Kahun (काहून)

300

Availability: 99 in stock

SKU: 9788193446812-2 Category: Tag:

मराठ्यांनी अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर जाऊन केलेला पराक्रम म्हणजे काहून. जी लढाई फक्त आणि फक्त मराठेच करू शकतात ती लढाई म्हणजेच काहून.

१८१८ मध्ये इंग्रजांनी इथले किल्ले जरी ताब्यात घेतले असले, तरी सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या मावळ्या मराठ्यांचा लढाऊबाणा इंग्रज चांगलेच जाणून होते. कोणत्याही परिस्थितीला म्हणजे नैसर्गिक किंवा लढाईला तोंड देण्याचे सामर्थ्य, थोरल्या महाराजांनी दिलेली शिकवण ते कधीही विसरले नाहीत आणि विसरणार नाहीत, त्याची प्रचिती आपल्याला काहून वाचताना येते. सह्याद्रीसारख्या निसर्गरम्य ठिकाणाहून अफगाणच्या वाळवंटात तग धरून राहणं ही साधी सोप्पी गोष्ट नाही. त्या गोष्टीवर मात करून बॉम्बे रेजिमेंट (मराठा लाईट इन्फंट्री)च्या युनिटने सिद्ध करून दाखवले की, गनिमीकावा करून रणसंग्राम कसे जिंकता येतात.

काहूनची लढाई ही तिथल्या स्थानिक लुटारू टोळीवाल्यांबरोबर असली तरी त्यापेक्षा तिथल्या वाळवंटी वातावरणाबरोबर सुद्धा कशी आहे, हे लेखकाने अतिशय अभ्यासपूर्वक सांगितले आहे. काहून वाचताना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की, मुघल सैन्य सपाटीचा प्रदेश सोडून जेव्हा आपल्या सह्याद्रीत यायचं तेव्हा इथल्या डोंगरदाऱ्यांमध्ये त्यांचे असेच हाल झाले असतील का? शिवाजी महाराजांनी जेव्हा उंबरखिंडीत खानाची कोंडी केली आणि त्याला तिथून माघार घ्यावी लागली, तेव्हा आपला विजय झाला हे आपल्याला माहीत आहे. पण मुघल सैन्याच्या बाजूने विचार केला, तर तिथे त्यांची प्रचंड जीवित व आपत्तीची हानी झाली होती. अगदी तसाच प्रसंग आपल्यावर ओढवल्यावर आपली मानसिकता काय असेल, हे काहून वाचताना लक्षात येते.

Weight 240 g
Writer

Abhishek Kumbhar

Number of Pages

182

Reader's Reviews

  1. प्राची रेणुसे मोहिते
    “रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग,
    अंतर्बाह्य जन आणि मन”
    असं संत तुकोबारायांनी सांगितलेलच आहे. याची प्रचिती काहून वाचताना येते.
    काहून अफगाणिस्तान मधील एक ठिकाण, जे जिंकून तिथे आपलं वर्चस्व राहावं यासाठी इंग्रजांच्या वतीने लढलेल्या त्यांच्या लष्करातील सैन्य अधिकारी, काळी पाचवी व बॉम्बे रेजिमेंट मधून लढण्याऱ्या मराठ्यांची वास्तव कथा.
    युद्ध तुकडीतील सैनिकांच्या/ अधिकाऱ्यांच्या संभाषणामधून, इतिहासातील संदर्भ देत व परिस्थितीचे स्वगत बोलल्याप्रमाणे तात्त्विक विश्लेषण करत सुरेख कथा गुंफण हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य.
    काहूनचा प्रवास सुरु होतो तिथून, ते पुन्हा मायदेशी स्वाभिमानाने परत येण्याचा प्रवास, त्या प्रवासात झालेली वाताहत व यशस्वी झुंज. आपल्याच समोर युद्ध न होता फक्त निसर्गाच्या कोपाने होणारी जीवितहानी, पोटभर जेवण तर सोडाच पण जिथे प्यायला पाणीही नाही अशा वाळवंटामध्ये फक्त जीव न जगवता शत्रूलाही हैराण करून त्यांच्या पुढे मान न तुकवता दिलेला लढा म्हणजे काहून.डोळ्यात फक्त पाणी नाही तर अंगावर शहारे आणणारे आणि मनाची तगमग होणारे एक एक प्रसंग.. मधली काही पाने वाचून झाल्यावर तर डोकं सुन्न होऊन गेले होते. एखादं पुस्तकं वाचून झाल्यावर त्याचा प्रभाव कितीतरी दिवस आपल्या अंतर्मनावर कोरून राहतो तसंच काहीसं. ज्याप्रमाणे सुहास शिरवळकरांची जाई आणि गो. नि. दांडेकरांचं जैत रे जैत पुस्तक वाचल्यानंतर शेवटी मनाची जी घालमेल होते, तशी काहूनचा मध्य वाचताना होते. एका ठिकाणी आल्यावर तर मी पुस्तक बंद करूनच ठेवलं, त्या काहून मधल्या जीवांनी काय सोसलं असेल, कल्पना ही करवत नाही. काही पुस्तकं आपण एका दमात वाचून काढतो, पण काहून वाचताना आतून तुटल्यासारखं होतंय, जणू आपण स्वतः त्या तटबंदीच्या आता लपून लढा देत बसलोय आणि अन्न पाण्यावाचून आपल्याला जीव सोडवा लागणार आहे.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमीकावा, युद्धनीती, व खंबिरपणा याचा पिढीजात वारसा लाभलेल्या या सैनिकांनी ज्या पद्धतीने हा लढा दिला आहे तो खरंच खूप गौरवशाली आहे. मरणाचे सोहळे करणे म्हणजे काय हे काहूनचा लढा वाचून समजतं.
    यातला खूप भावलेला शब्द म्हणजे काळीजधागे आणि या खालच्या ओळी,
    “मरणाचं खरंच काही नसतं ओ, चटकन कुठून तरी येऊन ते आपल्या माणसाला मोठया प्रेमानं त्याच्या कवेत घेऊन होणाऱ्या नरकयातनांतून सुटका करून देत असतं. खरा त्रास तर जगणंच माणसाला देत असतं. पण या साऱ्याची प्रचिती येण्यासाठी मरणाच्या इतक्या भयंकर संगरातून तुम्हाला जावं लागतं. युद्ध हे असंच असतं शेठ. जगणाऱ्यांचं मरणासाठीचं युद्ध…..हे युद्ध”
    अवश्य वाचावं आणि संग्रही असावं असं पुस्तक.
  2. Review 2 : – विजय_गायकवाड
    लाखो कोस दूर अगदी काळ बनून ठाकलेल्या निसर्गापुढे आणि तेवढ्याच निर्दयी, क्रूर अफगाणी सैतांनापुढे सह्याद्रीतल्या मावळी मर्दांनी गाजविलेल्या शौर्याची कहाणी म्हणजे काहून.जवळपास जगावर राज्य केलेले महान साम्राज्य म्हणजे इंग्रज. ते इंग्रज सुद्धा बोलतात की, ‘या खडतर (अफगाण) भागात आपलं ठाणं मजबूत करायचं असेल तर आपल्याला मराठ्यांवाचून पर्याय नाही’. इथेच मराठी मर्दांची लढण्याची खूम खूमी समजते.

    पानिपतात महाराष्ट्राच्या घरागनिस माणूस गेला, पण त्यातला हाताच्या बोटावर मोजण्याइतका परत आला. या सगळ्याला कारणीभूत असलेल्या अब्दालीच्या नातवाला त्याच्या गादीवर इंग्रजांच्या नेतृत्वात का होईना मराठे बसवतात, ही गोष्ट सामान्य नाहीये.
    काहूनवर या फाकड्यांनी दाखवून दिलं की, नियतीने, निसर्गाने आपल्या विरुद्ध कितीही आघाड्या उघडल्या तरी त्या विरोधात आम्ही मराठे कुठेही, कोणासोबतही आणि निसर्गाच्या कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही बलाढ्य व क्रूर सैतांनासोबत लढू शकतो व त्याला जेरीस आणू शकतो. मग ते धिप्पाड क्रूर अफगाणी असो नाहीतर इतर कोणी.
    लढणारे असंख्य ज्ञात अज्ञात प्राणपणाने लढले व काही कर्तव्य पार पाडताना मायभूमीपासून लाखो कोस दूर परक्या भूमीत रानमाळावर आपला देह सोडून गेले.
    या सर्वांना “काहून” रुपी पुष्पगुच्छातून तुम्ही खरी श्रद्धांजली वाहिली अभिषेक कुंभार भाऊ.
    बाकी तुम्ही रंगविलेली जया, कान्हा, तात्या, बज्या, म्हादया, सरदार, जाधव ही पात्रे तुमच्या लेखणीची तारीफ करायलाच लावतात.
    इतिहासाची आवड असणाऱ्यांनी प्रामुख्याने मराठयांच्या इतिहासाची आवड असणाऱ्या प्रत्येकांनी आपल्या पूर्वजांची लाखों मैल दूर घडलेली अपरिचित शौर्यगाथा नक्की वाचावी.

  3. Review 3 : – आदित्य अरुण गरुड देशमुख 
    ‘काहून’ वाचलं आणि डोक्यात विचारांचं ‘काहून’च माजत राहिलं.
    आधी आठवला तो अक्षयचा ‘केसरी’ चित्रपट.
    किती ती लढण्याची खुमखुमी? छत्रपती शिवाजी महाराज यांसोबत हिंदवी स्वराज्याच्या लढ्यात आपले शौर्य गाजवणाऱ्या मराठ्यांना लढाई हा विषय तसा नवीन नव्हता. पण पोटासाठी अन्न, लढण्यासाठी दारुगोळा कमी असताना देखील फक्त हिंमतीच्या जोरावर शत्रूला झुकवणे आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेणे हे फक्त मराठेच करू शकतात. तेही हे सगळं इंग्रजांच्या सैन्यात असताना…खरं तर इंग्रजांना वेठीस धरून सरळ त्यांना मरणाच्या दारात सोडून परस्पर शत्रूला मिळून स्वतःचा जीव देखील त्यांना वाचवता आला असता, पण दिलेला शब्द आणि इमान यामुळेच मऱ्हाटा ओळखला जातो, त्या आपल्या पूर्वजांचा अपमान कसा होऊन देतील हे बहाद्दर… ‘काहून’ म्हणजे इंग्रजांनी फक्त मराठ्यांच्या जीवावर काढलेली एक मोहीम. त्यात वेळ, परिस्थिती, भौगोलिक भाग असा की जिथे जगणे देखील अवघड अशा परिस्थितीमध्ये जगण्याची शर्त करून शौर्य गाजवलेच त्यांनी…

    त्यांच्या या शौर्याची इंग्रजी फौजेने देखील दखल घेऊन पुण्यात एक रोड ला ‘काहून’ नाव दिले.

  4. Review 4 : अजिंक्य_अरुण_महाले.
    “काहून” मराठ्यांची अपरिचित शौर्यगाथा…कुंभारानं जसं एखादं मातीचं भांडं घडवावं तसंच अभिदादानं हे पुस्तक आपल्यासमोर मांडलंय…

    ज्याने आपल्या बापजाद्यांचा पानिपतच्या युद्धभुमीत पराभव केला होता, ज्याच्यामुळे मराठ्यांच्या घरातील अख्खी एक पिढी गारद झाली, त्या अफगानिस्तानचा निर्माता अहमदशाह अब्दालीच्या ६० वर्षाच्या म्हाताऱ्या नातवाला त्याचं तख्त-ए-ताऊस मिळवून देण्यासाठी आपल्या मातृभूमीपासून कित्येक मैंलावर असणाऱ्या परमुलखात मर्दुमकी गाजवून इतिहासात गडप झालेल्या अपिरिचित शूर-विरांची ही शौर्यगाथा म्हणजे “काहून”….

    खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला मावळा जो शिवराय अनंतात विलिन झाल्यानंतर दोन-अडीचशे वर्षानंतरही गनिमीकाव्याने अन् त्याच धीरोदत्ताने लढला, त्याबद्दल खूप हायसं वाटतं. जिथं घोटभर पाणी मिळणं मुश्किल तिथं रोजच्या-रोज पोटाला चिमटे काढत एक-दोन नव्हे तर तब्बल पाच महिने वातावरणातील अनिश्चित बदल, शत्रुंच्या सततच्या कुरापती, खायला पुरेसं अन्न नाही की प्यायला पाणी नाही, या साऱ्या समस्यांना चोख प्रत्युतर देत कुठलीही तक्रार न करता सदैव युद्धास सज्ज असलेला मराठा मावळा काहूनमध्ये दिसतो.
    अहो मराठे म्हणजे काय…??
    रात्रीचा अंधार..
    सकाळची ललकार..
    दुपारचा अंगार..
    अन् तिन्ही सांजेचा श्रुंगार…
    पुस्तकातील क्लार्कचं एक वाक्य खूप छान आहे, ‘शिपायानं कधी आपला व आपल्या पिढ्यांचा इतिहास विसरु नये’. हे तुमचं तरुण रक्त आपला इतिहास विसरलेलं नाही.
    सुभेदार जाधव, सुभेदार मोहिते, किल्लेदार जयसिंग डिंबळे पाटील, बज्या, म्हाद्या, किसन्या, तुका, कान्या यांतील काहीजणांची नावं खरी नसली म्हणून काय झालं? त्यांनी गाजवलेला पराक्रम, त्यांनी घडविलेला इतिहास मात्र खरा आहे, अन् तो आमच्या सर्वांसमोर मांडला त्याबद्दल अभिषेक कुंभार यांचे मनपूर्वक धन्यवाद.
    “शब्दसम्राट” खरंच तुम्ही “शब्दसम्राट” शोभता. “काहूनसाठी” तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. तुमची लेखणी दिवसेंदिवस अशीच बहरत राहो, अन् आगामी काळात आम्हाला असेच नवनवीन विषय वाचायला मिळोत, ही सदिच्छा. अभिदादा तुमच्यासारख्या उमद्या लेखकांमुळे आपली तरुण पिढी खरंच आता आपला इतिहास न विसरता इतिहास वाचविण्यासाठी वाटचाल करतेय याचा अभिमान आहे. अभिदादा आपणास पुढील वाटचालीस सह्याद्रीएवढ्या शुभेच्छा…

  5. Review 5 : वैभव साळुंखे पाटील
    भयाण वाटेवरचं ज्वलंत सत्य…
    अफगाणिस्तानच्या भूमीवर फोफावलेल्या बंडाचा समाचार घेण्यासाठी अपरिचित मराठवीरांनी केलेले शौर्य म्हणजे काहून…!मराठा सैन्याचा मुंबई ते काहून प्रवास हा थक्क करणारा आहे. सुभेदार जाधव, सुभेदार मोहीते, जयसिंग, बज्या, म्हादया, किसना, तुका ही पात्र काहूनला जिवंत बनवतात. कादंबरी लिहित असताना लेखकाने आपला मराठी भाषेचा बाज भारी राखला आहे. शौर्य, पराक्रम, गनिमीकावा, प्रचंड मेहनत, वीरता, थक्क करणारा प्रवास, अनुकूल परिस्थितीवर मात करत लढाई हया जीवावर काहून एका वेगळ्या उंचीवर पोहचते..!

    काहून सारख्या अनेक वीरगाथा काळाच्या पडदयाआड आज गेल्या आहेत, परंतु आज काहून वाचत असताना आपण मराठी असल्याचा पुन्हा अभिमान आल्याशिवाय राहत नाही. नक्की वाचावी अशीच शौर्यगाथा आहे काहून..
    अभिषेकदादाचे खूप खूप आभार आज त्याच्यामुळे काहून समजलं..!

  6. Review 6 : कचरू चांभारे
    मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड
    अभिषेक कुंभार लिखित काहून कादंबरी मागच्याच महिन्यात प्रकाशित झाली. न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस यांच्याकडून ती प्रकाशित करण्यात आली आहे. मागील काही वर्षातल्या न्यू ईराचे प्रकाशित साहित्य पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल प्रतिपश्चंद्र, द आंत्रप्रन्योर, मुकद्दर अशा नाविन्यपूर्ण व उत्कंठावर्धक विषयास त्यांनी हात घातलेला, शिवाय यामधूनच नवीन धाटणीचे लेखक जन्माला आले ते वेगळेच. या तरूण लेखकांकडून वाचक व मराठी साहित्य विश्वास मोठी आस आहे.
    काहून कादंबरी व लेखक अभिषेक कुंभार यांचा परिचय करून देत आहे. पुस्तकाचे नाव काहून असं वाचताक्षणीच मी लेखकाला फोन लावला होता. काहून हा शब्द उर्दू धाटणीचा व माझ्यासाठी पूर्णतः अपरिचित असल्यामुळे माझ्या मनात जिज्ञासा होती. लेखकाने मला थेट कादंबरीच पाठवून दिली. लेखक अभिषेक कुंभार यांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो.
    मनोगतात शेवटच्या परिच्छेदात लेखकाने मांडलेल्या एका वाक्यापासून मी काहून ग्रंथ विशेष मांडण्यास सुरूवात करतो. लेखक म्हणतो की, आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगून त्याचे उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण करत येणा-या पिढ्यांना आपल्या क्षात्रतेजाची ओळख व्हावी. अन् काहून वाचत असताना नेमकं हेच जाणवतं की, लेखकाने आपला क्षात्रतेजाचा वारसा सक्षमपणे पेलला आहे. नाविन्यपूर्ण नाव, इतिहासात आलेला छोटासा संदर्भ, काळाच्या गर्भात दडलेल्या अनामिक नावांना घेऊन उणंपुरं अडीचशे पानाचं कथानक मांडणं ही सुद्धा लेखकाची शौर्यकथाच म्हणावी लागेल.
    काहून ही एक सत्य युद्ध कथा आहे. शिपायानं कधी आपला व आपल्या पिढ्यांचा इतिहास विसरू नये. या शिपाई धर्माला जागलेल्या शूरवीर मराठा सैनिकांची ही कथा आहे. शिवजन्मापूर्वी व शिवजन्मानंतरही अनेक मराठा सरदार सैनिकांनी आपली तलवार गाजविलेली आहे. काहून ही सुद्धा अशीच. शासनकर्ता राजा बदलला तरी मराठा तलवार कधीच म्यान करत नसतो. असं सांगणारी कथा म्हणजे काहून आहे. काहून हे अफगाणिस्तानातील एका पठारावरचं छोटसं गाव. त्या पठारावर अत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीत तब्बल पाच महिने मराठा सैनिकांनी दिलेला लढा म्हणजे काहून. या लढाईत मराठा इन्फंट्रीचा मालक इंग्रज सरकार आहे, इंग्रज शासन ज्याच्यासाठी मदत म्हणून लढवायला लावतं तो शाह शुजा पानिपतच्या रणसंग्रामातला मराठ्यांचा कट्टर वैरी अब्दालीचा नातू आहे. म्हणजे ज्याच्यासाठी लढतोय तोही शत्रूच व ज्याच्या ध्वजाखाली लढतोय तोही शत्रूच. पण तरीही या शौर्यगाथेला सलामच करावा वाटतो कारण इमान म्हणजे काय असतं? प्राणाच्या शेवटच्या अस्तित्वापर्यंत लढणं म्हणजे काय असतं? याची उत्तरे काहून देतं.प्लासीच्या लढाईने इंग्रजांना भारतीय राजकारणात सत्ताधारी होण्याची स्वप्ने पडू लागली. १८१८ साली पेशवाईच्या रूपातलं मराठा शासन संपलं अन् हळूहळू इंग्रजी सत्तेने संपूर्ण देश काबीज केला. दिल्ली हे तेव्हाही राजकारणाचे केंद्र होते व आजही आहे. पण दिल्लीच्या सत्तेसाठीचा मार्ग पंजाब, महाराष्ट्र, बंगालमधून जातो. इतिहास साक्षीला आहे की, या तीन प्रांतातल्या नरवीरांनी दिल्लीसाठी शिर तळहातावर घेतलेले आहे. डोंगरद-या, ताशीव कातळ, ऊन वारा पाऊस अशा अत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे सामर्थ्य कोणात असेल तर ते इथल्या मराठा सैनिकात आहे. छत्रपती शिवरायांनी पेरलेला पराक्रमाचा वारसा यांच्या नसानसात आपोआप प्रवाहित होतो. जिद्द, धाडस व भाकरी देणाऱ्याप्रती इमान हे मराठ्यांचे वैशिष्ट्य हेरूनच इंग्रजांनी मराठा लाईट इन्फंट्रीची निर्मिती केली होती. इंग्रज सरकार दरबारी कंपनीच्या नावे अनेक लढायांचे विजयगान लिहिले गेले असेल, पण या विजयातला रक्ततिलक मराठा, पंजाब, बंगाली सैनिकांच्या जीवावरचा आहे.

    शाह शुजाला मदत व इंग्रज पलटणीस विसावा म्हणून काहून आपल्या पदरात असावं. हा इंग्रजांचा होरा होता. पण हे काहून टोळीवाल्यांच्या ताब्यात होते. आपल्या हाताखाली काम करणा-या सैनिकांना मित्रत्वाचा मान देणारा क्लार्क हा इंग्रज अधिकारी, मराठा सुभेदार जाधव यांच्या अजोड पराक्रमाची कथा म्हणजे काहून आहे. टोळीवाल्यांशी युद्ध व प्रतिकूल परिस्थितीतला निसर्ग व नियती अशा तीन शत्रूंशी झालेली लढाई आहे. नैसर्गिक आपत्ती व क्रूर नियतीचा घाला मूळ पुस्तकातूनच वाचणे इष्ट आहे. जवळच्या जीवाभावाच्या माणसांची झालेली कापाकापी ऐकून झालेला थरकाप मूळ ग्रंथ वाचताना आपल्याला खिळवून ठेवतो. परिस्थिती इतकी प्रतिकूल असते की काहूनच्या पाण्याने सर्व सैनिकांना व उपचार करणा-या डॉक्टरलाही अल्सर होतो. पोटाच्या विकाराने सारेच त्रस्त होतात. अन्न पुरवून वापरण्यासाठी त्यांचा आहार अर्ध्यावर व नंतर तर अल्पावर आणावा लागतो. सैनिकांची लढाई ही केवळ शत्रू सैन्याशीच असते असे नव्हे, तर ती लढाई भोवताली वाढून ठेवलेल्या परिस्थितीशीही असते. याची प्रचिती काहून वाचताना येते. काहूनमधले एक काल्पनिक पात्र हे सिंहगडाजवळील कल्याणचे असल्यामुळे कादंबरीत अनेकवेळा शिवकाल डोकावतो. अन् हो, शिवकाल डोकायलाच हवा कारण तिथंच तर आपला प्राण आहे. महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगाची आठवण लेखकाने काहूनमध्ये मांडली आहे. शिवप्रसंग म्हणजे काहून लढाईला खमंग फोडणीच आहे.

    या सत्य युद्धकथेचा संदर्भ इंग्रजी पत्र व्यवहारात सापडतो. पुणे शहरातही एका रोडचे नाव काहून रोड आहे. कमीत कमी संदर्भ साहित्य उपलब्ध असताना, लेखकाने मराठा वीरांचा पराक्रम अतिशय सविस्तर मांडला आहे. म्हणूनच मला आधी लेखकाचे मनोमन आभार मानावे वाटले. केवळ मराठ्यांच्या जीवावर काढलेली ऐतिहासिक मोहीम म्हणजे काहूनचा रणसंग्राम आहे. काहूनसारख्या प्रतिकूल भागात मराठ्यांच्या भरवशावर इंग्रज विजयाचे स्वप्न पाहू शकले. या सगळ्यांची मीमांसा ग्रंथातच वाचावी. कथेतली काही पात्र काल्पनिक व काही पात्र सत्य आहेत. काल्पनिक-अकाल्पनिक मर्मावर आधारलेली युद्ध कादंबरी वाचताना आपण गढून जातो.

    केसरी या चित्रपटाची आठवण देणारी ही कादंबरी आहे. केसरी ही इंग्रजांकडून लढलेल्या शीख जवानांची अजरामर गाथा आहे. ही कथा आहे १८९७ ची. पण काहून ही कथा केसरीच्या पन्नास वर्षे आधीची म्हणजे १८४० ची आहे. सुभेदार जाधव व त्यांचे सर्व सहकारी ताटात वाढलेलं मरण कसं हसत हसत पचवतात याची कथा म्हणजे काहून.
    एकदा वाचावं अन् शौर्याचा वारस म्हणून संग्रही ठेवावं असं आहे काहून. काहूनचा अर्थ जाणून घेण्यासाठी लावलेल्या एका फोनच्या प्रतिउत्तरात लेखकाने पुस्तकच पाठवून दिले व त्यामुळे इतिहासात घडलेल्या सुवर्णपानाची माहिती वाचण्यास मिळाली. पुनश्च अभिषेकचे मनपूर्वक आभार, अभिनंदन व पुढच्या साहित्यकृतीस शुभेच्छा. सदरील कादंबरी त्यांनी मुकद्दरचे लेखक, दोन महिन्यापूर्वी अपघाती निधन झालेल्या प्रिय मित्रास अर्थात स्व. स्वप्निल कोलते पाटलांना अर्पण केलेली आहे. ही अर्पणपत्रिका जीवलगास श्रध्दांजली आहे.

  7. संदीप जाधव
    पुस्तकाचा परिचय देण्यापूर्वी लेखक अभिषेक कुंभार यांना मनापासून धन्यवाद द्यावसं वाटतं कारण वैयक्तिकरित्या तरी माझ्यासाठी मराठ्यांचा हा पराक्रम अपरिचितच होता, ज्याबद्दल कधी कोणाकडून ऐकलं देखील नव्हतं, असा इतिहासातील हा मराठ्यांचा पराक्रम कादंबरीरूपात वाचत असताना आलेला अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा असाच!!!
    आता थोडंस पुस्तकाबद्दल…..
    भारताचा इतिहास ‘मराठ्यांच्या’ उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अशक्यप्राय असणाऱ्या हिंदवी स्वराज्य निर्मितीपासून ते अटकेपार झेंडा रोवून अखंड हिंदुस्थानभर आपलं राज्य स्थापन करणाऱ्या मराठा साम्राज्याचा इतिहास अनंत पराक्रमांनी भरलेला आहे. पण ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ असं अभिमानाने बोलणाऱ्या आपल्यापैकी किती लोकांना ‘पानिपतच्या’ महासंग्रामाशिवाय मराठ्यांचे इतर पराक्रम माहित आहेत ही शंकाच आहे. आपलं दुर्दैव असं की तुकड्या-तुकड्यांनी लिहिल्या गेलेल्या मराठ्यांच्या या इतिहासातील फारच कमी आणि ठराविक गोष्टीच आज आपल्याला माहित आहेत. एक वेळ अशी होती की मराठ्यांच्या सल्ल्याशिवाय आणि मध्यस्थीशिवाय हिंदुस्थानातील कोणत्याही संस्थानचे काम होत नसे, कोणतही राजकारण पूर्णत्वास जात नसे, पण परिस्थिती हळूहळू बदलत गेली आणि मराठ्यांच्या अधिपत्याखालील एक-एक संस्थान सातासमुद्रापारहून आलेल्या मूठभर ब्रिटिशांनी आपल्या टाचेखाली घेतले. साधारणपणे १८१८ च्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वराज्यातील जवळपास सर्वच किल्ले आपल्या ताब्यात घेतले. त्यांपैकीच एक किल्ला सिंहगड आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘कल्याण’ या गावापासून या कादंबरीची कथा सुरू होते, जी संपते तिथून शेकडो मैल दूर असणाऱ्या अफगाणिस्तानच्या सीमेवरील ‘काहून’ या ठिकाणी. एका अपरिचित ऐतिहासिक घटनेला कल्पनेची जोड देऊन पुस्तकबद्ध केलेला ‘कल्याण’पासून ते ‘काहून’पर्यंतचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी “काहून”! मातृभूमीपासून शेकडो मैल दूर जाऊन, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांनी दिलेला “काहूनचा” हा लढा २४३ पानांमधून अभिषेक कुंभार यांनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर उभा केला आहे तो वाचत असताना अंगावर येणारा काटा आणि शिवरायांच्या त्या मावळ्यांच्या अतुल्य पराक्रमाने होणारा अभिमान अशा दुहेरी अनुभवातून जाणारा वाचक कादंबरीच्या शेवटी भावनिक होऊन जातो. “काहून” ही एक सत्य युद्धकथा आहे, जिचा संदर्भ इंग्रजी पत्रव्यवहारात सापडतो. काहूनच्या या युद्धाची आठवण म्हणून पुण्यातील एका रोडला ब्रिटिशांकडून दिलं गेलेलं ‘काहून रोड’ हे नावच आपल्याला मराठ्यांच्या त्या अपरिचित पराक्रमाची उंची सांगून जातं. या ऐतिहासिक घटनेबद्दल अतिशय कमी संदर्भ आणि साहित्य उपलब्ध असतानादेखील अभिषेक कुंभार यांनी या युद्धातील मराठा वीरांचा पराक्रम अतिशय सविस्तरपणे त्यांच्या कादंबरीतून मांडला आहे. कथेत गरजेनुसार काही काल्पनिक पात्रांचा समावेश लेखकांनी केला असला तरी या पराक्रमात कुठेही अतिशयोक्ती होऊ दिलेली नाही. काहूनसारख्या ठिकाणी फक्त मराठेच लढाई करू शकतात असं ब्रिटिशांना का वाटत होतं याचं उत्तरही आपल्याला कादंबरी वाचत असताना मिळून जाते. मूठभर मराठी सैनिकांनी हजारो अफगाणी टोळीवाल्यांसोबत केलेला संघर्ष आपल्याला अलीकडेच येऊन गेलेल्या ‘केसरी’ या चित्रपटाची आठवण करून देतो. इंग्रजांकडून लढलेल्या शीख जवानांचे ‘केसरी’ मधील हे युद्ध झाले होते. साधारणपणे १८९७ मध्ये पण मराठ्यांनी लढलेली ‘काहून’ची ही लढाई त्याच्याही आधी ५० वर्षें म्हणजे १८४० मधे लढली गेली होती. “काहून”मधील मराठ्यांचं युद्ध हे फक्त अफगाण टोळीवाल्यांसोबत नव्हतं तर मातृभूमीपासून शेकडो मैल दूर येऊन समोर उभी ठाकलेली अतिशय प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि नियती यांच्याशीदेखील होतं. मराठ्यांच्या याच धगधगत्या पराक्रमाची ही अपरिचित शौर्य गाथा म्हणजे “काहून”!
Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us