अमित मरकड
“माझे प्रेमाचे प्रयोग” या आत्मकथनात्मक कादंबरीचे लेखक अमित मरकड हे एक नवीन आणि खुमासदार लेखक आहेत. शैक्षणिक वयात स्वतःच्या चुकीच्या वागण्याने आणि काही चुकीच्या निर्णयांनी भरकटलेले अमित मरकड यांना पत्रकारितेचे शिक्षण घेताना अवांतर वाचनाची आवड लागली आणि त्यातूनच त्यांना लिखाणाची इच्छा निर्माण झाली.
एक काल्पनिक प्रेमकथा लिहिता लिहिता अचानक त्यांना स्वतःच्याच आयुष्याची गोष्ट लिहाविशी वाटली. त्याच काळात त्यांचा प्रेमविवाह झाल्याने त्यांना त्यांच्या गोष्टीसाठी योग्य शेवटही मिळाला. त्यामुळे जवळपास पाच वर्षे खरडत चाललेला लिखाणाचा प्रवास लग्नानंतर तेजीत आला आणि २०२२ च्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने त्यांनी त्यांची स्वतःची लव्हस्टोरी ‘माझे प्रेमाचे प्रयोग’ या नावाने प्रकाशित केली.
या कादंबरीत त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील प्रेमप्रकरण अतिशय रंजक पद्धतीने मांडून पहिल्याच पुस्तकात वाचकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या प्रवाही लिखाण शैलीमुळे अनेक वाचक त्यांना आता मराठीतील चेतन भगत म्हणत आहेत. या कादंबरीतून अमित मरकड यांनी सामान्य मध्यमवर्गीय तरुणांचे आयुष्य शब्दबद्ध केले आहे. कुटुंब, शिक्षण, प्रेम आणि मैत्री या चारही अंगांना अलगद स्पर्शून जाणारी ही कादंबरी तिशीतल्या तरूणांना आवडते आहे.
अमित मरकड यांची ही पहिलीच कादंबरी असून या कादंबरीने त्यांना ओळख मिळवून दिली आहे.