ज्ञानेश्वर जाधवर
शिक्षणाची कास धरल्यावर वाल्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहत नाही आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले लेखक ज्ञानेश्वर जाधवर. एक ऊस तोड कामगाराचा मुलगा जो शाळेत असताना अनेकदा आपल्या आईवडिलांसोबत ऊसतोड करण्यासाठी जायचा तोच भविष्यात शिक्षणाची गोडी लागल्याने पुण्यासारख्या शहरात आला आणि तिथेच त्याने शिक्षणाच्या बळावर स्वतःच्या आयुष्याचा कायापालट केला. कॉलेजमध्ये भरपूर वाचन केल्यानंतर ज्ञानेश्वर सरांना लिखाणाची ओढ लागली आणि त्यानंतर त्यांनी अनेक कथा, एकांकिका, नाटकं लिहिली आणि स्वतःला समृद्ध करत गेले.
त्यानंतर मे २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या “यसन” या कादंबरीला थेट राज्यशासनाचा प्रथम प्रकाशन या श्रेणीतील श्री. ना पेंडसे पुरस्कार मिळाला आणि ज्ञानेश्वर यांच्या कष्टाचं चीज झालं. त्यानंतर त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ऊसतोड कामगारांचं खडतर आयुष्य ज्ञानेश्वर यांनी या कादंबरीतून मांडलं आहे.
त्यानंतर २०२० साली ज्ञानेश्वर यांनी “लॉकडाऊन” ही आणखीन एक कादंबरी लिहिली. या कादंबरीत त्यांनी कोरोना काळात मानवी नात्यांची झालेली हेळसांड मांडली आहे.