चंद्रकांत झटाले
लेखक चंद्रकांत झटाले हे विदर्भातील दैनिक अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे सह-संपादक आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते याच दैनिकात ‘मोडलेली चौकट’ या नावाने स्तंभलेखन करतात. या लेखनामधून ते चौकटी बाहेरचे विषय त्यांच्या सडेतोड आणि धारदार लेखनशैलीत मांडतात. सद्यःस्थितीला महाराष्ट्रातील निर्भीड, रोखठोक व उत्कृष्ट वैचारिक लिखाण करणाऱ्या पत्रकारांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. दै.देशोन्नती, दै.बहुजन सौरभ (नागपूर), दै.पुरोगामी संचार, दै.बंधुप्रेम (सोलापूर), साप्ताहिक ठाणे अरुणोदय (ठाणे) ह्या आणि अशा महाराष्ट्रातील अनेक दैनिक, साप्ताहिक आणि वेब पोर्टलवर दर आठवड्याला त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. श्री झटाले हे लेखनासह एक प्रभावी वक्तेसुद्धा आहेत.
चंद्रकांत झटाले यांचे वडील प्रसिद्ध वऱ्हाडी कवी व प्रखर वक्ते प्रा.बापूराव झटाले हे पेशाने शिक्षक होते. तेच लेखकाच्या वाचन-लिखाणाची प्रेरणा आहेत. चंद्रकांत झटाले हे सातपुडा प्रतिष्ठान व कबीर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व परिवर्तनवादी चळवळींमधेही ते अतिशय सक्रिय कार्यकर्ते आहेत.
चंद्रकांत झटाले हे काही वर्षांपूर्वी गांधींचे विरोधक होते. महात्मा गांधींबद्दल जे सर्वसामान्यांना, युवकांना जे गैरसमज-आक्षेप असतात तसेच ह्यांनाही होते. ते आक्षेप खरे की खोटे? हे तपासण्यासाठी त्यांनी १५० च्या वर गांधीची पुस्तके वाचली. गांधींविषयीची पुस्तके वाचतांना झटालेंना जाणवलं की, बहुतांश लेखकांनी पुस्तकांमध्ये वाङ्मयीन व खूप क्लिष्ट भाषा वापरली आहे, सोबतच फाफट पसारा वाढवून गांधींना खूप किचकट व कंटाळवाणे करून ठेवले आहे. त्यामुळे गांधी अभ्यासताना ‘ही पुस्तके नक्की लिहिली कुणासाठी आहेत?’ हाच प्रश्न त्यांना पडत होता.
यासाठी त्यांनी अनेक गांधी अभ्यासकांच्या, विचारवंतांच्या भेटी घेतल्या. त्यातून पुराव्यांसह जे सत्य समोर आलं, ते साध्या-सरळ भाषेत नवीन पिढीपर्यंत पोहोचावं याकरिता त्यांनी ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ हे पुस्तक लिहिलं. लोकांनी गांधींवरील आक्षेपांची उत्तरे मिळविण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत? कोणत्या आक्षेपाकरिता नेमके कोणते संदर्भ-पुरावे घ्यावेत? अशा असंख्य प्रश्नांचे उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तकाची भाषा अगदी साधी-सोपी, सरळ मनाला भिडणारी आणि संदर्भयुक्त आहे.
महात्मा गांधी हे मजबुर वा भेकड नव्हे, तर या जगातील सर्वात निर्भय व्यक्ती होते. ते स्वातंत्र्यालढ्यातील एक सशस्त्र व अहिंसक असे सरसेनापती होते. आजची पिढी ‘बाप दाखव नाही तर श्राध्द कर’ या बाण्याची असल्याने चंद्रकांत झटालेंनी त्याच पद्धतीने, बिनतोड युक्तिवादातून साध्या-सोप्या पद्धतीने हा विषय मांडला आहे. त्यांचे ‘स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव’ हेही पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.