देवा झिंजाड
देवा झिंजाड हे नाव महाराष्ट्रात एक संवेदनशील कवी, प्रभावी निवेदक आणि हाडाचा समाजसेवक म्हणून प्रसिद्ध आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले देवा झिंजाड पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि उत्तम कवी आहेत. त्यांनी आजवर जय महाराष्ट्र, झी 24 तास इ. वाहिन्यांवर कविता सादरीकरण केले आहे. तसेच ३८० हून अधिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, ५२१ हून अधिक कविसंमेलनात सहभाग नोंदवून अनेक राज्यस्तरीय पुरस्कार जिंकले आहेत. देवा झिंजाड यांनी आजवर प्रकाश बाबा आमटे, श्रीपाल सबनीस ते पृथ्वीराज चव्हाण, प्रदीप लोखंडे, अधिक कदम, व इतर २३ मान्यवरांच्या जाहिर मुलाखती घेतल्या आहेत.
“आई बापाच्या कविता” आणि “पाण्यावर बोलू काही” हे सरांचे स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम आहेत, ज्यांच्या सादरीकरणासाठी त्यांना राज्यभरातून आमंत्रणं येत असतात.
सप्टेंबर २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या “सगळं उलथवून टाकलं पाहिजे” ह्या काव्यसंग्रहास महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, अक्षर सागर साहित्य परिवार कोल्हापूरचा अक्षर सागर साहित्य पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा साहित्य पुरस्कार, बालकवी पुरस्कार असे इतर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
त्याचप्रमाणे केवळ लिखाणच न करता देवा सर स्वतः राज्यभरात अनेक क्षेत्रात रचनात्मक सामाजिक कामात देखील सक्रिय सदेह सहभागी होत असतात. खेडे गावातल्या गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावात तालुक्यातील सगळ्यात मोठी संगणक लॅब उभारणीत मोठे योगदान दिले आहे.
यासोबतच परिवर्तन सामाजिक संस्था पुणे, पारनेर तालुका परिवर्तन फाऊंडेशन, महा एनजीओ फेडरेशन अशा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व राज्यभरातल्या इतर एकूण ११ संस्थासोबत सार्वजनिक कार्यात हातभार लावण्यात देवाजी सतत अग्रेसर असतात.
आपल्या लिखाणाला ज्ञानपीठ मिळण्यापेक्षा त्या लिखाणामुळे माणसांची डोकी किती नांगरली गेली व सामान्य माणसांच्या जीवनात किती बदल झाला हे सर्वात महत्वाचं, अशी भूमिका घेणाऱ्या देवा झिंजाड सरांचे आगामी काळात “सूत्र संचलन कसे करू नये” हे एक पुस्तक येत आहे. तसेच त्यांचे एका सिनेमाचेही काम सुरू आहे.