मयुर खोपेकर
लेखक मयुर खोपेकर सरांचे वडील गिरणी कामगार असल्यामुळे वडिलांची नोकरी गिरणी बंद पडल्यावर केव्हाच गेली. घरातील खर्च आणि सर्व भावंडाचं शिक्षण पेलण्याचे मोठे आव्हान त्यावेळी वडिलांसमोर होते. लहानपणापासून मयुर खोपेकर यांचा शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच जोर होता. आजूबाजूला साहित्याची कुणालाच आवड किंवा सवड नसल्यामुळे फार उशिराने त्यांना साहित्याची ओळख झाली आणि कालांतराने त्यातली रुची देखील वाढू लागली.
एम.बी.ए. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी भटकंतीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्याआधी सह्याद्री, गडकिल्ले आणि महाराज यांची ओळख नव्हती, असं नाही. पण त्यांचा या क्षेत्राशी कधी जास्त संबंधच आला नव्हता. २०११ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच मयुर नोकरीच्या शोधात भटकू लागले. २०१४-१५ पासून सह्याद्रीच्या डोंगररांगा तुडवू लागले. लेखक कधी आडवाटेवरच्या मळलेल्या पायवाटांवर जाऊ लागले, तर कधी नवीन पायवाटा तयार करत राहिले.
मयुर यांनी किल्ले रायगडाची केलेली सफर त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली. या पहिल्याच भेटीत किल्ले रायगड त्यांना आपलसं करून गेला. त्यावेळी त्यांच्या मनात किंचित देखील विचार आला नव्हता की, पुढे जाऊन आपण रायगडासंदर्भात ‘अग्निपर्व’ या पुस्तकाच्या माध्यमातून काही लिखाण करू शकतो.
२०१८ पासून त्यांची लिहिण्या-वाचण्याची खरी सुरुवात झाली. त्याआधी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कोणतेही पुस्तक वाचल्याचे त्यांना आठवत नाही.
मयुर म्हणतात की, “अग्निपर्वचा प्रवास हा इतकाच नवीन आहे, जितका माझा रायगडासोबतचा. किल्ला पाहताना आलेल्या प्रश्नांची तहान भागवण्यासाठी मी ऐतिहासिक दस्तावेजात शोधाशोध करून इतिहासावर छोटे मोठे ब्लॉग्स लिहू लागलो. अशा छोट्या छोट्या ब्लॉग्स मधून ‘अग्निपर्व’ ही ऐतिहासिक कादंबरी मी वाचकांसमोर मांडली आहे.”
रायगडाच्या इतिहासावर आजवर सर्वांनी खूप गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. परंतु त्यातील काही गोष्टींचा सुगावा अजून देखील लागलेला नाही. गडावर ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफेने डागलेल्या गोळ्यांनी गडाचे जे नुकसान केले होते, त्या अग्नितांडवाचे वर्णन लेखकाने “अग्निपर्व” या कादंबरीत केले आहे.