विकास गोडगे
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका लहानश्या खेडेगावात लेखक विकास गोडगे सरांचे बालपण गेले. वडीलांच्या नोकरीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील निमशहरी गावातून त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यांचे वडील साखर कामगार परंतु शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले. साखर कारखाना आणि गाव अशा दोन्ही ठिकाणी बालपण आणि तरुणपण गेल्याने नव्वदच्या दशकातलं गाव तसेच थोडफार गावाचं शहरात होणारं रुपांतर विकास गोडगे यांनी अनुभवलं.
देशातल्या ९९% लोकांप्रमाणे त्यांनाही कोणतीही लेखनाची परंपरा नव्हती. त्यांच्या वडीलांनी साखर कारखान्यात आकडेमोड केली, पण त्याला काही लोक साहित्य म्हणणार नाहीत. बालपणात लेखनाशी त्यांचा एवढाच संबंध आला. नाहीतर त्यांच्या अगोदरच्या सगळ्या पिढ्या शेतीमातीतंच राबल्या आणि शेतीमातीतंच खपल्या. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विकास गोडगे आता आंतरराष्ट्रीय बिझनेस कंसंल्टंसी कंपनीचे फाउंडर सिईओ म्हणून काम पाहत आहेत.
परिंदा हा त्यांचा पहिला कथासंग्रह पहिल्यांदा २०१७ साली प्रकाशित झाला आणि नंतर न्यू ईराच्या माध्यमातून २०२२ साली तो पुनर्प्रकाशित करण्यात आला. दोन्ही वेळा कथासंग्रहाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे.