गणेश बर्गे

आपल्याकडे दहावी नापास मुलाला काय – काय काम करावं लागू शकतं याचा अंदाज लेखक गणेश बर्गे यांच्या आजवरच्या प्रवासाकडे पाहून लावता येईल. एक वर्ष मिठाई बॉक्सच्या कंपनीत पडेल ते काम करण्यापासून, तीन वर्षे ट्रकवर क्लिनर म्हणून, नंतर तीन वर्षे चाळीस फुटी कंटेनरवर ड्रायव्हर म्हणून, त्यानंतर पंधरा वर्षे कार ड्रायव्हर म्हणून आणि आता एक वर्ष शेती करण्यापर्यंत… असं आयुष्य जगत असताना दुसऱ्या बाजूला कुणी विचारही करणार नाही एवढं सुंदर लिखाण करणारा लेखक मराठी साहित्याला गणेश बर्गे यांच्या रूपात मिळाला आहे. एकूण सामान्य माणसाला वाटणारा अविश्वसनीय असा प्रवास गणेश बर्गे यांनी केला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव, रणजित देसाई, नव्या पिढीचे आवडते लेखक शरद तांदळे आणि डॉ. प्रकाश कोयाडे यांना आपले आदर्श मानणारे गणेश बर्गे हे अत्यंत खडतर परिस्थितीतून मार्ग काढत इथपर्यंत आलेले आहेत.

दहावी नापास माणसाला लिखाणाची प्रेरणा कशी आणि कुठून मिळाली? असा आपल्याला प्रश्न पडणं साहजिकच आहे. तर याचीही गोष्ट ते स्वतः सांगतात.

२००८ साली त्यांना मुलगा झाला तेव्हा त्याला जन्मतःच मलविसर्जनाची जागा नव्हती. साताऱ्याचे प्रसिद्ध डॉक्टर संजय राऊत यांनी त्याच्यावर टप्प्याटप्प्याने सात शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवला. त्यांना काहीतरी भेट द्यावी म्हणून बर्गे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती द्यायचे ठरवले. नुसती मूर्तीच कशी द्यायची म्हणून त्याच्याबरोबर एका पानावर आठ दहा ओळी लिहून दिल्या. बर्गे यांचे जीवलग मित्र मंगेश बर्गेला ते लिखाण आवडले. त्यांनी गणेश सरांना कविता लिहिण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सहा महिने वेगवेगळ्या कवींचे कवितासंग्रह वाचून गणेश बर्गे यांनी स्वतः लिखाणास सुरुवात केली. त्यांनी एका पाठोपाठ दुरावा, हे गाणे माझ्या मनाचे, ही माझी इच्छा, प्रिये, जय छत्रपती शिवराय असे पाच कवितासंग्रह लिहून प्रकाशित केले. कुठल्याही प्रकारचा फायदा होत नसताना गणेश स्वयंस्फूर्तीने लिखाण करत होते. सोशल मीडियावरून त्यांच्या लिखाणाला पसंती मिळत होती. त्यानंतर त्यांनी आपल्या लिखाणाचा मोर्चा पद्य लिखाणाकडे वळवत ‘शिरसवाडी’ ही त्यांची पहिली कादंबरी लिहिली. ग्रामीण भाषा आणि वाचकांना गुंतवून ठेवणारी कथा असल्यामुळे वाचकांची या कादंबरीला चांगलीच पसंती मिळाली आणि गणेश यांना एक लेखक म्हणून ओळख मिळाली. आजवर या कादंबरीच्या तीन हजार प्रतींची विक्री झाली असून गणेश सर आता शेतीसोबतच आपले पुढील लिखाण करत आहेत. येत्या काही दिवसात त्यांची ‘कंठ्या’ ही काल्पनिक कादंबरी आणि ‘दहावी नापास’ हे आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे. गणेश बर्गे यांच्या साहित्यातील योगदानाला रसिकांनी आजवर अनेक पुरस्कार देऊन गौरविले आहे, त्यापैकी काही पुरस्कार खालीलप्रमाणे :
  1. साहित्य सौरभ कला प्रतिष्ठान ठाणे, स्व. पद्मा देशपांडे यांच्या स्मरणार्थ ‘विशेष साहित्य पुरस्कार’.
  2. शिवजयंती उत्सव समिती खटाव ‘साहित्य व कला पुरस्कार’.
  3. अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती ‘शिव गौरव सन्मान’.
Ganesh Barge-3
Ganesh Barge-1
Ganesh Barge-2
previous arrow
next arrow
Ganesh Barge-3
Ganesh Barge-1
Ganesh Barge-2
previous arrow
next arrow
Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us