ती आणि माणसां-माणसांमधील असंघटित प्रवृत्ती. तसेच ग्रामीण आणि शहर यातल्या तफावती, शेतकऱ्याविषयीची अनास्था, मानवी नातेसंबंधातील स्वार्थांधंता, आटलेली माणुसकीची ओल, वादविवाद, यामुळे निर्माण होणाऱ्या वेदना देवा झिंजाड यांच्या कवितेचा विषय होतात. आदर्श गावातला फोलपणा दाखवून देत व्यवस्थेवर टिपणी करणारी कविता लिहिणारे देवा झिंजाड हे कवी म्हणूनच स्वतःच्या जाणीव नेणीवेच्या पातळीवर अत्यंत तरल आणि संवेदनशीलतेनं आपली कविता अत्यंत नैसर्गिकपणे मांडताना दिसतात. तिथं कृत्रिमतेचा लवलेश सापडत नाही किंवा कोणत्याही काव्यलेखनाच्या शैलीचे बंधन आढळत नाही. ही कविता अंगभूत कवीचा स्वभावविशेष घेऊन अवतरताना दिसते आहे. कवीच्या कवितेतल्या गुणदोषासह प्रामाणिक माणूस म्हणून व्यक्त होण्याला सलाम करावासा वाटतो. त्यांची कविता अशीच बहरत जावो.
    या काव्यसंग्रहाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गौरविण्यात आले आहे, यासाठी कवींचं अंतःकरणातून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!
    अनेक समकालीन कवी अत्यंत परखड वेगळ्या वळणाचं लिहिते झालेत याचा आनंद अवर्णनीय आहे.
    अनेकानेक शुभेच्छा!!!प्रा.निर्मला चव्हाण-शेवाळ (आनंदिता)
  3. कवी देवा झिंजाड लिखित
    ” सगळंं उलथवून टाकलं पाहीजे”न कळत्या वयात शाळेतील अभ्यासक्रमात फक्त मार्क मिळवण्यासाठी जे काही शिकवलं गेलं आणि बुक्क्या घालून मास्तरांनी जे वाचायला लावलं तेवढं सोडलं, तर हे साहित्य आणि साहित्यिक म्हणजे नेमकं काय? हेही धड माहीत नसलेल्या माझ्यासारख्या अजाण वाचकाला
    सध्या सोशल नेटवर्किंगमुळं निदान हे सगळंं बघण्याची एक संधी मिळाली आहे. त्यातूनच हे सगळंं बघता वाचता एक वेगळी दृष्टी मिळून याबद्दलची गोडी निर्माण झाली आहे, एवढं मात्र नक्की खरं आहे.

    या माध्यमातून आजवर माहीत नसलेल्या बर्‍याच साहित्यिक बाबी आणि मराठी साहित्यिक समोर येऊ लागलेत आणि माहितही होऊ लागले आहेत. अशाच या उत्सुकतेपोटी फेसबुक चाळताना सामना झाला तो कवी देवा झिंजाड यांच्या ह्या “सगळंं उलथवून टाकलं पाहीजे” या पुस्तकाचा.

    पहिल्यांदा या पुस्तकाचं शीर्षक वाचून नक्कीच वेगळं काही तरी वाचायला मिळेल अशी उत्सुकता निर्माण झाली. पुस्तक हातात पडताच अधाशासारखं निरखून पाहिलं. एका सुंदर धाटणीचं आणि वेगळ्या प्रकारच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून तर अगदी शेवटच्या पानापर्यंत भारदस्त अशी एक वेगळीच वजनदारी जाणवली.

    आज शहरात सणासुदीला छान वाटावं म्हणून फ्लॅटला रंगरंगोटी केली जाते. दारावर छानसं बाजारातून रेडीमेड आणलेलं तोरण बांधलं जातं. सगळंं कसं टापटीप वाटतं. पण हे पुस्तक बघून भूतकाळ आठवला. मातीच्या त्या भिंती आठवल्या. सणासुदीला त्या भिंतींवर पडलेले ते खड्डे लिंपताना आईची चाललेली लगबग आठवली. शेणाने सारवलेल्या त्या भुईवर लहानाचे मोठे कधी झालो ते कळलंच नाही.

    जणू काही तीच ग्रामीणता मनात भिनून जसं एखादं दुःख आयुष्यात झिरपावं, एखादी वेदना अंगात मुरावी, अशा प्रकारे जखमांनी सजलेल्या या पुस्तकालाही त्याच ग्रामीणतेचा तोच गडद रंग चढला आहे की काय? असंही क्षणभर वाटून जातं.

    कविता जेव्हा प्रेमात असते, तेव्हा तिच्या ओठांचं, गालांचं, नजरेचं, अदेचं खूप कौतुक होतं. तेव्हा ती नक्कीच छान दिसते. पण जेव्हा तीच कविता एका सामान्य माणसाची व्यथा भोगायला निघते, तेव्हा मात्र ती काळीज पिळवटून टाकणारी असते आणि हे पुस्तक म्हणजेच अगदी तशाच काहीशा आर्त वेदनेची किंकाळी आहे की काय असं जाणवतं.

    महाराष्ट्राच्या या मराठीपणाला लौकिक अर्थाने झळकताना अनेकदा वैभवशाली राजवैभव भोगताना आपण बरेचदा पाहिलंय. त्याचा आपण सर्वांना अभिमानही आहे आणि तो असायलाही हवा. झगमगीत शहरं आणि त्याबद्दलची ओढ आज प्रत्येकालाच आहे. या झगमगीत दुनियेचं आकर्षण तर आहेच, पण या झगमगाटामागे लपलेला याच महाराष्ट्रातील ग्रामीण माणसाच्या अंतःकरणावर पसरलेला एक काळोखही आहे.
    एकीकडचा हा शहरी झगमगाट बघून दुसरीकडे पडलेल्या त्या काळोखाचाही अभिमान मानावा की खेद? असाही संभ्रम हे पुस्तक वाचताना निर्माण होतो.

    तो काळोख जर बघायचा असेल तर प्रत्येकाला आपल्या डोळ्यांची टाॅर्च घेऊन निघावं लागेल ते डायरेक्ट महाराष्ट्रातील ग्रामीण भागाकडे.
    याच ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी त्या प्रत्येक मराठी माणसाला कवी देवा झिंजाड यांनी वाटाड्याच्या भूमिकेतून निश्चितच या पुस्तकरुपाने तो एक मार्ग नक्कीच तयार करून दिला आहे.
    त्या अंधारातून उजेडात येऊन पुस्तकरुपाने प्रखरपणे आज त्यांचं हे कवित्व झळकताना जरुर दिसतय, पण भूतकाळातील परिस्थितीच्या सोसलेल्या तीव्र झळा आणि गरीबीच्या असह्य कळा मात्र आजही त्यांच्या काळजात तशाच धुमाकूळ घालत आहेत. याचा प्रत्यय त्यांचं हे पुस्तक वाचताना नक्कीच येतो.

    खरं तर याच ग्रामीण माणसाच्या जीवावर
    ह्या सगळ्या झगमगाटाचा डोलारा उभा आहे.
    पण या सग चे चोचले पुरवताना…

    बाळा मला भूक नाही,
    असं आई जेव्हा म्हणायची..

    आमच्या टोपल्यात तेव्हा
    अर्धी भाकर असायची..

    पोटभर जेवायचो मी,
    पाणी पिऊन ती झोपायची,

    पोट रीकामं असायचं,
    गच्च डोळे ती मिटायची…

    अशा प्रकारच्या पुस्तकातील या ओळी वाचल्या की वाटतं, तोच ग्रामीण माणूस किती आणि कुठल्या कुठल्या ओझ्याखाली दबला गेलेला असेल? काय म्हणत असेल त्याचा आत्मा अशा अवघडलेल्या वेळी? मन अगदी सुन्न होऊन जातं. पण त्याहीपुढे जाऊन,

    पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची
    ‘कष्ट करून मोठा हो’ मनात संस्कार पेरायची

    आईच्या श्रीमंतीवर गरीबी कायम भाळायची
    एकुलतं एक लुगडं धुवून रात्रीच वाळवायची

    हे दिसणारं चित्र अगदी वेगळंच आहे…
    उद्याची सारी स्वप्नं बघताना आज मितीला आयुष्याला पडलेली ही परिस्थितीची भगदाडं अशा रीतीने लिंपणं म्हणजे भगीरथ प्रयत्नच म्हणावेत जणू त्या माऊलीचे.
    परिस्थिती कितीही वाईट असली तरी एक चांगला माणूस घडावा यासाठी असलेली ही तळमळ मनाला अगदी स्पर्शून जाते. त्याचबरोबर स्वतःला एक चांगला माणूस म्हणून समाजात सादर करायचं असेल तर अशा कठीण परिस्थितीतही कुठल्या लालसेला, आमिषाला बळी न पडता आपल्या प्रामाणिकपणाला आपण जागलं पाहिजे. हाही मोलाचा संदेश कवी देवा झिंजाड यांच्या कवितेच्या या ओळी देऊन जातात.
    सगळंं काही मिळालं म्हणून आयुष्याचं पूर्ण समाधान झालंय असं कधीही होत नाही. कधीकाळी मनाला बसलेले ते चटके आज मितीला कितीही सुखात असलो तरीही अस्वस्थ करतात याचीही जाणीव या पुस्तकातून वारंवार होते.
    योग्य भाव मिळत नाही म्हणून
    लेकराबाळांची कोवळी स्वप्नं
    फेकून द्यावी लागतात रस्त्यावर..
    अन् अगतिक बळीराजाची तडफड कधीच कळत नाही
    टायघाल्या लोकांना एसीत बसल्यावर..
    कशी गाडून घेते बळीराणी स्वतःला चिखलमातीत
    हे कधीतरी समजावं
    घरदार संभाळून
    ऑफीसमध्ये काम करणाऱ्या
    माझ्या भगिनींना..
    गाडग्या मडक्यात गोमतार साठवणाऱ्या
    अन् रक्त आटवून
    बाटूक जगवणाऱ्या डोळ्यातलं पाणी दिसण्यासाठी
    गावठी गायीचंच काळीज लागतं…
    घराघरात भांडणं लावणाऱ्या एकता कपूरच्या मालिका पाहताना
    डोळ्यांतून ओघळणारं पाणी काय कामाचं?
    हल्लीच्या मदमस्त होऊन बोकाळत असलेल्या बेगडीपणाचा टर्रकन बुरखा फाडणाऱ्या अशा या ओळी आहेत.

    प्रगती आणि सुधारणेचा खोटा लेप चढविलेल्या आजच्या ह्या ऐयाश आणि चैनबाज संस्कृतीवर जगणाऱ्या मुरदाड मनांना संवेदशीलतेची नक्कीच जाणीव करून देणारं, प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे.
    -संदिप निकम

  4. ‘समाजव्यवस्थेच्या बेगडाखालील भिरूड दाखवणारी कविता-
    ‘सगळंं उलथवून टाकलं पाहिजे…’१९६० नंतर मराठी कवितेच्या युगात वेगवेगळ्या प्रवाहांनी घेर धरून दिशा निवडल्या. नव्या सुवर्ण पथाचे जणू अधिष्ठानच मांडले. जेष्ठ कथाकार बाबुराव बागुलांविषयी कविवर्य दिलीप चित्रे म्हणाले होते की, कंगालांच्या दैनंदिन जीवन संघर्षातील हिंसेचा आणि पाशवीकरणाचा वेध घेणाऱ्या कथा म्हणजे बाबुरावांच्या कथा. पण त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की, समाजघटकाच्या दैनंदिन जीवनाचा परामर्श घेऊन जन्माल्या आलेल्या विसाव्या शतकातील खऱ्या कविता म्हणजे देवा झिंजाडांचा ‘सगळंं उलथवून टाकलं पाहीजे’ हा कविता संग्रह.

    नियतीने करायला लावले ते मी निमूट केले
    नियतीने करू नको म्हटले तेही धृष्टपणे केले
    नियतीच्या डाव्या पायाची ठोकर खात
    मी उजव्या पायाने तिला ठोकरून दिले…

    १९६८ साली प्रकाशित झालेल्या ‘पद्मा गोळे’ यांच्या ‘आकाशवेडी’ (पृ.७७) या संग्रहातील ओळीप्रमाणे- झिंजाड यांच्या कविता समाजातील नको ते लाथाडणाऱ्या आहेत. ठोकणाऱ्या आहेत. जाती आणि गावगाड्याच्या तळाशी असलेल्या पिडीतांच्या जाणीवा जितक्या ‘बहादूर थापा’ यांच्या कवितेत अस्वस्थ करतात. तितकीच वर्तमानातील प्रश्नांची गोळा बेरीज असलेली देवा झिंजाड यांची कविता अस्वस्थ करते. ह्या कविता केवळ आत्मनिष्ठ जाणीवांचा प्रतिभाविष्कार नसून जगण्या-वागण्यातील सत्यता दाखवणारी अनुभूती आहेत. कवीला शब्द बंबाळ दु:खाचा बाजार करून रसिक मनावर अधिराज्य करायचे नाही तर साक्षेपी बदल हवा आहे, म्हणून तो शब्द खर्ची घालतो आहे. स्वतः जे जगलं, भोगलेल त्यांच्या कवितेत उतरलं. ते अनुभवायला हर्मिस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या कविता संग्रहात जावं लागतं.

    दैनंदिन प्रतिकांच्या आधारावर वाढून फुललेली ही काव्य लतिका तीन प्रकारात बहरलेली आहे. प्रत्येक विभागाचे खास असे वैशिष्ट्य आहे. पहिल्या अगतिकीकरण ह्या विभागात ४१ कविता आहेत. दुसऱ्या भाकरायण विभागात ०९ कविता आहेत आणि तिसऱ्या विभागात २३ कविता आहेत.
    स्तःला भाकड होऊ न देणाऱ्या शिक्कामोर्तबीची कवयित्री कल्पना दुधाळ यांची न्यायिक प्रस्तावना आहे.
    चुंभळ म्हणजे टाकाऊ कपड्याचे वेटाळे जे वजन पेलण्यासाठी डोक्यावर वापरतात. जेव्हा कार्य उद्देश साध्य होतो तेव्हा त्याच चुंभळीला फेकले जाते अडगळीत. चुंभळ माहीत नसेल पण बाई? चुंभळ हे प्रतीक वापरून स्त्री जीवाची घुसमट, कालानुपरत्वे बंदीस्त मनाची कैफियत मांडली आहे. केवळ भोगवस्तूच म्हणून पाहणाऱ्यांच्या विरोधात प्रहार करणारी कविता म्हणून ‘चुंभळ’ न्यायाधिष्ठीत आहे.

    ओझ्याखालची चुंभळ
    चुंभळीखालची बाई
    —–
    वापर झाला की दिली जाते
    सांदडीत ठेवून… (पृष्ठ २५)

    जो इतरांच्या वेदनांनी दुःखी होतो तोच खरा कवी असतो. दुःखी पीडितांच्या संवेदनावर भाष्य करणारी कविता म्हणजे- ‘सगळंं उलथून टाकलं पाहीजे’ तील ‘त्याच त्याच कविता’ ह्या कवितेत कवी अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या अनेक कविच्या वागण्यावर भाष्य करताना कवितेची होणारी कुचंबना दिसते.

    एसीमधे खुर्चीत बसून
    चोखंदळ रसिकांनी कसा मागायचा
    अस्सल साहित्याचा घास… (पृष्ठ२७)

    बैल हा कुणब्याच्या व्यथांचा खरा साक्षीदार असतो. जो सतत त्याचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहतो. तो सर्जा, राजा अर्धी बादली कवितेतून व्यक्त होतो. विकासाच्या नावाने इमले बांधणाऱ्यांना शोभेच्या निर्जीव झाडांच्या सजावटीत बागायतीचे महत्त्व आणि मातीची खरी वेदनाच कळत नाही. माय मातीची वेदना मांडायला बैल आपल्या दूध भावासाठी वही आणि पेन मागतो. दुष्काळाच्या चक्कीत भरडून निघताना मालकाला धीर धरायला सांगणारे जनावर उद्याचा हिरवा हंगाम पेरायला बळीराजा तू जीवंत राहा असे म्हणतो.
    पायाच्या खुरातला दगड काढताना आपल्या धन्याच्या खडबडीत तळहाताच्या नुसत्या स्पर्शाने धन्यता मांडणारा बैल शेतकऱ्यांच्या प्रती आपले ईमान राखून आहे.
    दुष्काळात होरपळून निघणाऱ्या बळीराजाच्या मनाची व्यथा व्यक्त करणारी कविता समस्त शेतकऱ्यांच्या वेदनांचे प्रतिनिधित्व करते. वा. रा. कांत यांच्या ‘अक्षरे तुम्हाविण कोण करतील वज्राची..’ अशी शिक्षणाची महती वर्णणारी भावना त्यांच्या खालील ओळीतून प्रकटते.

    घेऊन द्या एखादी वही आणि पेन माझ्या दूधभावाला
    अक्षरांची बागायत करण्यासाठी आणि
    जगासमोर मातीची व्यथा मांडण्यासाठी… (पृष्ठ २८)

    समाजात फक्त माणुसकी निर्माण होऊन चालत नाही तर क्रांती झाली पाहिजे. ह्या विचाराने प्रेरित झालेला कवी माणसांची मनस्थिती बदलायला निघाला आहे. स्वतःच्या स्वार्थाची बोली न लावता एखादी क्रांतीची कविता निर्माण करून बदल हवा म्हणून मुक्याने बडबडणारी वृत्ती मोडीत काढायला फुले-शाहू-आंबेडकर कठून आणणार? त्यासाठी देवा झिंजाड शब्दाची मशाल करत आहे. गरिबांच्या अश्रूंना बांध घालण्यासाठी एखाद्या क्रांतीच्या कवितेने नांगरलाच एखादा मेंदू तर तोही पेटतो केवळ हुकुमाच्या जुजबी ताबेदारांना शिरजोरी दाखवण्यापुरता.
    फक्त क्रांती झाली पाहिजे या नपुंसक इराद्याने बेबनाव करणाऱ्यांना जळजळीत चपराक देण्यासाठी काळानुरूप कैक बंड झालेत, त्यामधे काही नावे अजरामर आहेत, जसे शाहीर आण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ, बाबूराव बागुल नारायण सूर्वे… पण देवा झिंजाड हे खालच्या थरावर गोचीडीसारख्या चिकटलेल्या प्रश्नाच्या विरोधात विसाव्या शतकातील समाज सुधारण्याच्या आत्मभानाने झपाटले विद्रोही रसायन ठरले आहे. हा कवी उपरोधक, खोचक वाटत असला तरी तो तितकाच सत्य आहे. त्यांच्या ‘सगळंं उलथवून टाकलं पाहीजे’ ह्या शीर्ष कवितेतून जाणवते. तो जे लिहितो तेच जगतो. त्यांची कविता हाच त्यांच्या अंतर्मनाचा आरसा आहे. त्यामुळे त्यामधे कुठली तफावत जाणवत नाही.

    ‘ज्याच्याकडे आहे सगळंं त्याला लाज वाटते
    कशी करणार क्रांती?
    अशा मन: स्थितीतला समाज

    की लावायचे रोजाने क्रांतिकारक? (पृष्ठ ३२)

    विभक्ततेच्या शुक्राणुतून वाटणी या शब्दाचा जन्म झाला. या शब्दाचा स्थायीभाव एकमेकांपासून तोडणे असल्याने त्यांच्यापुढे आई-बाबा, बहीण-भाऊ ह्या नात्याचे पदर दुरापास्त होऊन जीर्ण होतात. त्यातून मायबापाच्या जीवाची होणारी काहिली देवा झिंजाड किती बारकाईने नोंदवतात. त्यांचे सुक्ष्म निरिक्षण हे त्यांच्या काव्य प्रतिभेचे गमक म्हणावे इतक्या ताकदीचे आहे.
    ‘एक आईवर गेला एक बापावर गेला. वाटणीचा टाईमला लेक बायको गेला’
    ह्या साध्या दोन ओळी वर्तमानातील भयाण वास्तवाचे वर्णन करण्यास पुरेशा आहेत. काळाच्या विपरीततेचे यथार्थ दर्शन त्यांच्या ‘वाटण्या’ ह्या कवितेत दिसते.

    बा घेतला थोरल्याने आई नेली धाकल्याने
    सही घेऊन बहिणीची केली वाटणे व्याह्याने… (पृष्ठ ३३)

    खऱ्या खुऱ्या रानात ‘ही कविता हल्लीच्या शेती संगोपनाच्या कविता लिहून बाजारगप्पा मारणाऱ्यांसाठी बुबूळावरचा ओरखडा आहे. हे सांगणारे देवा झिंजाड मातीच्या तळपायातल्या जुनाट काट्याची सल अनुभवणारे आहेत हे वेगळे सांगण्याचा खटाटोप करावाच लागत नाही. शेतीमाताच्या परिकल्पना ह्या नुसत्या कागदी घोडे नाचवून साध्य होत नाहीत. कागदावरचे रान कितीही हिरवे असले तरी पाखरांच्या डोळ्यातले हिरवे स्वप्न होतील का? ते हे प्रत्यक्षात किती काळं असतं त्यासाठी कुसळ्या गवताच्या रानातून चालताना त्याची भीती वाटणाऱ्यांना मातीतून शब्द उगवण्याचा भास निर्माण करता येईल पण शब्दाशब्दातून मातीच्या दुःखाच्या खपल्या कशा भरून काढता येतील? म्हणूनच बोबड्या कोंबाच्या दुःखाची वाच्यता करायला कवी खऱ्या खुऱ्या रानात यायचा सल्ला देतो.

    नुसत्या ऋतूंनी कवितेत
    पानोपानी डोकावलं म्हणजे
    होत नसतात, पिकं हिरवी
    —-
    उचलायला हवीत सोफ्यावरून बुडे… (पृष्ठ ३५)

    नद्या या दातृत्वाचा आणि मातृत्वाच्या बाबतीत पूजनीय आहेत, तशाच स्त्रियाही पवित्र आहेत. नदी हे प्रतीक वापरून देवा झिंजाड दोहो जीवावर उठलेल्या मनुष्यत्वाला प्रामाणिक इशारा देतात. नदी व वृक्षांची प्रतीक ही किती चपखलपणे त्यांच्या कवितेत येतात हे वाचकाला कविता वाचल्याशिवाय कळणार नाही.

    भविष्याच्या घनाघाती द्योतकाचे परिमार्जन करून समाजापुढे येणाऱ्या विध्वंसाचे संकेत मांडणारी कविता. किती छातीठोकपणे सांगते. आपल्या भुकेला कुणीच वाली राहणार नाही म्हणून आतातरी सोडावी बलात्कारी वृत्ती. कवीच्या दूरदृष्टीच्या क्षेपक विचार श्रेणीची श्रृंखला किती बेजोड आहे. ती ऊर ओरबडलेल्या असंख्य नद्याच्या, बायांच्या मनातल्या दु:खाचे प्रतिनिधित्व करते.

    तोडले जात आहेत पायापासून डोक्यापर्यंत लचके
    गर्भाशय फोटोस्तोवर केलं जातयं त्यांना नागडं
    ——
    जर त्यांनी केलाच आक्रोश अन् एल्गार
    तर आपल्या भुकेला कोणीच राहणार नाही वाली… (पृष्ठ ३६)

    नागड्या आधुनिकतेच्या विचाराने झिंगलेल्या वृत्तीला लागते बेचव चुलीवरची रखरखीत भाकर. बुडत्याचे पाय डोहाकडे याप्रमाणे पिझ्झा, बर्गरचे डोहाळे लागलेल्यांच्या पोटी संस्कृतीचे अर्भक कधीच वाढतं नसते. म्हणून हा कवी आपल्या संस्कृतीचे बाळकडू पाजण्याच्या प्रयत्नात दिसतो. आपल्या मायेच्या हाताने घडलेली भाकर आणि पंचतारांकित हॉटेलातून बोलावलेली रोटीतला फरक सांगताना कवी काळजाला हात घालतो. मिल्कशेक आणि मिक्स व्हेज खाणाऱ्यांना वासराच्या अन् लेकराच्या डोळ्यातली आर्तता कशी कळणार? वाढत्या शहरीकरणातून निर्मीलेला मेंदूतला कचरा निर्माल्याचं कामच कवी कवितेच्या माध्यमातून करतो. ह्यासाठी ‘म्याकडोनाल्ड जातीच्या जिभा’ ही कविता जागतिकीकरणात उलथापालथ करणाऱ्या पिझ्झा, बर्गरच्या विळाख्याची पयिकल्पना देते.

    कवितेच्या बलस्थानात कुठेच बेबनाव नाही. वाट्याला आलेले भोगलेले तेच कवी लिहतो. बलात्कार, अन्याय-अत्याचार यांचे धडे घेऊन जणू एक विशिष्ट जमातच जन्माला आली आहे. त्यांच्या विरोधात ब्र न काढणारे समाज माध्यम आणि लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ असलेली पत्रकारिता तितकीशी सत्याच्या, अत्याचाराच्या बाजूने तटस्थ उभी राहताना दिसत नाही. उलट-सुलट प्रश्नांच्या भडीमारात लाजवल्या जातात निरापराध तरण्या पोरी आणि बलात्काराच्या भक्ष ठरलेल्या बायकाही. हे भयाण वास्तव रेखाटताना झिंजाड यांची कविता दंड थोपटून बंड करते. इतकी शिगेला जाते की, अगदीच ‘दलित साहित्यात निर्माण झालेले सर्वच पायंडे’ मागे टाकत पुरोगामी विचारांच्या भेकड कृतीला मागे खेचते. स्पष्टता, वाच्यता आणि विद्रोहाचे साज-शृंगार परिधान करते सकल वंचित, पिडीत जीवांसाठी.

    —- लेकीबाळीची नावं
    निर्भयाच्या यादी छापली जातात
    नपुंसक लेखण्या अन् षंढ कमरे
    कुणाचीतरी विवस्त्र व्हायची वाट पाहत असतात…(पृष्ठ ३८)

    मातीत राबणाऱ्या जीवाच्या विवंचनेचे अगतिकीकरण मांडणारी कविता. ज्या समाजाला संविधान कर्त्यांनी आरक्षण ज्या मूळ उद्देशाने दिले होते, तो साध्य होण्याआधीच त्या महात्म्यांच्या विचारांचं गोलबोट लागते की काय अशी भीती कवीस वाटते. ते भयावह वास्तव पाहून कवी विद्रोहाने पेटून अधाशाप्रमाणे लिहतो. या आरक्षणाच्या कुबड्यांनी वेशीबाहेरचा समाज प्रवाहात आणण्याऐवजी तो आणखीनच लंगडा केला. ज्याला आरक्षणाची लतच लावून दिली, त्यांच्यातील स्वाभिमानी बाणा जणू काय हे गहाण ठेवून बसावे इतकी अपाहिजता बोकाळलेली दिसते. गावात आणि शहरातील विरोधाभास मांडताना कवी कमालीचा व्यथित होतो. लोकशाहीची धज्जी उडवणाऱ्यांच्या कळपात कागदावर खरं खुरं कधी उतरलंच नाही, जे उतरलं ते कधी अमलात आलंच नाही. ही शोकांतिका कवी अगतिकीकरण ह्या कवितेत मांडतो.

    खिरापत म्हणून वाटल्या आरक्षणाचा कुबड्या
    लंगडा करत गेले वेशी बाहेरचा समाज
    —-
    किती झपाट्याने होत गेलं
    मातीत राबणाऱ्या साध्या माणसांचं अगतिकीकरण… (पृष्ठ ३९)

    यशवंत मनोहर त्यांच्या ‘उत्थानगुंफा’ या कविता संग्रहात म्हणतात,

    कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
    सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे…

    अगदी तसाच विधानाशय २० व्या शतकातील झिंजाडांच्या ‘कोरडी बेटं’ ह्या कवितेत दिसतो. इतकंच काय तर ऐकेकाळच्या व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीतील जनमाणसाच्या जगण्याची परवड दाखवणारा आशयही तंतोतंत अवतरलेला वाटतो. निसर्गाच्या रौद्रावताराचे बळी ठरलेले निरपराध हजारो जीव जगण्याच्या लालसेने वळवळत येतात शहराकडे. पण तिच जगण्याची लालसा विसर पडू देत नाही गावाकडच्या मातीला. अखेर उंच उंच बंगल्यातल्या ठेंगण्याची खरी ओळख झाल्यावर चकव्याप्रमाणे भटकत भटकत तिच माणसं पुनः येतात गावाच्या मातीत, सुजनांचे नवे कोंब घेऊन. हे वाचताना कवयित्री इंदीरा संत यांच्या ओळींचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाहीत.

    रक्तामध्ये ओढ मातीची
    मनास मातीचे ताजेपण…

    ‘तहान वेडे’ या कवितून समाजव्यवस्थेच्या बेगडा खालील भिरूड दाखवण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. समाजातील वास्तवाचा चेहरामोहरा दाखवणारा आरसा म्हणजे देवा झिंजाड यांची कविता. पाण्याच्या एका थेंबांचे महत्त्व समजायला दुसऱ्यांच्या डोळ्यातल्या खाऱ्या पाण्याची चव जाणवावी लागते. त्यालाच कळते भूक म्हणजे काय? अशी मर्मभेदी हतबलांच्या आर्जवी प्रश्नांची वाच्यता करणारी कविता वाचकाला आपली वाटते.

    गावाकडची लेकुरवाळी बाई
    कशीबशी भिजवत असते
    झोळीतले कोरडे ओठ… (पृष्ठ ४१)

    स्वतःच्या स्वार्थी व आप्तलोलूप मनसुब्यांना साध्य करण्यासाठी घाऊक दलालीचे धार्मिक तेढ निर्माण करणारे पिकवत नाहीत हिरव्या पिकांमधून जगण्यासाठी लागणारी पोषकतत्वे का कुण्या धर्मपताकेने येत नाही एखाद्या कुपोषितांच्या बरगड्यावर मुठभर मांस समता, एकात्मता आणि एकतेवर कुरघोडी करणारी ही धर्माच्या घाऊक दलालांची नीतिमत्ता रंगांनाही वाटून घेते. आपल्याच सेवेत सामावून घेऊन नाही जाऊ देत मुक्त नभांगणात. सूर्यातून बाहेर पडणाऱ्या सप्तरंगाच्या किरणांसारखं… असाच काहीसा अर्थ, काहीसा आशय झिंजाडांच्या ‘विद्वेष’ या कवितेत जाणवल्याशिवाय राहत नाही.

    तळहातावर पोट घेऊन जगणाऱ्या खेडूतांच्या यक्ष प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणारी कविता- खेड्यापाड्यातील स्त्री जीवनाचं सूक्ष्म दर्शन करून देताना झिंजाडांची लेखणी दत्त म्हणून दारात उभ्या ठाकणाऱ्या प्रश्नांची सत्य चित्रकथा साकारते…

    पाणी कसं शेंदायचं आठ आठ परसाचा विहिरीतून
    कसं गोळा करायचं चुलीसाठी सरपण?
    कसं पाठवायचं लेकरांना शाळेत अनवाणी?
    कसं सोडवायचं कोडं
    शिळपाकं खाऊन भुकेलेल्या प्रश्नाचं? (पृष्ठ ४६)

    पांढरपेशा बगळ्यांच्या गुलाबी लाड पुरवणीत कुस्करल्या जाणाऱ्या कोवळ्या कळ्यांच्या आयुष्याची धग न जाणवणाऱ्या, डोळे नसलेल्या जगाचे दुर्दैव मानणारी कविता म्हणून ‘लिंगशुचिता’ ही रचना जागृत मेंदूला झिणझिण्या आणल्याखेरीज राहत नाही.

    ते कोवळ्या कळ्या कवेत घेऊन
    करत असतात साजरे
    पौरुषाचे बेगडी उत्सव… (पृष्ठ ४७)

    ज्ञानेशाच्या भूतदयी शिकवणीला तिलांजली देणाऱ्याकडे पाहून भेडसावतात काही भेकड प्रश्न. काही निरूपद्रवी जीवांना पण ते ज्यांना जनावरं समजात त्यांना शिवत एखादा साधा प्रश्न. आक्रोश करण्याचा किंवा बसत नाहीत उपोषणाला महामार्गावर वृषण ठोकून खच्चीकरण केलेले बैल. कधी एखादी तक्रार करत नाहीत मालकाविरोधात. म्हणून त्यांच्या नावे सहानुभूतीचे दिंडोरे पिटवणाऱ्यांनी चामड्याच्या वस्तूची किमान मागणी तरी करू नये… इतकचं! असा आग्रह कवी धरतो आणि तो रास्त आहे. कारण कवी डोळ्यावर झापड आणि चेहऱ्यावर मुखवटा पांघरलेला मुळीच नाही. इतके उमजायला ‘भाकड प्रश्न’ कविता पुरेशी आहे.

    अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांच्या जीवनाचे यथार्थ दर्शन सगळंं उरकून टाकलं पाहिजे या कवितासंग्रहात क्षणोक्षणी दिसते. असाच एक प्रसंग वासुदेव या कवितेत कवी अत्यंत अल्प शब्दात परंतु मार्मिकपणे मांडतो, त्यातून बदलत्या समाजमनाची जाण येते.
    घसा कोरडा पडतो
    वासुदेवाचा
    बोंबलून बोंबलून
    पण उतरत नाही कधीच
    माणुसकी
    दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून खाली
    ह्या काँक्रीट हृदयी शहरात… (पृष्ठ ६३)

    जागतिकीकरणाच्या संकल्पनेतून पिसाटलेला माणूस गावातील घरांना कुलपे ठेवून सुखाची लालसा घेऊन निघतो पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात. पण अजूनही गाव मातेची संस्कृती जोपासणाऱ्या बारा बलुतेदारांपैकी अठरापगड यांपैकी नंदीवाला हा समाज आपल्या बैलांच्या शिंगावर बेगड लावून गुबुगुबू वाजवत उघड्या-नागड्या अंगाने फिरतो गावातल्या बंद दारापुढे आपलं फिरस्ती पोट भरण्यासाठी अन् संस्कृतीशी ईमान राखण्यासाठी ‘कुलूप’ या कवितेत.

    रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो
    तुमची आय-बहीण
    आजही विटंबली जाते
    हाटाहाटातून…

    किंवा

    हा भाकरीचा जाहीरनामा
    हा संसदेचा रंडीखाना…
    असे विधान करणारे नामदेव ढसाळ

    देवा झिंजाडांच्या कवितेत जागोजागी सापडतात तोच मार्गक्रमण करणारा कवी. त्यांच्याही पुढे जाऊन सर्वसमावेशक विधाने करतो. जे समस्त मानवाचे प्रतिनिधित्व करतात. ना की कोण्या एका समाज घटकाचे. विद्रोह आणि संताप हा अजाणत्या नेभळटाच्या रजोमिलनातून कधीच जन्माला येत नसतो. त्यासाठी जाणीवेच्या मर्मावरच झालेला घाव समजला पाहिजे. ती जाण झिंजाडांना आली म्हणून ते भोवतालच्या घटना पाहून पेटून उठतात. त्यांच्या कवितेत ते आगीचे पागोळे गुंफतात. ‘पांढरी कबुतर’ ही कविता त्याचेच एक उदाहरण आहे. कवी शाब्दिक संभोगातून क्रांती घडवू पाहत नाही तर प्रसंगी दंड थोपटून स्वतःला झोकून देतो. निरागस आया-बहिणींची हसबी, मोघली रियासतीप्रमाणे दिवसाढवळ्या वस्त्र फाडून भर चौकात इज्जत लुटली जाते. तेव्हा आपला समाज फक्त ढुंगणात शेपूट घालून उघड्या डोळ्याने पाहत बसतो. एखाद्याची झालीच मजल तर तोही करतो कारनामे माय अंगावर मीठ चोळण्याचे कायद्याच्या नावाखाली. आत्मसन्मानाचा इतका कडेलोट होऊनही तिची लेकर शंढासारखे नको ती कबुतरं उडवत बसतात. तेव्हा कविला हा अपमान वाटतो स्वतःचा आणि इतिहास पर्वाला जिंकून स्वाभिमान चेतवणाऱ्या महापुरुषांचा…

    निरागस डोळ्यादेखत
    ओरबडली जाते छाती
    — — अन् कायदा
    उलट्या पालट्या चौकशा करून करून
    चोळलं जातं कायद्याचं मीठ
    मायांगावर… (पृष्ठ ६५)

    अठराविश्व दारिद्र्याच्या चक्कीत भरडून भरडून निघालेलं आयुष्य कधीच कुण्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांना दिसले नाही. छातीतले हुंदके तोंडात बोळा कोंबून आतल्या आत दाबले. जेव्हा सगळंंच असहाय्य झालं तेव्हा कण्हेरीची फुलं खाऊन विहीर भरली आणि बाप अनंतात विलीन झाला… आणि त्याच ओढ्याच्या बरगडीला त्याच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्यांची लिंग ठेचायला धजावला नाही कुणीच? जेव्हा स्वतःच्या कोवळ्या पोरीच्या मायांगाला लावायला, झाडपाला आणण्यासाठी गेलेली माय अजूनही आलीच नाही… हे मांडताना झिंजाडांची मनस्थिती काय झाली असेल? किती खोलवर वेदना रूतली असेल? किती काळीज कापणारे खंजिर एकाच वक्ताला भिडले असतील? लांडग्यासारखी लचके तोड करायला. तेव्हा कवितेत उतरतात असे निर्भीड शब्द, त्यासाठी गांडूरोग ही कविता मेंदूला उमजावी लागते…

    ह्याच वढ्याला जाळलं तिलाही
    मरण्याआधी नागवं करून… (पृष्ठ ६७)

    मोडशी झालेल्या भुकेखंगर समाजाचे आतडे फाडून डस्टबिनमधे शिळ्या भाकरी फेकणाऱ्यांना कवी वळकटलेल्या जठराचे अतंर्भाग पिंजून दाखवतो… ‘श्रीमंत तुकडे’ या कवितेत.
    अजाणत्यापणात नवं साल साजऱ्या केल्यासारखं आपल्या लहान लेकराला मागे ठेऊन सरणावर झोपलेल्या बापाला विस्तवाचे चटके लागले नसतील का? अंग अंग भाजलं नसेल का? ह्या बालमनाला बसलेल्या चटक्याची धग आजही तशीच जाणवते. त्यासाठी तर ‘नवीन वर्ष’ ही कविता मनाची अशाश्वत पातळी गाठते.

    काळ्या मातीच्या डोळ्यांत हिरवं सपान शोधणारा बळी… त्या उभ्या संसाराची परवड, त्यातून निर्माण झालेली परिस्थिती किती शिगेला जाते. अखेर भुंडे हात करून घरधनीस करावे लागते दफन भाळावरचं कुंकू. सावरावा लागतो पखरलेला संसार भुंड्या हाताने… कितीतरी बायांना आजतागायत. हेच तर सत्य झिंजाडांनी भुंड्या हातांनी ह्या कवितेत मांडले.

    अन्यायाच्या जहरी विळाख्यात सापडलेल्या शेती मातीच्या भावभावनांचे प्रगटीकरण करताना देवा झिंजाड अश्लीलता वाटणारे शब्द किती पावित्र्याचा पवित्रा घेऊन हाताळतात हे पाहण्यासाठी त्यांची ‘प्लाट किंवा पिस’ ही रचना पुन्हा पुन्हा वाचावी लागते. ते म्हणतात,

    ठेवता येतात झाकून कपडाआड
    वयात आलेले अवयव
    पण भाव वाढलेला जमिनीचा तुकडा कसा झाकायचा…(पृष्ठ ९५)

    समाजातील घातक रूढी परंपरेवर ताशेरे ओढणारी कविता, स्वतःचा बाप मरताना पाहणारा कवितेतला नायक हा काही काल्पनिक नाही. तो स्वतः कवी आहे. बापाच्या पोटातल्या भुकेचे कावळे कावकाव करून तडफडून, तडफडून मेलेत तेव्हा कोणत्या समाजपरंपरेला दिसलं नाही ते तरफडणं. एका सांजेची सोय न करणारा समाज आणि परंपरा बाप मेल्यावर दहा-बारा दिवस खाऊ घालतो. पितराचे पिंडदान होईपर्यंत पुन्हा त्या जीवाच्या व्यथेला कोणीही वाली राहात नाही. आतून अस्वस्थ करणारे कवीचे विचार सत्य आहेत.

    बाप गेल्यावर…
    पुन्हा उडून गेल्या भाकरी
    अन् विटून गेले बेसन
    पिंडाला कावळा शिवल्यावर… (पृष्ठ ९८)

    व. बा. बोधे यांच्या ‘बांगडी’ या कांदबरीतील नायिकेच्या अवहेलनेप्रमाणे बाईच्या जीवाची हेळसांड आणि परवड व्यक्त करताना वापरलेलं प्रतीक हे मार्मिकपणे न्याय देणारे आहे. स्त्री जाणीवांच्या तऱ्हा रेखाटताना निरनिराळे रूप उलगडणारी ‘बांगडी’ कविता स्त्री मनाची पाठराखण करते.

    जन्मदात्या आईच्या उपकाराची परतफेड करण्याच्या प्रामाणिकतेचे कथन करणारी कविता ‘घासलेट’. या कवितेतील आई वाचकाला आपली स्वतःची माय वाटते. कवीचा जन्म झाला तेव्हा देवळीतल्या चिमणीत घासलेट नव्हतं… इतकी बिकट अवस्था असणाऱ्याकडे कुणालाही यावं वाटत नाही तिथे दारिद्रय रमतं. असल्या अवघडल्या परिस्थितीमध्ये चिमणीने दिलेली साथ जगण्याचे बळ पांघरणारी आहे. म्हणून कवितेतली आई मुलास म्हणते, “एकवेळ मला विसर पण चिमणीला विसर पडू देऊ नकोस. एक पदर गाठ बांधून देते निर्वाणीच्या इशाऱ्याची नवीन घरात देवळी ठेव चिमणीसाठी आणि जमलच तर आईसाठीही..

    एक वेळ मला विसर
    पण
    विसरू नकोस चिमणीला…”(पृष्ठ ११३)

    अखेर जेष्ठ कवी वामन निंबाळकरांच्या ‘गावकुसाबाहेरील कविता’ संग्रहामधील ओळी देवा झिंजाडांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतात.

    ‘विसाव्या शतकाच्या शेवटच्या टोका
    मी आज उभा आहे.
    भोवती कसे सारेच पेटलेले…’

    काळाच्या निकषांवर खऱ्या उतरलेल्या ह्या कविता वर्तमानातील काही नको त्या बाबी बदलण्यासाठी शब्द प्रपंच करणाऱ्या देवा झिंजाड यांच्या मनाचा ठाव आहेत. त्यांना अपेक्षित असा नवा समाज साकार व्हावा अशी आशा करणे वावगे ठरणार नाही. त्यांच्या आगामी लेखनास आभाळभर शुभेच्छा…

    रसग्रहण/ परिक्षण
    तान्हाजी खोडे
    नाशिक

  5. सगळंं उलथवून टाकल पाहिजे ह्या कवितासंग्रहात अगतिकीकरण, भाकरायण आणि हरवलेल्या हिरव्या बांगड्या अशा तीन टप्प्यात विभागणी केलेल्या स्वतंत्र दर्जाच्या एकूण ७४ कविता आहे, त्यामधून जागतिकीकरणाने भरडलेल्या समाजातील लोकांची व्यथा यात रेखाटलेली आहे.प्रांत, भाषा, परिसर व परिस्थितीच्या पलीकडे जाऊन नवनिर्मितीतून केलेली फक्त शब्दांची मांडणी नसून ती अनुभवलेल्या प्रसंगाची पावती असते. शेतकऱ्यांच्या भावना शेतीतील घडामोडी, परिवर्तनाने शब्दबद्ध केलेली उत्कट काळीज तळहाती आशयाची परिणामकारतेने केलेली मांडणी, या सर्वच बाबतीत त्यांच्या कवितेची मजबूत पकड विलक्षण आहे.
    त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द म्हणजे अनेक वास्तव अनुभव उशाशी घेऊन जगण्याच्या संघर्षातून तावून सुलाखून निघालेले चित्रण आहेत. गाव खेड्यांमध्ये कोवळ्या संवेदनशील मनाने जे चटके सोसले गरिबीने होरपळलेल्या मनाची व्यथा अनुभवलेले बालपण आणि वर्तमान जीवन या दोन्हीमधील असलेले स्थित्यंतरही यात आले आहेत. परिस्थितीपुढे हात न टेकवता त्यावर संघर्षातून मात करून, अर्थात क्रांती झाली पाहिजे या अनुषंगाने ते मांडतात.
    “मध्यमवर्गीयांना वेळ नाही,
    श्रीमंताना गरज नाही,
    गरिबाला भीती वाटते ज्याच्याकडे आहे सगळं,
    त्याला लाज वाटते,
    कशी करणार क्रांती?
    असल्या मनस्थितीतला समाज”
    एकूणच क्रांतीची सुरुवात करावयाची असेल तर इतरत्र न पाहता स्वतःपासून करावी लागेल. अशी असंवेदनशीलता पावलोपावली निर्माण होऊ नये, महत्त्वाचे म्हणजे जाणीवेच्या आणि नेणिवेच्या पातळीवर अनुभव घेत संघर्षातून कवीला ही नैतिक जबाबदारी पार पाडावे लागते. त्यातूनच वैयक्तिक सामाजिक राजकीय किंवा कुठल्याही न पटणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बोलावं लागतं ते दौरा या कवितेत असे लिहितात,
    “दुष्काळाचं नखुड झालेल्या बोटावर शाई चोळायला भाग पाडणार्‍या
    दौऱ्यात मशगुल लालदिव्यांना
    एखाद्या तरी देशातल्या पुस्तकात दिसोत
    आत्महत्येनंतर मागे राहिलेल्या पाखरांच्या डोळ्यातून ओघळणारे भारतीय अश्रू”

    अनेक वारंवार दौरे निघत असतात, मेक इन इंडिया तसेच वेगळ्या स्कीममध्ये राजकीय नेते फिरत असतात, परंतु वास्तव परिस्थिती पाहायला मात्र त्यांना वेळ नसतो. असे “एल्गार” कवितेत अधोरेखित करताना ते लिहितात,

    ओसंडून वाहावे अन्नधान्य
    जवळ यावीत दुभंगलेली मने
    तृप्त व्हावेत अतिरेकी अन अगतिक श्वास

    याच कवितेत त्यांनी प्राप्त परिस्थितीला झुगारून देत समतेचा एल्गार सांगत भेदाभेद विरहित नवसमाज निर्मिती होण्याची त्यांनी आवश्यकता व्यक्त केले आहे. त्याचबरोबर आपल्या वर्तमानाच्या संदर्भात असलेल्या कवितेतून आजच्या पिढीला भानावर आणण्याचे काम केले आहे. म्याकडोनाल्ड जातीच्या जिभा, रीबॉक जातीचे पाय, होम मिनिस्टर, मेनूकार्डशिवाय, प्लॉट किंवा पीस असं सगळंं आजच्या या जगातलं भवताली गोळा होतं. एकूणच ब्रँडेड वस्तूच्या मागे लागलेल्या आणि त्यालाच आयुष्य समजणाऱ्यांना ते वारंवार उपदेश करतात. “त्याच त्याच कवितेत” कवी म्हणतात,
    “त्याच्या कविता ऐकून जीव आलाय कानात
    अन उद्या एखादी नवीन ओळ ऐकायला
    कवींना नेवून हानावे लागेल रानात”

    तसेच आजचा जाकीटधारी त्यांच्या कळपाबद्दल पाकिटातल्या कविता या कवितेत ते म्हणतात,
    “स्वतः राहतो शहराच्या मिठीत
    आई- बाप बिनभाकरीचे मारतो गावाला”

    जागतिकीकरणामुळे इथला भूमिपुत्र हा परावलंबी झाला, त्याची व्यथा जागतिकीकरण या कवितेत सांगितली आहे. भरमसाठ गरजा वाढल्या, गरज नसलेल्या वस्तूंचे ढीग लागले. तरीही माणसांची मने भरेनात, हाव संपेना. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत माणसाचे हावरे स्वभाव झाले. माणसं माणसापासून लांब गेली आणि वस्तूंच्या मात्र जवळ आली. तेच वास्तव सांगताना,
    “हातात धोकायंत्र घेऊन फिरत राहिले फक्त
    पण कुठल्याच शास्त्रज्ञांना समजले नाही की
    ह्या जागतिकीकरणाच्या नादात
    किती झपाट्याने बदलत गेलं
    मातीत राबणाऱ्या साध्या माणसाचं जागतिकीकरण”
    आपलं खरं आयुष्य शेती मातीला अर्पण केलं असतं तिथूनच बाहेर पडल्यानंतर नव्या वाटा खुणावत असतात. त्यातूनच आपण मोठे होतो. अनेक उद्योग व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडतो. परंतु चुलीवरच्या दुर्घट भाकरी आयुष्याची लावलेली गोडी आपण विसरू नये, आईचे कष्ट विसरता येत नाही.
    आई बापाची कहाणी काळजात ही असते
    आई बाप गेल्यावर जग आपले नसते
    देव नाही देवळात नको श्रद्धेचा पसारा,
    चला जीवापाड जपून हा मायेचा देवा देव्हारा

    कष्टाचे दिवस आठवून आत्ताचं म्हातारपण सहन होत नाही. जिवापाड पाणी वाहण्यात आयुष्य त्यांचे गेलं आता पाणी पिण्यासाठी तांब्या पेलवत नाही. घशाखाली उतरत नाही पोटभर भाकर किती कठीण असते, हे म्हातारपण सांभाळणं, मायची ताटातूट सोसणं पण निसर्ग नियमानुसार या सर्व गोष्टी आपल्याला नाईलाजाने स्वीकाराव्या लागतात, यावर कवी तरण्याबांड देवा या कवितेतून आईच्या कष्टमय आयुष्याची आठवण येऊन आणि आईचं म्हातारपण सहन होऊ न होऊन ते लिहितात,
    “तरण्याबांड देवा सवाल आहे तुला
    कारे म्हातारा करतोस माणसाला?
    तरुण कर रे माझ्या आईला
    त्या बदल्यात
    म्हातारा कर रे मला”

    ग्रामीण भागात तेथील चिखल वाटा, काटे तर कुठे त्रास देणारी अडवणूक करणारे काही माणसे आणि या सगळयातून बाहेर पडल्यावर मातीला न विसरणारी माणसे खरंतर कमीच असतात. मातीत राबराब राबून मातीसारखे काळे झालेल्या हातांच्या बाजूने बोलताना टायघाल्या या कवितेत लिहितात,
    हॅपी न्यू इयरला विश करण्यापेक्षा विषारी असतात
    मेथीचा भाव करून देणारे फाइव्हस्टार हात
    पण कुणालाच कसे दिसत नाहीत
    जगाला जगण्यापेक्षा स्वतःचे आयुष्य खुरपणारे
    कोरोडो अनामिक काळे हात

    कवी देवा झिंजाड यांनी शेती, शेतकरी, दुष्काळ, अवकाळी हिरव्या विकासासाठी झटणारे असंख्य जीव त्यांची जगण्याची धडपड त्यांचं निसर्गाशी चाललेला संघर्ष यात चित्रित केला आहे. शेती आणि शेतकऱ्यांचं असलेलं आईवरचे प्रेम हे देखील अधोरेखित झालं आहे. ग्रामीण भागातील माणसांना शूद्र अडाणी समजून, शहरी माणसं मातीतून नाती जन्माला घालणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला विसरत आहेत, त्यांचा सन्मान व्हावा, दिखाऊपणाच्या भडक युगात महापुरुषांच्या विचारांना डावलून लोक स्वतःचा मोठेपणा आज मिरवत आहेत. अशा लोकांना सगळंं उलथून टाकलं पाहिजे, असा क्रांतीदर्शी विचार ते मांडतात. आदर्श गाव ही संकल्पना ऐकायला बोलायला लांबून चांगल्या वाटणारे आहेत, परंतु दुर्दैवाने नवरदेवाला नोकरी सोबतच शेती सुद्धा हवी म्हणणारी पिढी शेतीत राबायला तयार नाही. याच अनुषंगाने कवी अरुण काळे लिहितात, “अक्षर सुधारण्यासाठी कुणी कविता लिहित नसतं, कविता लिहिणे ही तितकं सोपं नसतं.” मनाची तळ नांगरून काढावी लागतात, पेरणीला हात देताना जीव खणावा लागतो, नाही तर भाकड प्रश्नांपोटी भाकड उत्तर जन्माला कितीसा वेळ लागतो? कविता लिहिण्यासाठी आंतरिक मनाची ओढ असली पाहिजे. रेड कार्पेटवरले मऊ पाय, मातीतले काळे पाय, गादीवाफ्यावर भाजी खुडणारे हात, लेकीबाळीवरच्या अत्याचाराच्या गोष्टी, तंत्रज्ञानाने जोडलेली, तोडलेली नातीगोती, आतड्याची आग विझणारी चूल, व्यसनमुक्तीवर भाषण देणारी व्यसनी मंडळी, फाशी घेण्यासाठी झाडाला अडकलेल्या कासऱ्याला विरोध करता येत नसल्याची खंत वाटणारी झाडं, जगातल्या सगळ्या कुऱ्हाडी नष्ट करायला सांगणारी झाडं, मनगटाशी इमान राखायला सांगणारी बांगडी, तू काय रे सारखं लिहीत असतो, असं निरागसपणे विचारणारी आई, आई-बाप म्हणजे मायेचा देव्हारा, रोजगार हमीच्या खात्यावर आणि स्वतःच्याच प्रगतीची समीक्षा करणाऱ्या आईने कष्टाच्या पुरवण्या जोडत दर दिवशी वार्षिक परीक्षा देत जगण्यावर पीएचडी करणारी आई अशी असंख्य शब्दरूप प्रतिकात्मक यात आलेले आहेत. प्रत्येक संदर्भ व त्यातील दुःखाचा पीळ मात्र अगदी वेगळा आहे. माणसांच्या जगण्याची धार मात्र सारखी त्यासाठी स्वप्न हवी असतात, अशा स्वप्नांच्या प्रदेशात पोटभर भाकरी मिळण्याचे एकमेव स्वप्न असणारे शुल्लक जीव काही कमी नसतात. भाकरीलाच राम मानणाऱ्याची व्यथा कवी भाकरायन कवितेत रेखाटतात ते म्हणतात,

    “चंदेरी चौरंगस्पर्शाच्या नादातले पाय
    कधीच नाही समजू शकत
    चिखलाची चिखलाचं एकरूप होणं म्हणजे काय?
    त्या कळण्यासाठी असावे लागतात पाय जमिनीवर
    गोऱ्या कुंभारासारखे”

    कविता म्हणजे वास्तव अनुभवांचा सुंदर आलेख आहे, त्यातील संदर्भही सामाजिक भान आणणारे आहेत, जे जे खटकत गेलं आणि ज्यामुळे वर्तमानावर वाढत गेलं किंवा दिवसेंदिवस वाढते ते ते सगळंं उलथवून टाकलं पाहिजे, अशी कवीची तीव्र इच्छा आपल्या कवितेतून त्यांनी आज लिखित केले आहेत. सामान्य माणसाला सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा आणि नात्या-गोत्याच्या बंधनात राहावे लागते. कवी झिंजाड यांनी आपल्या याच अनुभवांना व्यक्त करण्यासाठी ग्रामीण कवितेची निवड केली आहे. त्यातूनच ग्रामीण प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे.
    आजही ७०% जनता ग्रामीण भागात शेतीवर उदरनिर्वाह करते. अनेकवेळा शेतीसाठी आवश्यक असलेला निसर्ग कधी शाप तर कधी वरदान ठरतो. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा. संयुक्त कुटुंबव्यवस्थेत वेदना, त्रास, समाजातील इतर वर्गापेक्षा शेतकरी, कष्टकरी अधिक भरडला जातो. परिणामी संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते. गावात रोजगार नाही, पिण्याच्या पाण्याची समस्या, त्यातही हाती आलेल्या पिकाला हमीभाव मिळत नाही, शेतीचे समीकरण बदलले असून परिणामी शेती हा आत बट्टाचा धंदा झाला आहे. कविता संग्रहात माणूस व निसर्गाचे नाते अतूट असल्याचे वर्णिले आहे. जमिनीसारखी सृजनशीलता प्रत्येक कवीकडे असते, मात्र त्याला वास्तव अनुभवाची जोड असावी लागते, तेव्हाच माणसं चांगली निर्मिती करत असतात. असं म्हणतात कवी हा स्वप्नाळू असतो, त्यांची स्वप्ने ही समाजाचे हितासाठी असावेत जे जे खटकत गेलं आणि ज्यामुळे वर्तमानावर आरिष्टाचं सावट वाढत गेलं, ते सगळंं उलथवून टाकलं पाहिजे, असा कवितेचा आशय असून त्यांची कविता म्हणजे संवेदनशील मनाचा आरसाच आहे, त्यांच्या लेखन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा..

    समीक्षक- प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी (लेख-५८ )
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब.

  6. तुहा जल्म झालता
    तव्हा
    चिमणीत घासलेट नव्हतं…
    दुसऱ्या दिवशीच तुला पाह्यलं…या ओळी वाचताना आत-काळजात लागतं. कवी देवा झिंजाड यांच्या ‘घासलेट’ या कवितेतील या ओळी आहेत. फेसबुकवर ही कविता वाचली होती आणि मग या कवीच्या प्रेमात पडलो. या कवीला वाचावं असं वाटलं पण अजूनपर्यंत यांचं एकही पुस्तक उपलब्ध नव्हतं. जेव्हा समजलं की त्यांचं पुस्तक येतंय, तेव्हा ते मागवलं आणि मग वाचायला सुरूवात केली.

    समाजात आजूबाजूला होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्या, कर्मठता, निसर्गाची होणारी अवहेलना, घरातले दारिद्रय, कष्टकरी आणि गरिबांचा होणारा छळ, न संपणारी भूक, मुली, स्त्रियांवर होणारा अत्याचार, भ्रष्टाचार, मातीचं भेगाळलेपण, स्त्रियांच्या प्रश्नांची वाढत चाललेली जटीलता अशा अनेक गोष्टींमुळे कवी अस्वस्थ होतात आणि म्हणतात ‘हे सगळंं उलथवून टाकायला पाहिजे’ आणि अशा कविता या कवी देवा झिंजाड यांच्या ‘सगळंं उलथवून टाकलं पाहिजे’ या काव्यसंग्रहात आहेत. याची प्रस्तावना कवियित्री कल्पना दुधाळ यांनी लिहिली आहे. काळ्या मातीला हिरवं करता करता आपल्या कवितांना बहरत ठेवणाऱ्या कल्पना दुधाळ यांनी ‘सिझर कर म्हणतेय माती’ आणि ‘धग असतेच आसपास’ हे दर्जेदार काव्यसंग्रह लिहले आहेत.

    कवी देवा झिंजाड यांनी ‘सगळंं उलथवून टाकलं पाहिजे’ या काव्यसंग्रहात ‘अगतिकीकरण’, ‘भाकरायण’ आणि ‘हरवलेल्या हिरव्या बांगड्या’ अशा तीन भागात कविता लिहल्या आहेत.
    जागतिकीकरणात भरडली गेलेली सामान्य माणसे, शेतकरी वर्गाचे होणारे हाल ‘अगतिकीकरण’ या भागातील कवितांमधून पाहायला मिळतात. भाकरीचा, भूकेचा प्रश्न घेऊन जगणारी ‘भाकरायण’ इथे पाहायला मिळतात आणि ज्यांचं सुखच हरवून बसलंय अशा स्त्रिया मग ती आई, बहीण, मुलगी वा कोणतीही तरुणी, बाई असेल यांच्या ‘हरवलेल्या हिरव्या बांगड्या’ या भागात कविता वाचायला मिळतात.
    बाईचा जन्म हा बोरी, नांगरी, बांगडी, चुंभळीसारखा आहे, अशा कवी उपमा देतात. चुंबळीसारखी बाई असते हे सांगताना कवी म्हणतात,
    ती दबली जाते… ती दाबली जाते
    भिजली जाते
    थिजली जाते
    विरली जाते
    एकदा चपटी झाली की
    कायमची अडगळीत फेकून दिली जाते
    असंच तर बाईचं जीवन असतं चुंबळीसारखं. आईवर अनेकांनी लिहून ठेवलंय. पुढेही लिहलं जाईल. पण प्रत्येकजण आई वेगवेगळ्या प्रकारे मांडत असतो. इथे लहानपणी कवी आईला म्हणतात भांडी विकू नकोस, अनवाणी चालू नकोस. मग आता आई म्हणते हे सगळंं केलं म्हणून तर तुला शिकवता आलं आणि आज तू वर्तमानपत्र आणि टीव्हीत दिसतोस. आई कितीही अडाणी असली तरी आपल्या मुलांसाठी ती गुरू असते. संघर्ष करून, सर्व काही सोसून, अनुभवातून तिने पीएचडी केलेली असते. इथे कवी अंतःकरणापासून आपले आईवरचे प्रेम व्यक्त करतात. आणि म्हणून देवापेक्षाही आईला महत्त्व देताना कवी म्हणतात,
    देव नाही देवळात नको श्रद्धेचा पसारा
    चला जिवापाड जपू हा मायेचा देव्हारा

    कवी ग्रामीण भागातून मोठे झालेत त्यामुळे शेतीशी त्यांची नाळ घट्ट आहे. शेतकरी उन्हा तान्हात स्वतःचं रक्त आटवून हिरवं रान पिकवतो. हे एसीत बसणाऱ्या टायघाल्यांना समजणार नाही. विमानात बसून परदेशी दौरे करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्यायला शेतातही दौरे काढायला हवेत. दुष्काळ आणि कर्जामुळे आत्महत्या झाल्यात, होतीलही. पण माती कधीच आत्महत्या करीत नाही, कारण तिला चिमण्यापाखरांचा संसार सांभाळायचा असतो आणि पोरीबाळींचे हात उजळायचे असतात. पुढे कवी म्हणतात, आई आणि माती या दोन्ही एकसारख्याच असतात निस्वार्थी. दुष्काळामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात पण ‘नांगर’ कधीच आत्महत्या करत नाही. ही नांगर म्हणजे त्या शेतकऱ्याची बायकोसारखी आहे. कवी म्हणतात,
    नांगरत राहते त्याच्यादेखत
    स्वतःचं ऊर
    अन् सावरत राहते त्याच्या स्वप्नातलं शिवार
    तिच्या भुंड्या हातांनी…

    साठ-सत्तर हजाराचे दागिने गळ्यात घालून मिरवणाऱ्यांना अक्षरांचा भार पेलत नाही. चार पाच गुंठे जमीन विकत घेतल्यासारखे शिकलेल्या चार पाच माणसांना विकत घेऊन ठेवतात. कारण अकलेपेक्षाही पाच पाच पट पैसा त्यांच्या खिशात आहे. अशा हातात जर शैक्षणिक विकासाची सूत्रे दिलीत तर शिक्षणाचा विकास कसा होईल? असा प्रश्न कवींना पडतो. एखाद्याचं वाईट झाल्याशिवाय राजकीय स्तरावरची माणसं दारी येत नाहीत. तसं झालं असतं तर लोकांवर वाईट वेळ यायची वाटच बघावी लागली नसती. डीजे लावून पुण्यतिथी, जयंती साजरी केली जाते आणि तत्त्वे उलटी टांगली जातात. या अशा लोकांच्या हाती सत्ता असेल तर वेगळं काय होणार? असा कवीला प्रश्न पडतो. आता फुले, शाहू, आंबेडकर कुठून आणणार! त्यांचे विचार आहेतच, आता आपण स्वतःपासून क्रांती केली पाहिजेत आणि सगळंं उलथवून टाकलं पाहिजे…

    भूक माणसाला खूप काही शिकवते. जग दाखवते. भूक नसल्याचं नाटक करून आई उपाशी राहते. मुलाला पोटभर जेवण देऊन आपण मात्र पाणी पिऊन झोपते. परिस्थितीने गरीब केलं असलं तरी ती विचाराने श्रीमंत असते. मुलांमध्ये संस्कार पेरते. राबून राबून मुलांची स्वप्नं पूर्ण करताना स्वतः उपाशी राहत असे. या भूकेला, चतकोर भाकरीसाठी कराव्या लागणाऱ्या कष्टाला कवीने जवळून पाहिले आहे. पोटात जाणारा घास कचऱ्यात दिसला की त्यांना चीड येते म्हणून म्हणतात,
    तेव्हा होतात
    अनंत वेदना आतड्याला
    जेव्हा बघतो मी
    शिळ्या भाकरीचे
    श्रीमंत तुकडे
    डस्टबिनमध्ये…

    देशाचं भवितव्य ज्या तरुणांच्या हाती आहे असं आपण म्हणतो त्या तरुणांच्या हातात तर मोबाईल आहे आणि या तरुण पिढीला मोबाईलमधून डोकं वर काढायला सवड नाही. आजूबाजूला काय चालले आहे याकडे या तरुणाचं लक्ष नाही. वासुदेव, नंदीबैल सारखे कलाकार आल्यानंतर त्यांना धान्य दिलं जायचं पण आताची पिढी तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरायचे कष्ट घेत नाही. आताच्या पिढीची हृदये काँक्रीटसारखी झाली आहेत. पिझ्झा, बर्गर खाणाऱ्यांना ज्वारी, बाजरीच्या भाकरीची चव समजणार नाही. पायांना घाण लागते म्हणून मातीत पाय ठेवणं टाळू लागतात. बुटात राहून यांचे पाय रिबॉक जातीचे झालेत आणि यांच्या जिभाच म्याकडोनाल्ड जातीच्या झाल्यात, असे कवी म्हणतात.

    त्याच त्याच कविता म्हणत संमेलन गाजवणाऱ्या कवींवरही कवी चिडतात. तो करतो, ती करते म्हणून सगळेच कविता करायला निघालेत. यांच्या सादरीकरणाने, गोड सुरांवर रसिक हुरळून जातात, टाळ्या मिळतात. आईवर चांगली कविता लिहून स्टेज गाजवणाऱ्या कवीला शहराच्या मिठीत राहून गावाकडे आई वडिलांना दोन वेळच्या जेवणाची सोय करता येत नाही. स्टेजवर वाहवा मिळवणाऱ्या, इमानावर बोलणाऱ्या कवींचे स्टेज सोडलं की वेगळेच रंग असतात. अशा लोकांचे टोळके, गँग झाली आहे. ही लोकं कविता पाकिटात घालून विकतात, असे कवी म्हणतात.

    अस्वस्थता ही निर्मिती मागची प्रेरणा आहे. आपल्या लेखनात आणि वागण्यात कृत्रिमता नसावी. म्हणून जे अस्वस्थ करतं त्यावर लिहलं पाहिजे, आवाजही उठवला पाहिजे प्रसंगी सगळंं उलथवून टाकलं पाहिजे असं कवी म्हणतात. इथे काही कविता वाचताना आपल्याला हळव्या करून सोडतात… कवितेवर लिहताना कवी म्हणतात,
    “आयुष्य स्वराज्यासाठी लावून पणाला आग्ऱ्याहून सुटते कविता…”

    समाजाकडे बघत असताना कवी अस्वस्थ होतात, ही सर्व अस्वस्थता या संग्रहात वाचायला मिळते. सामान्यांच्या प्रश्नांवर कवी लिहितात. सर्वांनी वाचायला हवा असा हा संग्रह आहे. वाचकांमध्ये क्रांतीचे विचार पेरणाऱ्या कवी देवा झिंजाड यांना पुढील लेखन आणि साहित्यिक प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा…

    – हणमंत जयवंत पाटील
    कालकुंद्री / चंदगड

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us