पं. जवाहरलाल नेहरूंची जीवनकथा ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आणि स्वतंत्र भारताच्या पुनर्निर्माणाची एक विराट गाथा आहे. युगायुगांपासून आलेलं तुटलेपण आणि परकीय गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर भारत ज्या विचारांच्या बळावर आपलं पाऊल घट्ट रोवून उभा राहिला आणि ज्या विचारांमुळे त्याचं स्वातंत्र्य सुनिश्चित झालं, त्याचप्रमाणे त्याच्या आधुनिकतेला आणि विकासाला ठोस मार्ग उपलब्ध करून दिला, ते विचार पं. जवाहरलाल नेहरू यांचे होते. या विचारांवर मानवमुक्तीची वैश्विक परंपरा आणि भारतीय चिंतनाचा सखोल प्रभाव होता. त्यांच्या जीवन-संघर्षानं त्यांच्या विचारांना आकार आला होता, भारताप्रती संपूर्ण समर्पण आणि सच्च्या प्रेमानं त्यांच्या विचारांना शक्ती दिली होती. बघता बघता पं. नेहरूंबद्दल असत्य आणि संभ्रमाचा एक विराट ढीग रचला गेला, ही खरोखरच एक दुर्दैवाची बाब आहे.
नेहरू : मिथक अणि सत्य हे पुस्तक इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्या अशा प्रयत्नांविरुद्ध केलेला एक ठोस तथ्यात्मक प्रतिवाद आहे.