कोहजाद म्हणजे विद्रोह.
हा विद्रोह केलाय आपल्याच नैसर्गिक संपत्तीला, शिक्षणाला मुकलेल्या भुमीपुत्रांनी.. बलुचिस्तानच्या सुपूत्रांनी. बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक भाग, पण पाकिस्तान त्यांना कायम सावत्रपणाने वागवत, कायम मागासलेले ठेवण्याचा प्रयत्न करी.
या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला कोणी ना कोणी योद्धा उभा राहणारच होता. कारण संघर्षातील शेवट हा पुढील पिढ्यांना लढण्यासाठी प्रेरणा देणारा असतो आणि ह्या अन्यायाविरुद्ध संघर्ष उभारला तो ‘अकबर खान बुग्ती’ यांनी..
खान बाबांनी उभारलेला संघर्ष हा बलुचिस्तानच्या तरूणांना प्रोत्साहन देणारा होता. लढता लढता मरण पत्कारावे लागले तरी खानबाबांच्या संघर्षाची प्रेरणा घेऊन अनेक नवे योद्धे बलुचिस्तानच्या या भूमीसाठी, तिला स्वातंत्र्य करण्यासाठी तयार होत होते.
या बलुचिस्तानच्या लढ्यात आपले मराठेही खान बाबाच्या सोबतीला होतेच.. बुक्ती मराठा…
पानिपतच्या युद्धानंतर जे मराठे भारतात पोहोचू शकले नाहीत त्यांना अब्दालीबरोबर त्याच्या देशात गुलाम म्हणून नेण्यात आले. त्यांचे बळजबरीने धर्मांतरही करण्यात आले. पण तरीही त्यांची ओळख थोडीच पुसली जाणार होती? जेव्हा अब्दाली संकटात होता तेव्हा याच मराठ्यांनी त्याचा जीव वाचवला होता..
कालांतराने जन्माने आणि कर्माने मराठी असलेले हे योद्धे बलुचिस्तानात स्थायिक झाले. बलुचिस्तानच्या हक्कासाठी खानबाबाबरोबर संघर्षांतही उभे राहिले.
जळणं आणि जाळणे हा बलुचिस्तानच्या आयुष्याचा अविभाज्य घटकच झाला होता. पाकिस्तानने त्यांच्या विरोधात केलेले घातपात आणि बलुचिंनी या घातपाताला कधी तडकाफडकी तर कधी संयमाने दिलेली उत्तरे, त्यांचा संघर्ष आपल्याला ‘कोहजाद’मध्ये अनुभवायला व वाचायला भेटतो.
शेवटी कसंय, आयुष्यात त्यागाशिवाय कधीही आणि कुठलीही गोष्ट घडत नसते.