अभिषेक कुंभार
माणसांच्या आयुष्यात होणारे अपघात हे नेहमी त्यांचं नुकसानच करतील असं नाही. कधी कधी ते माणसांना कर्तुत्वाच्या शिखरावर देखील पोहोचवू शकतात. अशाच एका अपघाताने एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती लेखक बनते. ती व्यक्ती म्हणजे अभिषेक कुंभार. चौक, कट्टा आणि दुनियादारीच्या गमतींमुळे या लेखकाचे शिक्षण काही नेत्रदीपक झाले नाही. त्यामुळे एका पुस्तकाच्या दुकानातून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि इथेच त्यांना वाचनाची गोडी जडली. इथून मात्र त्यांची इतर कामगिरी भुवया उंचवणारीच राहिली. तेव्हाच ह्या सामान्य व्यक्तीचं लेखन क्षेत्रात पदार्पण होण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
काम, पुस्तक वाचन व भटकंती असा आयुष्याचा गाडा फिरत असतानाच आवड म्हणून स्वतःच्या एका छोट्या भटकंतीवर त्यांनी एक लेख लिहिला. पुढे या पुणे – लडाख – पुणे या बाईकराईडवर आधारित लेखाचे रुपांतर ‘फिरस्ते’ या प्रवासवर्णन पुस्तकातून वाचकांसमोर आले. इथूनच त्यांचा लेखनप्रवास सुरु झाला.
घरच्या पार्श्वभूमीचे चटके बसून अंगाचा रंग बदलला, पण वागण्यात काही बदल होऊन क्रमिक अभ्यासाकडे वळावे असे वाटलं नाही. परंतु इतिहास, भूगोल आणि वर्तमानात मी मनसोक्त डुंबत गेलो, असे अभिषेक सर आवर्जून सांगतात.
अहवाल, पत्रिका, जन्मदिनाच्या कविता, मित्राच्या घरच्यांचे मैती, दहावे ते डोहाळे जेवण, बारशासाठी लिखाण करून देणे हा प्रवास सुरु असतानाच, त्यांनी २०१०-११ साली ‘आम्हीच ते वेडे, ज्यांना आस इतिहासाची’ ह्या फेसबुक पेजवरून ब्लॉग लिखाण सुरु केले. या लिखाणाने त्यांना आयुष्यभराची ओळख मिळवून दिली.
“फिरस्ते” नंतर अभिषेक यांनी ऐतिहासिक घटनेवर आधारित “काहून” ही कादंबरी लिहिली. आता हेच आपले कार्यक्षेत्र मानून मराठी साहित्य क्षेत्रात आणि मराठी वाचकांच्या मनात थोरामोठ्यांसह ते काम करत आहे.
नुकतीच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित एक रहस्यमय आणि रोमांचक अशी “कोहजाद” ही कादंबरी ते वाचकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. या कादंबरीलाही वाचकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे.