केतन पुरी
लेखक केतन कैलास पुरी यांच्या आजोबांच्या घरी अनेक पुस्तकांचा संग्रह होता, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांची वाचनाची आवड वृद्धिंगत होत गेली. इतिहासाची आवड असल्यामुळे औरंगाबाद येथील MIT College मधील इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडून केतन यांनी पुण्यातील ‘डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेमधून प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विषयामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान त्यांनी नगरधन, जि. नागपूर तसेच रायगड किल्ल्यावरील उत्खननात सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या प्राचीन तसेच मध्ययुगीन इतिहासावर प्रकाश टाकण्याचे काम केले. कसबा संगमेश्वर येथील १७ पुरातन मंदिरांचे स्थापत्य आणि शिल्पकला, संस्कृती आणि गावाच्या धार्मिक परिस्थितीवर संशोधन करून लघूशोधप्रबंध देखील त्यांनी सादर केला.
मागील काही वर्षांपासून केतन सोशल मीडियावर ‘आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची’ या फेसबुक पेज मार्फत विविध ऐतिहासिक कलखंडावर सातत्याने लिखाण करतात. यासोबतच ‘अजिंठा’, ‘बोल भिडू’ यांसारख्या दर्जेदार डिजिटल प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवरील लेख त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. एवढंच नव्हे, तर महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ, दिव्य मराठी सारख्या वृत्तपत्रांमधून देखील त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. या सततच्या लिखाणामुळे पुस्तक लिहिण्यासाठी केतन यांना मोलाची मदत झालेली आहे.
१४ मे २०२१ रोजी केतन पुरी यांचे ‘मऱ्हाटा पातशाह’ हे पुस्तक प्रकाशित झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल चित्रे कोणती होती, ती चित्रे काढली कुणी, चित्रांचे चित्रकार-रंगकर्मी कोण होते, शिवरायांची चित्रे आज कुठे आहेत, शिवराय बोलत कसे असावेत, त्याचे व्यक्तिमत्व कसे होते, त्यांचे राहणीमान कशास्वरूपाचे असावे अशा अपरिचित आणि दुर्लक्षित प्रश्नांवरील उत्तर देणारे त्यांचे हे ‘संशोधनात्मक पुस्तक’ अल्पावधीतच लोकप्रिय झाले. पुस्तक हे कथाकथन किंवा कादंबरी स्वरूपातील नसले, तरीसुद्धा आत्तापर्यंत या पुस्तकाच्या चार हजार प्रतींची विक्री झालेली आहे आणि अजूनही वाचकांचा पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
लवकरच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘शेर-ए-दक्खन’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित होत आहे.