Mukkadar (मुकद्दर)

300

Availability: 98 in stock

SKU: 9788194782858 Category: Tag:

छातीला कळ येत होती आणि शेवटच्या क्षणी औरंगजेब त्याच्या मुलीला झीनतला म्हणतो की, ‘इस्लाममें पुनर्जन्म नहीं मानते, पर फिर भी कभी खुदा के करम से हम वापिस इन्सान की जात में पैदा हुए, तो हम इन पहाड़ो से औऱ मराठों से लड़ने नही आयेंगे, कभी नहीं…’
बादशहाचा आवाज थांबला.

असा पुस्तकाचा शेवट होतो आणि आपण स्तब्ध होतो… महाराजांना आठवत.
आयुष्यभर मराठ्यांशी युद्ध करणारा हा सुलतान मराठ्यांविषयी मनात नेहमी आश्चर्य ठेवूनच होता.

छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करताना औरंगजेब कसा होता, हे देखील वाचायला, अभ्यासायला हवं, हे नक्की. तेव्हाच आपल्याला आपल्या राजाची महती समजायला मदत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी छेडलेली जंग ही आशिया खंडातील सगळ्यात सामर्थ्यवान सुलतानाविरुद्ध होती. तो सुलतान क्रूर होता, कपटी होता, धूर्त होता, हुशार होता, द्रष्टा होता. ह्या सोबतच तो भयंकर महत्वाकांक्षीही होता. थंड रक्ताचा आणि धोरणी मेंदूचा होता, लोभी होता, पण एका फकीराप्रमाणे राहत होता. धर्मवेडा किंवा धर्मांध नव्हता, पण धार्मिक वर्तन करून लोकांना भावनिक करण्याचे अद्भुत कसब त्याच्याकडे होते. त्याच्या ह्या सर्व गुणांचा वापर करून त्याच्या इतक्याच ताकदीच्या सगळ्या शत्रूंना संपवून तो मुघल तख्तावर बसला खरा, पण स्वतःला नियंती म्हणजेच मुक्कदर समजणारा हा सुलतान अखेर स्वतःचे मुक्कदर लिहू शकला नाही.

अशा कुशाग्र बुद्धी असलेल्या मुघल साम्राज्यातील बादशाहबद्दलचे हे पुस्तक…

महाराजांच्या निधनानंतर सुद्धा तब्ब्ल २६ वर्षे मराठे तळहातावर शिर घेऊन ह्या क्रूर सुलतानाशी लढले. त्या पराक्रमाची आठवण म्हणजेच औरंगजेबाची ही चरित्रकथा.

Weight 190 g
Writer

Swapnil Kolate Patil

Number of Pages

176

Reader's Reviews

  1. संतोष पाचे
    छ शिवाजी महाराज, छ संभाजी महाराज, संताजी – धनाजी यांची चरित्रे वाचून झाल्यावर औरंगजेबाबद्दल सुद्धा वाचण्याची इच्छा होती. त्यासंदर्भात काही पुस्तके शोधली सुद्धा होती. ती एवढी मोठी आणि जाड होती की पाहिल्यावरच नको वाटत होतं. बरं औरंगजेब म्हणजे आपला दुश्मन हे तर आधीपासूनच मनात घर करून बसल होतं आणि त्याबद्दल थोडक्यात पण महत्वपूर्ण असं वाचायचंच होतं. मराठेशाहीचा सर्वात मोठा शत्रू आणि अखंड हिंदुस्तानचा बादशहा नक्की काय विचारांचा असेल हे माहीत करून घ्यायचंच होतं. काही दिवसांपूर्वी स्वप्निल कोलते पाटील लिखित मुकद्दर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलो होतो. त्यावेळी प्रकाशन प्रसंगी अनेक मान्यवरांचे या पुस्तकाविषयी संभाषण ऐकले आणि आपणच सर्वात शेवटी वाचायचो राहिलो याची खंत वाटली. त्याच दिवशी पुस्तक घेतले आणि पुढच्या २ दिवसात वाचून काढले आणि मनाच समाधान केलं. हुश्श…
    स्वप्निल कोलते पाटील म्हणतात त्याप्रमाणे, ‘आपण औरंगजेबाचे चरित्र सांगताना किंवा ऐकताना वाहवत गेलं नाही पाहिजे किंवा त्याच्या प्रेमात नाही पडलं पाहिजे’. अगदी त्याप्रमाणे अगदी स्पष्ट भाषेत त्यांनी याबद्दल लिहिलं आहे. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर सांगतात त्याप्रमाणे, ‘जर आपल्याला शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर आधी त्यांचे शत्रू काय विचारधारेचे होते हे समजून घेतले पाहिजे’ आणि त्यातही औरंगजेब काय होता ते या चरित्रातून नक्कीच कळून जाते. मुकद्दरमध्ये औरंगजेबाचे थोड्या प्रमाणात चरित्र रेखाटले आहे. त्यातल्या त्यात त्याच्या शेवटच्या काळातले. संपूर्ण भारताचा बादशाह असणाऱ्याला महाराजांचे गडकिल्ले जिंकताना अगदी नाकी-नऊ आले, याचं विस्तृत लेखन यात केलेले आहे. बाकी यात सांगितल्याप्रमाणे चरित्र जरी औरंगजेबाचं असलं तरी, त्याच्या शेवटात मराठ्यांचा पराक्रमच पानापानावर, शब्दाशब्दात वाचायला मिळतो. पुस्तकातलं शेवटचं वाक्य म्हणजे, ‘महाराजांच्या निधनानंतर सुद्धा तब्बल २६ वर्ष मराठे तळहातावर शीर घेऊन ह्या क्रूर सुलतानाशी लढले. त्याला याच मातीत मिसळवलं, त्या पराक्रमाची याद म्हणजेच औरंगजेबाचे हे चरित्र, मुकद्दर.
    धन्यवाद स्वप्निल दादा तुम्ही दिवसरात्र खपून हा अनमोल खजिना आम्हाला उपलब्ध करून दिलात.
  2. मयूर हनुमंतराव सूळ
    बादशहाने कित्येक उन्हाळे-पावसाळे, कित्येक कोटी खर्च करून अखेर वैतागून लाच देऊन राजगड जिंकला, एवढया मेहनतीने म्हणण्यापेक्षा, लाच देऊनच खरा. पण खरं तर मराठे खूप बदमाश होते, पैसे तर घ्यायचे आणि जसा बादशहा पुढं चालता झाला की हल्ला करून पुन्हा तो गड ताब्यात घ्यायचे.
    सकाळचा नमाज आवरून बादशहाने, हमिदुद्दीनला बोलावून घेतले, अन् आम्हाला राजगड पहायचाय, तरी जाण्याची तयारी करा असा हुकूम केला.
    एक वाटाड्या, हमिदुद्दिन आणि बादशहा यांनी गड चढायला सुरुवात केली. सूर्य माथ्यावर आला होता, त्यात गगनाला भिडलेला अभेद्य राजगड, मराठ्यांच्या ताकदीची साथ देत निधड्या छातीने उभा होता. चालून चालून त्याचा तो सरदार पूर्ण घामाने डबडबला होता आणि बादशहा उन्हाने हैराण झाला होता. त्याने वैतागून वाटाड्याला विचारलं “और कितना दूर” त्यावर त्याने मिश्किलपणे हसत उत्तर दिलं “बस हुजूर थोड़ा और पहुंच गए”.
    तिथं पोहोचल्यावर वाटाड्या एक एका ठिकाणची माहिती देत होता.
    तेवढ्यात बादशहा उद्गारला,
    “यही यही है वह जगह, जहासे सिवाने आसमान को छूने वाली मुगलिया सल्तनत की नीव में सुरंग लगाए, यही वह जगह है, जहां सिवा हमारे मामाजान की उंगलियां और मुगल सल्तनत की नाक काटकर, हमें बेआब्रू करके भाग आया था।
    उसे पकड़ने की हिम्मत रखनेवाले अफ़जलखान को मारनेकी साजिश इसी जगह पर रची गई थी।
    मुगलिया सल्तनत की ताज का सबसे कीमती हीरा, सूरत को बतसुरत करके पूरा खजाना इसी जगह गिना गया होगा। हमें फकीरों जैसे इस पहाड़ी मुल्कमें दर दर भटकाने वाली जगह यही है। यही है सारे जंग की जड़ यही है।”
    आधीच भर उन्हात डोंगराने फिरून बादशहाची हालत एखाद्या जनावारासारखी झाली होती, त्यात तहान पण खूप लागली होती.
    “इतना सब देख लिया हमने मगर, वो सिवा कहा रहता था वो नही दिखाया,”
    हुजूर वो पहाड़ी देख रहे हो, वहा ऊपर, वहा हमारे “महाराज” रहते थे, जाना है क्या वहा।
    आधीच उन्हाने हैराण झालेला म्हातारा औरंगजेब पहाडी बघून चक्रावून गेला,
    नहीं नहीं चलो हमें नीचे जाना है।
    असं म्हणत गड उतरायला सुरुवात केली.
    जाता जाता मनात पुटपुटत होता,
    हम जिसे पहाड़ों में रहनेवाला मामूली जमींदार समझते थे वह सिवा हमारे दरबार में आकर हमारी बेआब्रू करके चला गया, और पूरे हिन्दुस्तान का ताज अपने सर पर पहन्नेवाले खुद हम आलमगीर उस जमींदार का रहनेका ठिकाना नहीं देख पाए। उस काफर की ताकत शायद हम कभी नहीं समझ पाएंगे।”
    पुऱ्या हिंदुस्थानात एकहाती सत्ता चालवणाऱ्या बादशहाला शेवटी ह्या दगडी धोंड्यात आपला जीव सोडावा लागला. लाखो सैनिक, घोडे, जनावरे एवढा सगळा लवजमा म्हणजे एक चालचं फिरत शहरचं.
    बहुतांश किल्ले त्याने पैश्यानेच जिंकले. मराठे खूप बदमाश, छुपे हल्ले करून मोगलांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. रसद आली रे आली की मध्येच मराठे छापा टाकून लुटून नेत होते.
    दख्खनमध्ये संताजी, धनाजी तर उत्तरेत नेमाजी शिंदे धुमाकूळ घालून मोगलांना पूर्ण जेरीस आणले होते.
    औरंगजेबाची कथा स्वप्निल दादांच्या मुकद्दर ह्या पुस्तकात खूप छान पद्धतीने मांडली आहे.
    खरं तर दादा पुस्तक वाचल्यावर एका गोष्टीची जाणीव नक्की झाली की, महाराजांचा एक सच्चा मावळा आज आपल्याला न भेटता निघून गेला, ह्या गोष्टीची हळहळ आयुष्यभर सोबत राहील.
    प्रत्येक माणसाने वाचावे असे मुकद्दर हे पुस्तक आहे. थोडक्यात काय तर जाता जाता औरंगजेबाने त्याच्या आयुष्याचा पाढाच आपल्यासमोर वाचला आहे असं जाणवतं.
    औरंगजेबाला आपण खलनायक म्हणतो ते आपल्यासाठी. पण जरा बारकाव्याने विचार केला तर, कुठे तरी त्याची पण एक संघर्ष गाथा नक्की आहे. आपल्या बापाने नेहमी आपल्याला आपल्या भावापेक्षा दुय्यम समजले, ह्याची जखम न दाखवता, तिची दाहकता कमी न होऊ देता, सगळ्यांना बाजूला सारत गादीवर येण्यापासून ते ह्या डोंगरांच्या दगडधोंड्यात अखेरचा श्वास घेण्यापर्यंत त्याची स्वतःची संघर्ष गाथा.
    शेवटी औरंगजेब दोनच गोष्टींना आयुष्यात घाबरला,
    “बारिश और मरहट्टे”
  3. अमर साळुंखे
    औरंगजेब शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत दक्षिणेत उतरला नाही, कारण तो शिवाजी महाराजांना घाबरत होता असा फाजील कल्पनाविलास आमच्या काही इतिहासकारांनी केलेला आहे. औरंगजेब जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने आपल्या नातलगांपैकी ३६ आप्तस्वकीयांचा बळी घेतला. बायकोकडचे नातलग सोडले तर त्याने कोणाची गय केलेली दिसत नाही. त्याने स्वतःच्या भावांना तर नष्ट केलेच, परंतु त्या भावांच्या मुलींची स्वतःच्या पोरांसोबत लग्न लावून दिली. दारा शिकोहच्या बायकोबरोबर त्याने स्वतः लग्न केलं.
    एकीकडे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची वार्षिक मिळकत साधारण दीड कोटी होती, तर दुसरीकडे औरंगजेबाची मिळकत ४० ते ५० कोटीच्या घरात होती. २२ सुभ्यांचा तो अधिपती होता. पाच पिढ्यांनी कमावलेली धन दौलत आणि सत्ता त्याच्या पायाशी लोळण घेत होती. औरंगजेबाचा पिता शहाजहान याने जो ताजमहल बांधला त्याची त्यावेळेची किंमत होती सोळा लाख रुपये. हा शहाजहान जी जपमाळ वापरायचा त्या जपमाळेची किंमत होती वीस लाख रुपये. हातात सत्ता आली की संपत्तीही आपोआप राज्यकर्त्यांची कदमबोशी करते. तुर्की, अफगाणी, उझबेगी सेनापतीचा त्याच्या दरबारात भरणा आहे. काबूल, कंदाहार ते अहमदनगर गुजराते पर्यंतचा अनुभव गाठीशी घेतलेला हा मोगल पातशहा आहे. कुठलीही गोष्ट तो विसरत नाही. त्याला कसलेही व्यसन नाही. संपूर्ण आयुष्य एखाद्या फकीराप्रमाणे अगदी साध्या राहणीत त्याने व्यतीत केले आहे.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांना समजणारी जी माणसे होती ती अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती. शहाजीराजे, आईसाहेब जिजाऊ, राजकुमार संभाजी राजे, सेनापती हंबीरराव मोहिते, सेनापती संताजी घोरपडे, सेनापती धनाजीराव जाधव आणि या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांना ओळखणारी जी व्यक्ती होती तिचे नाव आहे औरंगजेब.
    स्वतःच्या जन्मदात्या बापाला विषारी तेलाची मालिश करून ठार मारणारा हा औरंगजेबाच होता. स्वतःचा थोरला भाऊ दारा शिकोह याला एका गुलामाकडून एखादं कोंबडं कापावं तसं निर्दयपणे कापणारा औरंगजेब. मुराद बक्षला अफूचा डोस देऊन देऊन ठार करणारा औरंगजेब. शहा शुजा ह्या त्याच्या भावाला आरकानच्या टेकड्यांमध्ये जंगली लोकांकडून मारून टाकले, आजपर्यंत त्याची समाधीही कोणाला सापडली नाही इतका क्रूर आणि निर्दयी औरंगजेब. एवढंच काय तर औरंगजेबाने स्वतःच्या हयातीमध्ये स्वतःच्या मुलींची लग्न होऊ दिली नाहीत. स्वतःचा मुलगा अकबर याला त्याने देश सोडून जाईपर्यंत जंग जंग पछाडले शेवटी इराणमध्ये त्याचा मृत्यू झाला.
    असा हा क्रूर बलाढ्य आणि वैभव संपन्न बादशहा शिवाजी महाराजांना घाबरत होता असं म्हणणं म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे. स्वतःच्या राज्याची राज्यव्यवस्था व्यवस्थित लावून औरंगजेब दक्षिणेत उतरला, परंतु तोवर औरंगजेबाचा सामना करण्यासाठी शिवाजी महाराज अस्तित्वात नव्हते. त्यांचा मृत्यू झाला होता. १७४ वर्षे राज्य करणाऱ्या कुतुबशाहीचा शेवट औरंगजेबाने अवघ्या सहा महिन्यात केला. १९० वर्षे राज्य करणाऱ्या आदिलशाहीचा शेवट औरंगजेबाने केवळ दीड वर्षात केला, परंतु २२ ते २३ वर्षे दक्षिणेत खपूनही मराठ्यांचे स्वराज्य त्याला संपवता आले नाही. कारण त्याचा पाया हा छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम केलेला होता
    औरंगजेबाला समजून घेणे इतके सोपे नाही आणि जेव्हा आपण औरंगजेबाला समजून घेऊ तेव्हाच आपल्याला शिवाजी महाराज समजतील. औरंगजेबाचा एकूण राज्य विस्तार आणि ताकत जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हाच शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि शिवाजी महाराजांची मजल आपल्या लक्षात येईल.
    आदिलशाही आणि कुतुबशाही हे नाममात्र आहेत. आपला खरा शत्रू हा औरंगजेब आहे हे शिवाजी महाराजांनी कित्येक वर्षापूर्वी ओळखले होते. परंतु हाच औरंगजेब नक्की कसा आहे हे गेल्या तीनशे वर्षात शिवाजी महाराजांवर नितांत प्रेम करणाऱ्या तुम्हा आम्हाला समजले नाही हे खरोखरंच दुर्दैव म्हणावे लागेल.
  4. विकास जाधव
    कथा नियतीने फटकवलेल्या औरंजेबाची, कथा सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांनी आणि बरसातीने झोडपलेल्या औरंगजेबाची, कथा मराठयांच्या दहशतीने धास्तावलेल्या औरंगजेबाची, कथा अगणित द्रव्य व प्रचंड सेनासागर असूनही असफल ठरलेल्या औरंगजेबाची, कथा जिंकूनही न जिंकलेल्या औरंगजेबाची, कथा हट्टी, संशयी, क्रूर पातशहा अखेरीस भ्रष्टाचारीव स्वार्थी सरदारांपुढे बेजार औरंगजेबाची, कथा ताराराणी व मराठयांच्या चिवट झुंजीची, कथा जिंदापीर बनलेल्या, अखेर महाराष्ट्रातच थडग्यात गाडल्या गेलेल्या औरंगजेबाची.
    लेखक स्वप्निल कोलते यांनी लिहिलेली ही कादंबरी एकाच दमात वाचून काढली. चित्रकार प्रमोद मोर्तींचे चित्र अभ्यासपूर्ण त्यांच्या परंपरेला साजेसे अप्रतिमच झालेय. सध्या वाचनाला खूप वेळ मिळतो, पण सामाजिक माध्यमात लिहायला वेळ मिळत नाही म्हणून जरा उशिरानेच पोस्ट करतोय.
  5. प्रसाद विष्णू पारसेवार
    सध्या खूप चर्चेचा विषय ठरलेलं पुस्तक वाचकांच्या चर्चेचा ठरतोय. बहुधा अशी पुस्तके लिहायला कोणी धजावत नाही. कारण आपल्या आदर्शाच्या विरुद्ध उभं राहिलेल्या व्यक्तीला महत्त्व प्राप्त करून द्यावं असं कोणालाच वाटतं नाही आणि ते साहजिकच आहे. मी सुद्धा सतत ऐतिहासिक पुस्तकांच्या शोधात असताना मला मुकद्दर बद्दल समजले. पुस्तकाचं मुखपृष्ठ, त्यावर असलेली चित्र आणि सर्वात शेवटच्या पानावर असलेली छत्रपतींची समाधी आणि त्यासंबंधी लिहिलेला मजकूर सर्व काही गोंधळ निर्माण करणारे. पण पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एक एक संभ्रम दूर होत गेला.
    आज वर आपण मराठ्यांनी लढलेली लढाई, त्यांच्या शौर्याच्या लढाया, त्यांनी केलेले भीम पराक्रम एक ना अनेक विषय वाचले. पण या संबंधात हे ज्या शत्रूच्या संबंधाने घडत होते त्याचवेळी हे सर्व घडत असताना त्याची मनाची, शरीराची, त्याच्या सरदारांची, सैन्याची, धनाची, परिवाराची काय अवस्था झाली या संबंधी वाचकाला म्हणावं असं काही लाभत नव्हतं. ते या पुस्तकाच्या रूपाने मिळेल असे वाटते.
    इतिहास समजून घेताना दोन्ही बाजू पहाव्या लागतात.
    एक वेळ स्वतः विकत घेऊन वाचावे असे पुस्तक..
Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us