लेखक अभिषेक कुंभार यांनी हिमालयातील दुर्गम भागात केलेल्या सफरीवर आधारित हे प्रवासवर्णन आहे.
प्रसाद, समीर, सूरज, भूषण, पंकज, योगेश, युवराज आणि अभिषेक हे आठ तरुण लडाखला जायचं नक्की करतात. त्यांच्या वाटेत अनेक अडचणी येतात. सह्याद्रीत हिंडलेल्या या मुलांना हिमालयाचे सौंदर्य जसे अनुभवायला मिळते, तशीच इथली भाषा, दऱ्याखोऱ्यात, अवघड रस्ते, खाणे यांची ओळख होते. सर्वात महत्वाचे म्हणजे तेथील माणसं आणि त्यांची संस्कृती समजते.
“जगायला मिळणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. तसे अजूनही बरेच लोक फक्त श्वास घेत आहेत”, असे म्हणताना ‘आयुष्याचा प्रवास वसूल जागा’, या भूमिकेतून केलेले हे लेखन आहे. या तरुणांच्या बेधडक आयुष्यासारखेच पुस्तकाच्या लेखनाची भाषाही बेधडकच आहे.
हिमालयातील तो रस्ता आत्तापर्यंतच्या रस्त्यांपेक्षा एकदम विरुद्ध होता, मातीचा आणि खडतर. रस्त्यामध्ये काही वाहते नालेही होते. जून महिना म्हणजे हिमालयातल्या उन्हाळ्यातील काळ, म्हणून या नाल्यांतील पाणी कमी होते. त्यामुळेच रस्ता त्यातल्या त्यात खुशालीनं पास होत होता.
झोजीला, पोरं टप्या-टप्याने पार करत, हळूहळू उंचीही गाठत होती. झोजीला हा प्रवासातला पहिला पास होता, त्यामुळे या रस्त्याविषयी विशेष आकर्षण. त्यातही तेथील स्थानिक विषयीच्या गावगप्पांमुळे तसाही तो प्रसिद्धचं. रस्त्याची उजवी कडा म्हणजे धारदार दात, जर का इथं चुकला तर तुमचं विसर्जनच. अक्षरशः मानवी सभ्यतेच्या, पहिल्या साक्षीदारणीच्या कुशीतच. खाली खळखळत वाहणारी सिंधू नदी संपूर्ण झोजीला पार करताना पोरांना सोबतीला होती.
हिमालयाची अशी अनोखी ओळख करून देत, लेह-लदाखचा प्रवास अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचनीय आहे.