नितीन थोरात
लेखक नितीन थोरात यांनी बीए अर्थशास्त्र ही पदवी प्राप्त केल्यानंतर लेखनाचे कौशल्य अवगत करायचे म्हणून जर्नलिझमच्या डिप्लोमाला अॅडमिशन घेतले. एक वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्यांनी लोकमत आणि पुढारी वृत्तपत्रामध्ये तीन वर्षे उपसंपादक म्हणून काम केले.
त्यानंतर मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नलिझमची डिग्री घेऊन त्यांनी सात वर्षे सकाळ वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम केले. २०१५ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘सूर्याची सावली’ या पहिल्याच कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा श्री. ना. पेंडसे पुरस्कार मिळाला. दरम्यान स्वीडनच्या स्टोरीटेल कंपनीने त्यांना मराठी ऑडिओ बुक लिहिण्याची संधी दिली.
त्यानंतर थोरात यांनी पत्रकारितेची नोकरी सोडून पुर्णवेळ लेखन करण्यास सुरुवात केली. २०१६ पासून आजवर त्यांनी ‘सोंग’, ‘पुढचं सोंग’, ‘पेटलेलं मोरपीस- भाग १’, भाग २ आणि भाग ३, ‘मरडेल’, ‘गण्या लव कॅरोलिना’ अशा सात ऑडिओ कादंबरी लिहिल्या आहेत. यातील ‘पेटलेलं मोरपीस’ या कादंबरीचा ‘द बर्निंग फिदर’ असा इंग्रजी अनुवाद करण्यात आला आहे. शिवाय थोरात यांचे ‘खुशबू’ आणि ‘कल्पी’ हे दोन कथासंग्रहही प्रकाशित झालेले आहेत. स्टोरीटेलसह सोशल मीडियावर त्यांनी मुबलक लेखन केलं असून सकाळ आणि दिव्यमराठीमध्ये ते स्तंभलेखक म्हणून काम पाहतात.
२ एप्रिल २०२२ रोज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांची खंडोबा कादंबरी प्रकाशित झाली आहे. नितीन सर मराठी साहित्याला लाभलेले हरहुन्नरी लेखक आहेत. आजच्या तरुण पिढीला आपलेसे करण्याची शैली नितीन सरांकडे आहे म्हणूनच सोशल मीडिया असो वा इतर माध्यमे नितीन सर तरुण पिढीला त्यांच्या लिखाणातून प्रेरणादायी वाटतात.