स्वप्निल कोलते (उनाड)
स्वप्निल यांना लहानपणापासूनच इतिहासाची प्रचंड आवड होती. शालेय जीवनात नाटक तसेच वक्तृत्व स्पर्धेत ते हिरीरीने भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावत असत. ‘वर्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री नाटकाचे त्यांनी कितीतरी प्रयोग शालेय जीवनात यशस्वी करून दाखवले होते.
जसेजसे वय वाढत गेले तसा तसा इतिहासाचा ओढा वाढला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संदर्भयुक्त साधनांचे वाचन करत सहज सोप्या भाषेत त्यांनी लिखाण करण्यास सुरुवात केली. फेसबुक सारख्या सोशल माध्यमाचा त्यांना फार उपयोग झाला. इतिहासाची आवड, गडकिल्ले भ्रमंती, व्याख्याने तसेच ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन या गोष्टींमुळे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क वाढला.
स्वप्निल हे ‘उनाड’ या टोपणनावाने सुंदर कविता करत असत. इतिहासातील अनेक पात्र, शृंगार, सृष्टीवैभव, प्रेम तसेच इतर अनेक विषयांवर त्यांनी अनेक कविता केल्या आहेत. २०१८ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा ‘उनाड’ या नावाने कवितासंग्रह प्रकाशित झाला. स्वप्निल यांचे प्रकाशित झालेले हे पहिले पुस्तक..
पुढे, १० नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचे ‘मुकद्दर : कथा औरंगजेबाची’ ही कादंबरी प्रकाशित झाली. अल्पावधीतच ही कादंबरी वाचकांनी लोकप्रिय बनवली. या कादंबरीच्या रूपाने एक सशक्त लेखक महाराष्ट्राला मिळाला होता. औरंगजेबाच्या नजरेतून मराठ्यांचा पराक्रम मांडण्याची कल्पना त्यांना सुचली आणि या कादंबरीची निर्मिती झाली. या पुस्तकाच्या आत्तापर्यंत बारा हजारांपेक्षा जास्त प्रतींची विक्री झालेली आहे.
स्वप्निल कोलते पाटील आणि केतन पुरी या दोन तरुणांनी एकत्र येत ‘शेर-ए-दक्खन’ नावाची कादंबरी लिहिण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधाने लिखाणाची सुरुवात झालेली होती. परंतु जानेवारी २०२१ मध्ये दुर्दैवाने झडप घातली. स्वप्निल यांचा एका अपघातात अकाली मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे केवळ एका परिवाराचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासक्षेत्राचे, साहित्यक्षेत्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले. एक ताकदीचा साहित्यिक या महाराष्ट्राने अकाली गमावला.
तरीसुद्धा, स्वप्निल कोलते पाटील आणि केतन पुरी लिखित ‘शेर-ए-दक्खन’ ही कादंबरी येत्या काळात प्रकाशित होत आहे. स्वप्निल यांच्या नावाने मृत्यूनंतर प्रकाशित होणारी ही कादंबरी पुस्तकाच्या निर्मितीआधीच लोकप्रिय ठरली आहे.