प्रियांका चौधरी
प्रियांकाला लहानपणापासूनच पुस्तक वाचनाची गोडी लागल्याने ती पुस्तकात रमायला लागली. पुस्तके ही आपले चांगले मित्र आहेत. म्हणून चांगलं ज्ञान देणारी पुस्तके नेहमी वाचायला पाहिजेत, हे सूत्र तिला गवसले. पुस्तकांमुळे प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो. तसेच पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो. हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून प्रियांकाने ओपन लायब्ररी या संकल्पनेचे बीज शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात रुजवले. आता या बीजेचे वटवृक्षात रूपांतर झाले असून संपूर्ण महाराष्ट्राभर ६८ वाचनालये उभारून ५३ हजार पुस्तकांचे वाटप झाले आहे. बारा महिने, चोविस तास सुरू असलेल्या ओपन लायब्ररीची पाळेमुळे जनसामान्यांत घट्ट झाली आहेत. प्रियांका आवर्जून सांगते की, “पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहेत. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो. तसेच पुस्तकांद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे. जी कधीच थांबता कामा नये.”