अनिल माने
अनिल माने यांचे महाविद्यालयीन शिक्षण बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद कॉलेज याठिकाणी झाले. त्यांनी M.Sc. Chemistry मध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याठिकाणी त्यांचे M.A. Philosophy चे शिक्षण सुरू आहे. उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास सुरू केला. ते करत असतानाच महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनेत त्यांची निवड झाली आणि त्यांनी बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ‘मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक’ काम केले. त्याद्वारे शासनाच्या विविध मंत्रालयांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागांतील कामांची पद्धत त्यांना समजून घेता आली.
पुढे ‘खास रे वेब मीडिया, पुणे’ याठिकाणी त्यांनी मुख्य कंटेंट रायटर म्हणून काही काळ काम केले. खासरे वेब पोर्टलच्या कामाचा अनुभव असल्याने त्यांनी काही काळ ब्लॉगिंग देखील केले.
लॉकडाउन काळात काम सुटल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तिथूनच त्यांनी Freelancer म्हणून कामास सुरुवात केली. राज्यातील काही प्रमुख नेत्यांसाठी सोशल मीडिया कंटेंट रायटर म्हणून काम केले. स्पर्धापरीक्षांची तयारी करत असताना केलेल्या इतिहास, भूगोल, मराठी व्याकरण यांच्या अभ्यासाचा त्यांना Article Writing, Storytelling, Proof Reading इत्यादिमध्ये फायदा झाला. पुढे त्यांनी Web Designing, Digital Marketing, Social Media Marketing, Youtube, इत्यादि डिजिटल विषयांचे ज्ञान मिळवले आणि त्यातच पूर्णवेळ व्यावसायिक म्हणून उतरले. आज ते यामध्ये आपला एक छोटासा व्यवसाय देखील चालवत आहेत.
कॉलेज जीवनापासूनच त्यांचा अनेक सामाजिक चळवळींशी संपर्क आला आणि ते इतिहास, सामाजिक विषयांच्या वाचनाकडे वळले. जाईल तिथून वाचण्यासाठी पुस्तके आणण्याची त्यांना सवय लागली, यातून त्यांनी स्वतःच्या घरी आपली एक छोटीशी लायब्ररी तयार केली आहे.
वाचनाचा आवाका वाढल्यामुळे साहजिकच त्यांचा लिखाणाचाही आवाका वाढला. सोशल मिडियाची त्याला जोड मिळाली. फेसबुकवर त्यांची “जिंदगीडॉटकॉम” ही विचारमालिका लोकप्रिय आहे. विविध विषयांवरील त्यांचे लेख लोकमत ऑक्सीजन पुरवणी, मासिके व अगदी शासकीय संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध झाले आहेत.
अनिल माने म्हणतात…
“लिखाण ही पेरणी आहे आणि वाचन हे उगवणं
उगवण्याची चिंता करु नका, पेरणीला सुरुवात करा.
एक दिवस तुमच्या पेरणीनं उगवलेलंच,
लोक त्यांच्या पेरणीसाठी घेऊन जातील…”
पुस्तकांबद्दल कुठेतरी वाचलेल्या या छान ओळींचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. यातूनच विविध लेखकांशी माझा संपर्क आला. त्यापैकीच एक नाव म्हणजे शरद तांदळे सर ! केवळ एक लेखक म्हणून नाही, तर लेखक असण्यासोबतच ‘सोशल काँट्रीब्युशन’ देणारे एक सजग व्यक्तिमत्व म्हणून मी तांदळे सरांकडे अधिक सन्मानाने पाहतो. या स्नेहबंधातूनच आज मी ‘न्यू इरा’ टीमचा एक भाग झालो. पुस्तक प्रकाशन क्षेत्रातील काहीही अनुभव नसताना मला या क्षेत्रातील “अडाण्याच्या अ पासुन ज्ञानवंताच्या ज्ञ” पर्यंतचा प्रवास करण्याची संधी देऊन आयुष्याची सुंदर बाराखडी शिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद तांदळे सर आणि अमृता तांदळे मॅडम यांचा मी आभारी आहे.
– अनिल माने