Marhatha Patshah (मऱ्हाटा पातशाह)

320

Availability: 97 in stock

SKU: 9788194782834 Category: Tag:

शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या चित्राची निर्मिती ज्या प्रसंगी झाली, त्याचे एका उत्कृष्ट चित्रकाराने वर्णन केलेले आहे. एक असा व्यक्ती जो शिवाजी महाराजांना भेटला, त्यांची चित्रे काढली.. पण आजही इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे घेतलेला मागोवा म्हणजेच मऱ्हाठा पातशाह.

छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे? त्यांचं बोलणं कसं असेल? खाजगी आयुष्यात त्यांचा वावर कसा असेल? असे एक ना अनेक प्रश्न कदाचित आपणा सर्वांनाच पडतात. केतन पुरी यांनी अतिशय मेहनतीने आणि संशोधनपूर्व लिहिलेलं ‘मऱ्हाटा पातशाह’ हे पुस्तक आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं समर्थपणे देतं.

या पुस्तकात समकालीन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लेखक, इतिहासकार, प्रवासी, चित्रकार, व्यापारी व सैन्य अधिकारी (जे प्रत्यक्ष महाराजांना भेटले आहेत) यांनी महाराजांचं केलेलं वर्णन केतनने बारकाईने अभ्यासून या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे.

महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रकारांनी महाराजांची काढलेली दुर्मिळ व महत्वाची चित्रे आणि त्या चित्रांच्या आधारे केतनने केलेलं विश्लेषण छत्रपती शिवाजी महाराज यांची हुबेहूब प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी करण्यास मदत करतात. तसेच ही सर्व चित्रे आणि ऐतिहासिक दस्तऐवज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाचे अनेक महत्वाचे पैलूही उलगडतात.

मऱ्हाटा पातशाह या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची वास्तववादी प्रतिमा आपल्या समोर उभी राहते.
शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना महाराज कसे असतील याचे उत्तर म्हणजे ‘मऱ्हाटा पातशाह’.

Weight 220 g
Writer

Ketan Puri

Number of Pages

141

Reader's Reviews

  1. Review : प्रियंका सरवार
    आपल्याला महाराजांविषयी अजून किती जास्त जाणून घ्यायचं आहे, वाचायचं आहे हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा अनेक पद्धतीने अभ्यास सुरू होतो.
    महाराजांवर आजवर लिखाण कमी झालेले नाही. पण एक अपरिचित बाजू मांडायची अशी प्रेरणा घेत लिहिलेलं केतन पुरी यांचे हे पुस्तक.
    शिवाजी महाराजांच्या चित्रांवर झालेले संशोधन हा या पुस्तकाचा गाभा आहे.
    ‘आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची’ असे फक्त म्हणून चालत नाही असे केतनने सिद्ध केलं आहे असे म्हणता येईल. कारण एखाद्या गोष्टीचा अभ्यास, बारकाईने तो विषय मांडणे, त्यासाठी जिकरीचे प्रयत्न करणे, ते योग्य त्या शब्दात यथोचित मांडणे हे सोपे काम नाही. पण केतनने ते करून दाखवले ते ह्या पुस्तकाच्या रुपात. त्या शतकातील अनेक समकालीन लोकांच्या, चित्रकारांच्या, इतिहासकारांच्या, परकीय प्रवासी यांच्या नजरेतील शिवाजी महाराज कसे होते याची कल्पना तुम्हाला येईलं. उदाहरणार्थ, प्रसिद्ध इतिहासकार स्कॉट वारिंग महाराजांविषयी लिहितात, ‘सैनिक म्हणून शिवाजीमहाराजांची प्रज्ञा इतर आशियाई सेनानायकांपेक्षा श्रेष्ठ होती, त्याच्या व्यक्तिगत कामगिरीचे स्वरूप चकित करण्याजोगे होते.’
    लहानपणापासून महाराजांविषयी अनेक लिखाण वाचत आले, इतिहासकारांची मते, त्यांची भाषणे ऐकली. प्रत्येक वेळी महाराज अधिक समजत गेले. हे पुस्तक वाचताना देखील अनेक नव्या गोष्टी कळाल्या. अपरिचित माहिती नव्याने समजली. परकीय साहित्यिक यांनी त्यांच्या साहित्यामध्येही शिवाजी महाराजांबद्दल किती लिहून ठेवले आहे, याची कल्पना झाली.
    पुस्तकात एकूण ३९ चित्रे आहेत. त्याची अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती तुम्हाला वाचता येईल.
    प्रत्येक चित्र बोलकं आहे. महाराजांचे चित्र पाहून तर अंगावर काटा येतो.
    फक्त चित्रातून प्रचंड ऊर्जा मिळते, याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. प्रत्येक चित्रातील गमती-जमती बघण्यात आणि वाचण्यात मजा आहे.
    केतनने हे पुस्तक तयार करण्यामागचा त्याचा अभ्यास, त्याची जिज्ञासू वृत्ती दिसून येते. त्याच्यामुळे मला जी नवीन माहिती मिळाली त्याबद्दल त्याचे आभारच आहे.तुम्हीही नक्की वाचा, ‘मऱ्हाटा पातशाह’..
  2. पुस्तक परिचय – सुशांत संजय उदावंत, बीड
    “मऱ्हाटा पातशाह – केतन कैलास पुरी”
    इतिहासातील एखाद्या घटनेचा अथवा व्यक्तीचा चित्रमय प्रवास वाचलेला व पाहिलेला आहे. पण चित्रांचाच चित्रमय प्रवास पहिल्यांदाच वाचला आणि पाहिला. महाराष्ट्रात १ वर्षाच्या लहानमुलापासून ते ८०-९० वर्षाच्या वृद्धांपर्यंत ज्या एका नावाचं आदरयुक्त वेड असते ते म्हणजे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा इतिहास आठवला तर त्यांच्या चरित्रातील ठराविक चार ते पाच घटना सोडल्या तर त्यापुढे सामान्य माणूस सरकत नाही. काहींना तर त्यांचं जन्मसाल पण सांगता येत नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचे असे हाल असतील तर बाकी राज्यातल्या आणि देशातल्या लोकांचा विषय सोडून देणेच बरे. पण तुमचा असा विचार असेल तर मऱ्हाटा पातशाह वाचून हा समज चुकीचा ठरेल.
    उस्मानाबाद येथे राहणाऱ्या केतन पुरी या तरुण इतिहास अभ्यासकांनी शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या संदर्भाने असे काही संदर्भ खोडून व नव्याने मांडले आहेत की गेली कित्येक वर्ष आपण त्या गोष्टीचा विचारही करत नव्हतो. त्यातला एक मुद्दा सांगायचा झाला तर आजपर्यंत आपण सर्वांनी इयत्ता चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचे एक चित्र पाहिलेले आहे, ज्यात महाराज घोड्यावर बसलेले आहेत व आजूबाजूला काही माणसे आहेत. आजवर सर्वच असे मानत आले की हे चित्र मीर महंमद नावाच्या चित्रकाराने काढलेले आहे. गेले १०० हून अधिक वर्षे सर्व इतिहासकार देखील हेच मानत आले. मुळात हे चित्र दुसऱ्याच चित्रकाराने काढलेले आहे. पुस्तक वाचले की तुमचा हा समज दूर होईल.
    शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासताना आपण फक्त स्वदेशी व्यक्तींनी लिहिलेल्या लिखाणाकडे लक्ष देत गेलो. परकीय लोकांच्या नोंदीकडे वा.सी.बेंद्रे, ग.ह.खरे, द.बा. पारसनीस, डॉ. बाळकृष्ण यांच्यासारखे इतिहास संशोधक सोडले तर आजवर कोणीही फारसे लक्ष घातले नाही. पुस्तकात वापरलेल्या परकीय साधनांमध्ये सर्वात जास्त नोंदी ह्या डचांच्या आहेत. आताच्या काळी एखाद्या इंग्रजी साधनाचे मराठीत भाषांतर करायचे म्हटले तरी असंख्य अडचणी येतात. शब्दांचे अर्थ व्यवस्थित लागत नाहीत. केतन पुरी यांचे यासंदर्भात खूप कौतुक करावं वाटते. त्यांना काही परदेशी लेखकांचे शोधनिबंध मिळाले जे डच भाषेत आहेत. आताच्या घडीला डच भाषा येणारे लोक सापडत नाहीत. अश्यावेळी काय करायचे? एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. १९७१ साली डॉ. कमल गोखले यांचा शिवपुत्र संभाजी हा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाला. हा ग्रंथ अभ्यासताना त्यांना काही डच साधनांचा शोध लागला. आता त्या काळी देखील डच भाषा समजणारे त्यातल्या त्यामध्ये १७ व्या शतकातील डच भाषा समजणारे लोक सापडणे तर खूपच अवघड होते, तरीदेखील त्यांच्या एका मित्राने काही डच साधने व पत्रे इंग्रजीत भाषांतरीत केली व नंतर गोखले यांनी ते मराठीत भाषांतरीत केले. ही गोष्ट आहे ५० वर्षांपूर्वीची. अगदी अशीच परकीय साधने वा.सी. बेंद्रे यांनी देखील संभाजी महाराजांवरील लिहिलेल्या ग्रंथात वापरली आहे. या दोन्ही इतिहास संशोधकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनात वापरलेली साधने आजही अप्रकाशित आहेत. त्यांच्यानंतर कोणत्याच इतिहासकाराने ती साधने वापरल्याचे आढळून येत नाही. केतन पुरी यांनी यात एक मार्ग काढला, तो म्हणजे गुगल ट्रांसलेशनचा वापर करत डच भाषेतील शोधनिबंध भाषांतरीत केले. यात त्यांचा बराच वेळ गेला, पण इतिहासातील बरीच रहस्य उलगडली. हे केवळ इतिहासाशी इमान राखणाराच करु शकतो.
    वरील डच शोधनिबंधातून त्यांना शिवछत्रपतींच्या काही चित्रांची माहिती मिळाली. महाराजांची चित्रे कुठे काढली गेली? भारतामध्ये असणारी चित्रे लंडन, पॅरीस, अॅमस्टरडॅम, रशिया येथे कशी पोहोचली? शिवाजी महाराजांचे प्रथम चित्र कोणी काढले? हा सर्व शोध घेत असताना शिवछत्रपतींविषयी काही अन्य नोंदी उजेडात ज्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या अश्या की १६७७ साली दक्षिण दिग्विजयानंतर स्वराज्यात परतत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना तामिळनाडू मधील वलीकंडापूरम येथे हर्बर्ट डी यागर या डच राजदूताची भेट झाली. या भेटीत एक कौलनामा तयार झाला. इतिहासातला एक प्रवाद असे सांगतो, महाराजांनी गुलामांच्या खरेदी-विक्री वर जबर कर आकारला होता. पण कौलनाम्यातील नोंदी वाचल्यावर तुम्हाला महाराजांच्या एका मानवतावादी विचारांचे दर्शन घडेल. याच भेटीमध्ये हर्बर्ट डी यागर याने इतिहासाच्या दृष्टीने आणखी एक जबरदस्त नोंद करुन ठेवली आहे. शिवाजी महाराजांची एक सर्वात मोठी ताकद म्हणजे गुप्तहेर खाते. दुर्दैवाने हेर खात्याविषयी अगदी कमी ठिकाणी उल्लेख येतो आणि तोही बखरींमध्ये. पण या हर्बर्ट डी यागरने हेर खात्यासंदर्भात नोंद करुन ठेवली आहे. ही नोंद वाचली आणि मला अक्षय कुमार आणि तापसी पन्नू यांच्या नाम शबाना या रॉ या गुप्तचर संघटनेवरील चित्रपटाची आठवण झाली. चित्रपटात मनोज बाजपेयी यांना त्या तापसीच्या मिनिटा-मिनिटाची बातमी असते. ही नोंद वाचल्यावर तुम्हाला त्या काळातील हेर खात्याची कामगिरी किती चोख आणि परिपूर्ण होती हे कळेल.
    छत्रपती शिवाजी महाराज दिसायला कसे होते, याविषयी परकालदास, हेन्री ऑक्झिंडन, थेव्हेना, कॉस्मो दी गार्दा यांच्याव्यतिरिक्त काही अन्य परकीयांनी महाराजांचे केलेले वर्णन प्रथमच पुस्तकात वाचनात आले.
    प्रस्तुत पुस्तकामध्ये जवळपास ४० दुर्मिळ रंगीत चित्रे छापलेली आहेत. ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची काही चित्रे, छत्रपती संभाजी महाराजांची ५ चित्रे, थोरल्या शाहू छत्रपतींची २ चित्रे व अन्य काही ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे आहेत. यातल्या प्रत्येक चित्राचा इतिहास प्रथमतः वाचायला मिळत आहे. ऐतिहासिक दृष्टीकोनातून पुस्तकाचे मुल्य खूप मोठे आहे. छत्रपतींच्या इतिहासामध्ये असा अभ्यास या अगोदर केल्याचे जाणवत नाही. इतिहासामध्ये आणखी एक वाद असा आहे की, काही जणांच्या मते महाराजांच्या पदरी चित्रकारच नव्हते. पण पुस्तक वाचल्यावर तुमचा हा देखील वाद दूर होईल.
    एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते ती अशी की, Gijs Kruijtzer या परकीय इतिहास अभ्यासकाशी केतन पुरी यांनी संपर्क साधला. त्यांनी हवी तेवढी मदत केतन पुरी यांना केली. यासाठी ना कोणता मोबदला घेतला ना स्वार्थी वृत्ती मनात ठेवली लागेल ती मदत केली. आजही ही परदेशातील माणसे शिवछत्रपतींच्या चरित्रावर अभ्यास करतात याचा खूप आनंद वाटतो. पण दुर्दैव एवढेच आपलेच काही इतिहास अभ्यासक एकमेकांना मदत करताना कुंठित विचारसरणी ठेवून स्वार्थीपणे वागतात. शा लोकांना सुध्दा केतन पुरी यांनी धडा शिकवला आहे. “जे जे आपल्याशी ठावे ते सकळांना सांगावे” या भावनेतूनच त्यांनी या विषयावर पुस्तक लिहून उत्तम काम केले आहे. ही शिकवण अर्थातच मांडे सरांची आहे.
    पुस्तक वाचताना काही रंजक गोष्टी प्रथमच माहिती पडल्या आहेत. त्यातल्या दोन गोष्टी सांगतो बाकी पुस्तकात वाचा. शिवछत्रपतींना सरदार, महत्वाच्या राजकीय व्यक्ती, काही परकीय व्यक्ती भेटायला येत असत, तेव्हा शामियान्यामध्ये त्यांना खाण्यासाठी विडा ठेवला जात असे. हा विडा ठेवण्यासाठी चक्क सोन्याचा डबा होता. महाराजांच्या मनुचीच्या चित्र संग्रहातील चित्रात हा डबा दाखवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे थोरल्या शाहू छत्रपतींना प्राण्यांवर फार प्रेम होते. त्यांनी बरेच प्राणी पाळलेले होते. त्याची माहिती पुस्तकात मिळेल. महत्वाचे असे की त्यांनी दोन कुत्री पाळली होती, त्यांच्या गळ्यात सोन्याच्या माळा घातलेल्या होत्या.
    छत्रपती शिवाजी महाराज दिसायला कसे होते हे चित्रातून आणि काही समकालीन लेखकांच्या व परकीयांच्या वर्णनातून आपल्याला कळतेच. महाराजांचा राज्यकारभार आणि महाराजांनी बुध्दीचातुर्याने केलेल्या लढाया सर्वांना माहिती आहेच. पण महाराजांच्या एका गोष्टीविषयी फक्त सेतुमाधवराव पगडी सोडले तर कोणीच लिखाण केले नाही. ती गोष्ट महाराजांचे बोलणे कसे होते. पुस्तकात एका स्वतंत्र प्रकरणात या विषयी केतन पुरी यांनी चर्चा केली आहे, ती जरुर वाचायला हवी.
    मऱ्हाटा पातशाह वाचल्यानंतर एक प्रश्न मनामध्ये तयार होतो तो ही इथे विचारतो जेणेकरून सर्वांना त्याचे उत्तर मिळेल. पुस्तकात छापलेले चित्र क्र. २० याआधी शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या शककर्ते शिवराय खंड १ मध्ये कृष्णधवल रंगात छापलेले आहे. हे चित्र आणि अलिकडेच मनोज दाणी यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे म्हणून एका खाजगी व्यक्तीच्या संग्रहातील प्रकाशित केलेले चित्र. ही दोन्ही चित्रे समोरासमोर ठेवली तर सारखीच वाटतात फक्त अंगावरील वस्त्रांचा रंग वेगळा आहे. अगदी चित्राच्या मागील बांधणीचा रंग देखील सारखा आहे असे असताना एक चित्र शिवाजी महाराजांचे आणि दुसरे संभाजी महाराजांचे कसे? खरेतर हा प्रश्न पुस्तक प्रकाशित होण्याअगोदरचा आहे. पण पुस्तकात देखील या विषयी उत्तर मिळाले नाही.
    मऱ्हाटा पातशाह पुस्तकात केतन पुरी यांची मागील काही वर्षांची मेहनत पूर्णपणे उतरली आहे. इंद्रजित सावंत यांनी उद्गारलेले ‘केतन पुरी हे इतिहासातील बिनीचे शिलेदार आहेत’, हे शब्द पुस्तक वाचल्यावर तंतोतंत लागू पडल्याचे कळते. पुस्तकाचा मध्यवर्ती विषय हा छत्रपतींच्या चित्रांविषयी आहे. त्या चित्रांची माहिती गोळा करण्यात लागलेली मेहनत आणि कष्ट लक्षात घेता प्रस्तुत लेखामध्ये त्या चित्रांविषयीची माहिती पुस्तकातच शोभेल ह्या उद्देशाने टाळली आहे‌. शिवछत्रपती, शंभूछत्रपती, शाहूछत्रपती यांच्या ऐतिहासिक चित्रांविषयी संपूर्ण माहिती पुस्तकातच वाचा.
    मऱ्हाटा पातशाह पुस्तकाची सिद्धता लक्षात घेता एका गोष्टीची खूप खंत वाटते, ती म्हणजे आज प्रमोद मांडे सर आणि स्वप्निल दादा कोलते असायला हवे होते. या पुस्तकाचे लेखक केतन पुरी हे मित्र आहेत याचा खूप अभिमान वाटतो.
    जगदंब….
  3. मर्‍हाटा पातशाह…।
    अभिप्राय
    “अखंड हिंदुस्तानचं मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज…….”
    शिवराय ऐकावे, शिवराय वाचावे, शिवराय अंगीकारावे, शिवराय जोपासावे आणि शिवराय विश्वव्यापी करावे ही शिकवण देणारी व्यक्ती म्हणजे मांडे सर आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेले एक शिलेदार केतन कैलास पुरी.
    त्यामुळे पुस्तकात काही उणिवा असतील, काही अतार्किक अथवा संदर्भहिन असेल या शंका उद्भवण्याचा प्रश्न देखील वाचकांच्या मनात येऊ नये.
    ‘मर्‍हाटा पातशाह’
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रचंड जवळ घेऊन जाण्याची ताकत या पुस्तकात आहे. महाराज अनुभवायचे असतील तर जरुर म्हणजे जरुरच पुस्तक वाचा.
    शिवराय विश्वव्यापी आहेत, ते त्या काळातही विश्वव्यापी होते याची प्रचिती पुस्तकातील अनेक प्रसंग वाचताना येतीये.
    एकूण पाच प्रकरणांमध्ये विभागले गेलेले हे पुस्तक, प्रत्येक प्रकरणाला आतील माहितीच्या आधारे दिले गेलेले नाव, त्यातील लेखांश वाचण्यास नक्कीच परावृत्त करते.
    आत्तापर्यंत छत्रपती शिवरायांना ऐतहासिक अभ्यासग्रंथांमध्ये कमी आणि मालिकेंमध्ये पाहिलेली महाराज प्रेमी लोकसंख्या जास्त आहे. खरे महाराज अनुभवायचे असतील तर सोप्यात सोप्या भाषेत या पुस्तकात मांडलेले महाराज सामान्यातीसामान्य वाचकाला देखील आकलनक्षम आहेत.
    छत्रपती शिवरायांची समकालीन किंवा त्याच्या जवळपास असणारी १६ रंगीत चित्रे या पुस्तकात आहेत.
    छत्रपती शिवरायांची समकालीन चित्रे हा नक्कीच महत्वाचा विषय होता, त्या शिवाय खरे महाराज आपल्यासमोर उभे राहिले नसते.
    वा.सी.बेंद्रे यांनी सर्वप्रथम महाराजांचे समकालीन चित्र प्रकाशित केले त्या आधी एका मुघल अधिकार्‍याचे चित्र सबंध महाराष्ट्रभर महाराज म्हणून पुजले जायचे. ते चित्र मिळवण्यासाठीचा वा.सी.बेंद्रेंचा प्रयत्न आणि ज्या लेखकाच्या संग्रहातून हे चित्र मिळाले त्याच्या संग्रहातील हे चित्र नक्की काढले कुणी आणि ते नेदरलँडसारख्या ठिकाणी कसे पोहोचले याच्यामागची रंजक कथा आपल्याला कळेल.
    त्याचप्रमाणे इतिहासात हरवलेल्या एका डच चित्रकाराची माहिती आपल्याला मिळते, ज्याने महाराजांना पाहिले होते. त्यांचे सहकारी, दरबारी पद्धती पाहिल्या होत्या व त्या विलक्षण बुद्धीच्या माणसाने या सर्वांची चित्रे काढली. पण दुर्दैव त्याचे नाव इतिहास विसरला होता.
    निकोलाव मनुची नावाचा एक व्हेनिस चा रहिवाशी मुघलांचा माणूस. शिवाजी राजांना त्याने पाहले आणि एका चित्रकाराकडून महराजांचे चित्र काढून घेतले. पण एका तांत्रिक चुकीमुळे ते चित्र मीर महंमद याने काढले असा समज आत्तापर्यंत प्रचलित होता. परंतु मीर महंमद हा त्या चित्राचा चित्रकार नाही तर दुसरा कोणी आहे याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण लेखकांनी केले आहे.
    गणितासारखा इतिहासाचा नियम असतो LHS = RHS. इतर लोकांनी लिहिलेली आणि आपल्या संदर्भांमध्ये सापडलेली माहिती जर सारखीच असेल तर त्याची सत्यता अधिक असते. ज्या लोकांनी महाराजांना प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे असे अनेक परकिय प्रवासी, इंग्रज-डच-पोर्तुगीज-फ्रेंच वकील‍ांची पत्रे व रोजनिश्या, परकालदासांची पत्रे, कविंद्र परमानंदांचे शिवभारत, आज्ञापत्रे, सभासद बखर या सगळ्यामध्ये शिवरायांचे आलेले उल्लेख म्हणजे प्रत्यक्ष शिवरायांचा अनुभव देणारे आहेत.
    त्यातील योग्य प्रकरणांचा अभ्यास करुन त्यांचा या पुस्तकात समावेश असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नक्की असतील कसे, त्यांचे बोलणे कसे असेल त्यांची विचारक्षमता कशा प्रकारची असावी याचे उत्कृष्ट पद्धतीने विश्लेषण केले आहे. त्यामुळे त्या संदर्भातील प्रकरणाचे वाचन करताना साक्षात छत्रपती डोळ्यासमोर उभे राहून आपल्याशी बोलल्याचा भास होतोय.
    महाराजांना जोडून छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, औरंगजेब, कुतुबशाही पंतप्रधान आक्कण्णा-मादण्णा तसेच काही मुघलकालीन प्रसंगाच्या चित्रांचा समावेश असल्याने पुस्तकाला अधिकच बहर आला आहे. काही नजिकच्या काळात काढल्या गेलेल्या चित्रांचा समावेश केला आहे, तसेच मराठा चित्रशैलीच्या अतिउत्तम चित्रांचा समावेश करुन माहिती दिली आहे.
    एकंदरीत छत्रपती शिवरायांच्या इतक्या जवळ घेऊन जाणारे पुस्तक जवळपास ५० पेक्षा अधिक संदर्भांचा अभ्यास करुन आमच्यासारखा तरुण लिहितोय ही अभिमानाची बाब आहे.
    मी कोणी समिक्षक नाही अथवा फार मोठा अभ्यासक नाही, तसेच इतिहासतज्ञही नाही. पुस्तक वाचल्यावर अल्पमतीला जे काही सुचले, जे काही वाटले तो हा या पुस्तकाबद्दलचा अभिप्राय.
    अशी पुस्तके आमच्यासारख्या सामन्या वाचकाच्या बुद्धीत ‘छत्रपती शिवराय’ नावाचा अंश उतरविण्यास कारणीभूत ठरतात.
    इतिहास वाचक, अभ्यासक, संशोधक सर्वांना या पुस्तकाचा प्रचंड फायदा आहे.
    लेखकांची मेहनत पुस्तकाच्या प्रत्येक वाक्यागणिक दिसून येतच आहे.
    त्यामुळे ‘मर्‍हाटा पातशाह’ अल्पावधीत यशाच्या शिखरावर विराजमान होईल याबाबत शंका नसावी.
    भविष्यातही अशीच पुस्तके आपल्या हातून घडोत ही सदिच्छा…!
    बहुत काय लिहिणे….
    – शिवम प्रकाश टिळेकर
  4. Review 4 : आरती जगताप
    आजवर कित्तेक इतिहास संशोधकांनी, इतिहास लेखकांनी, इतिहास प्रेमींनी “छत्रपती शिवाजी महाराज” यांची युद्धनिती, राजनीती, नियोजन, चलन, बुद्धिमत्ता, शौर्यता, चातुर्यता, श्रेष्ठता या गोष्टींवर भरपूर लिखाण केलंय. पण महाराज नेमके दिसायचे कसे, महाराजांचे बोलणे कसे, महाराज कोणती वस्त्र अंगावर परिधान करीत, महाराज कोणते रत्न बोटांमध्ये घालीत या सर्व गोष्टी संशोधन करून सर्वांसमोर आणणे ही साधी गोष्ट नाही. यात बरेच वाचन, इतिहासातील संदर्भ, प्रत्येक गोष्ट पडताळून पाहणं, त्यात थोडीही चूक होता कामा नये या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन केलेलं जोखमीचे काम. कारण बाकी लिखाणाला संदर्भ लागत नाहीत पण इतिहासाचे लिखाण करताना संदर्भाशिवाय पुढे जाता येत नाही. लहानपणी वाचलेल्या चौथीच्या पुस्तकात बघितलेले महाराजांचे ते चित्र नेमक कोणी काढले असेल हा प्रश्न नेहमी मनात होता. पुढे काही अचूक माहिती न मिळाल्याने तो प्रश्न तसाच मनात त्या जागी विरला. या पुस्तकाने तो प्रश्न संदर्भासहित सोडवला. या पुस्तकाच्या माध्यमातून महाराजांची खरी चित्रे कोणती, महाराजांची जगभर पसरलेली चित्रे आज कुठे, कोणत्या संग्रहालयात आहेत. ती चित्रे कोणी काढली, ती तिकडे कशी पोहचली या मागची कहाणी खूप गमतीदार आणि विशेष आहे. त्या काळात कोणत्या चित्रशैली होत्या, पुढे मराठ्याच्या कोणत्या चित्रशैली आल्या या सर्व गोष्टींचा मागावा यात सामावला आहे.
    महाराजांच्या समकालीन चित्रांबद्दल, महाराजांचे बोलणे, महाराजांचा पेहेराव याबद्दल आत्तापर्यंत खूप कमी लिखाण झालंय. त्यात मोजके लेखक सोडले तरी कोणीही या विषयाकडे जास्त लक्ष दिलय असं वाटत नाही याची खंत वाटते. या सर्वांची भर या पुस्तकाने केतन सरांनी नव्याने केली, त्याबद्दल त्याचं कौतुक आहेच.
    जास्त काही इथे मांडत नाही कारण माझ्या आधी ही खूप चांगल्या अभ्यासू माणसांनी पुस्तकाचा अभिप्राय उत्तम रित्या मांडलाय आणि केतन सरांवर त्याच्या मेहनतीने केलेल्या गोष्टींवर वर्षाव झालाय. प्रत्येकाच्या संग्रही हे अनमोल रत्न असावं. पुस्तकात खूप काही गोष्टींचा उलगडा केलाय. पुस्तक घेऊन स्वतः वाचलं तर किती संदर्भ गोळा केलेत, त्यावर त्याने प्रामाणिकपणे केलेली मेहनत दिसेल.
    केतन पुण्याच्या डेक्कन कॉलेजचा विद्यार्थी आहे. आजवर या कॉलेजने खूप मोठे मोठे लेखक व इतिहास संशोधक महाराष्ट्राला दिले आहेत. त्या सर्वांसोबत पुढे त्याचही नाव लागेल याबद्दल ठाम विश्वास आहे. प्रतिपश्चंद्र पुस्तकाने जसा १०००० चा पल्ला पार केला, तसाच मऱ्हाटा पातशाह हे ही पुस्तक लवकरच तो पल्ला पूर्ण करेल.
    बहुत काय लिहणे..!
  5. Review 2 : सचिन तेगमपुरे
    शिवाजी महाराजांच्या स्तुतीमध्ये आपण नेहमी म्हणतो, “शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप।” शिवरायांचा प्रताप संपूर्ण जगाला चांगलाच परिचित आहे. परंतु त्यांचं खरं रूप खुप कमी जणास माहिती आहे आणि मुख्यत्वे खूप कमी मराठी वाचकांना शिवाजी महाराजांचं खरं रूप परिचित आहे. अशावेळी ‘केतन पुरी’ यांचं ‘मऱ्हाटा पातशाह’ हे पुस्तक वाचकांना शिवरायांच्या अस्सल रूपाची ओळख करून देण्याचं अतिशय महत्वाचं काम करतं.
    पुस्तकात दिलेल्या समकालीन लेखक व चित्रकारांनी केलेल्या महाराजांच्या वर्णनावरून वाचकांना शिवाजी महाराज नेमके कसे दिसत असतील याचा पुरेपूर अंदाज येतो. पुस्तकात जे काही समकालीन संदर्भ देण्यात आले आहेत ते वाचकांच्या मनात शिवाजी महाराजांची छबी निर्माण करण्याचे काम अतिशय सफाईने करतात. पुस्तकामधील सर्व चित्रांपैकी मी फार तर दोन-तीन चित्रे याआधी पाहिली होती. बाकी सर्व चित्रे माझ्यासाठी अगदी नवी होती आणि मला खात्री आहे महाराष्ट्रातील खूप मोठ्या जनसमूहासाठी सुद्धा ही चित्रे नवीच असतील. म्हणूनच जगभरात विखुरलेल्या या सर्व चित्रांना एकत्र करून भारतातील जनतेसाठी उपलब्ध करण्याचं खूप मोठं काम या पुस्तकाच्या माध्यमातून केतननं केलं आहे.
    पुस्तकात उल्लेखलेल्या विविध प्रसंगांवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असलेल्या गुण वैशिष्ट्यांचा सुद्धा वाचकांना पुरेपूर अनुभव येतो. समकालीन संदर्भांवरून, राजकीय मुत्सद्देगिरीत पटाईत असणारे महाराज, अतिशय संयमी स्वभाव असणारे महाराज, नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छाशक्ती असणारे महाराज, आणि प्रचंड कर्तबगार अशा हेर खात्यामार्फत कायम सजग असणारे महाराज आपल्याला पाहायला मिळतात.
    शिवाजी महाराजांच्या चित्रांसोबतच छत्रपती संभाजी महाराज, थोरले शाहू छत्रपती, औरंगजेब व इतर महत्वाच्या व्यक्तींच्या चित्रांचा पुस्तकातील अंतर्भाव पुस्तकाला पूर्णत्व मिळवून देतो. यापैकी छत्रपती संभाजी महाराज व थोरले शाहू छत्रपतींची दोन अस्सल चित्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात असूनसुद्धा कधी पाहण्यात आली नव्हती. शिवाजी महाराजांचा व पर्यायाने मराठ्यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर कुठली पुस्तकं हाताळली पाहिजेत याचे उत्तरही पुस्तकातील संदर्भांवरून मिळते. केतननं अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आहे.
    शेवटी, शिवरायांचं हे अस्सल रूप आणि पर्यायाने हे पुस्तक जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावं हीच सदिच्छा आणि पुस्तकाची दुसरी आवृत्तीही हातोहात संपल्याबद्दल केतन तुझे अभिनंदन.
  6. Review 3 : विजय आनंता गायकवाड
    जगभरातल्या असंख्य इतिहासकार, संशोधक, लेखक, चित्रकार तसेच तज्ञांना आपल्या भोवती खिळवून ठेवणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज”. महाराजांच्या आत्तापर्यंत काढण्यात आलेल्या चित्रांचा व त्यामागील इतिहासाचा एक सुरेख प्रवास म्हणजे केतन भाऊचं “मऱ्हाटा पातशाह” हे पुस्तक होय.
    महाराजांना प्रत्यक्ष पाहणं नशिबात नसलं तरी महाराजांवर प्रेम करणाऱ्या तुमच्या माझ्या सारख्या असंख्य लोकांना महाराजांच्या जवळ नेऊन ठेवण्यासाठी केतन पुरींसारख्या तरुण लेखकाने, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच यांसारख्या व्यक्तींनी महाराजांवर केलेली समकालीन लिखाण, समकालीन चित्र, समकालीन संदर्भ एकत्र करून आपल्या अद्भुत प्रयत्न आणि कष्टातून तयार केलेला हा एक सुंदर ग्रंथ आहे.
    आपल्याला एखाद्या माणसाची कल्पना करून तो माणूस कसा असेल हे अनुमान काढायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाची आवश्यक बाब म्हणजे त्या व्यक्तीचं राहणीमान, देहबोली, त्या व्यक्तीची वेषभूषा यांचा अभ्यास होय. जो केतन भाऊने योग्य आणि विश्वसनीय संदर्भ वापरून आपल्या समोर मांडलाय.
    कलेवर बंदी आणणाऱ्या एका क्रूर, निष्ठुर बादशाहाचं राज्य असताना सुद्धा आपली कला व छंद जपणाऱ्या परकीय लोकांच्या मेहनतीच फळ म्हणजे आज आपण पाहू शकत असलेली शिवाजी महाराजांची चित्र आणि यासाठी हर्बर्ट डी यागर व निकोलाओ मनूची सारख्या परकीय लोकांचे उपकार सुद्धा आपण विसरू शकत नाही.
    शिवाजी महाराजांसोबत संभाजी महाराज व थोरले शाहू महाराज यांच्यासुद्धा चित्रांचा ऐतिहासिक मागोवा घेऊन तो मांडून पुस्तकाला चार-चांद लावल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
    शिवाजी महाराजांचा चक्रवर्ती सम्राट म्हणून वावरतानाचा थाट, ऐश्वर्य, श्रीमंती व करारीबाणा यासारख्या अनेक बाजू जाणून घेण्यासाठी नक्की वाचले जावे असे पुस्तक म्हणून येणाऱ्या काळात घेतले जाणारे नाव हे “मऱ्हाटा पातशाह” या पुस्तकाचे असेल हे नक्की.
    चित्र प्रवासासोबत महाराजांच्या जीवनातील आगळे वेगळे व अपरिचित उत्तम पैलू वाचकांना दाखविल्याबद्दल केतन भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद.
  7. Review 4 : – राज चंद्रशेखर जगताप.
    छत्रपती शिवराय.
    अखंड उर्जास्रोत, प्रेरणास्रोत.
    स्वराज्यनिर्मात्याची भूमिका स्वीकारून एका स्वतंत्र राज्याची स्थापना करुन सबंध राष्ट्रात आदर्श निर्माण करणारा मराठ्यांचा राजा.
    शिवरायांच्या प्रेरणेने सबंध राष्ट्रभर बंड उभे राहिले आणि त्याचे हादरे दिल्लीच्या दिवाण-ए-खास मध्ये बसले.
    शिवरायांचे कार्य एवढे मोठे आहे की तत्कालीन शत्रुपक्षातील लोक आणि परकीय लेखक सुद्धा शिवरायांची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.
    सबंध मराठी लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले ते एकतर कादंबरीतील कल्पोकल्पीत इतिहासामार्फत आणि मालिकांतून. सामान्य लोकांना, सामन्य वाचकाला महाराजांबद्दल प्रचंड निष्ठा असते. प्रचंड आस्था असते. परंतु महाराजांना समजावून घेण्यासाठी ऐतिहासिक पुस्तकांचा आणि संदर्भांचा अभ्यास महत्वाचा असतो जे की एखाद्या सामान्य रसिकाला, वाचकाला, महाराजप्रेमी लोकांना जमत नाही. तर यावेळी एका सुरेख अशा संगमाची अपेक्षा वाचकाला असते. ती अपेक्षा हे पुस्तक नक्की पूर्ण करेल.
    या पुस्तकातला मुळ मुद्दा हा छत्रपतींची चित्रे जरी असला, तरी त्या चित्रांचे स्पष्टीकरण करताना मांडलेली ओघवती भाषा तसेच चित्राबद्दलची मुद्देसूद व इतिहासधार्जिण असणारी माहिती या पुस्तकाचे महत्व अधिक पटीने वाढवतात, असे मला वाटते.
    शिवरायांची ३-४ चित्रे सोडता जास्त चित्रांबद्दल आज महाराष्ट्रात चर्चा झालेली पहावयास मिळत नाही. या चित्रांवर संशोधन करुन हा विषय पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल लेखकांचे आभार.
    शिवरायांचं आकर्षण आत्तादेखील सबंध जगाला आहे, ते त्यावेळी नक्की कशा प्रकारचे होते या बाबत माहिती प्रस्तुत पुस्तकात अनेक ऐतिहासिक साधनांचा वापर करुन अगदी इत्यंभूत दिलेली आहे.
    छत्रपती शिवरायांच्या अगदी जवळ जायचा अनुभव घ्यायचा असेल तर साध्या कादंबऱ्या सोडता “मर्हाटा पातशाह” शिवाय पर्याय नसावा.
    अनेक समकालीन चित्रे त्या चित्रांच्या अनेक कथा, रंजक किस्से आपल्याला तत्कालीन परिस्थितीचा नाजूकसा अनुभव आपल्याला देऊन जातात.
    आणि शिवरायांचं वर्णन वाचताना दस्तुरखुद्द महाराज पुढे असल्याचा भास होतो, ही या पुस्तकाची ताकत.
    भविष्यात अनेकानेक नवे शोध संशोधन आपल्या लेखणीतून वाचायला मिळो, हीच अपेक्षा.
  8. Review :- आदित्य अरुण गरुड(देशमुख)
    पुस्तकाचे नाव मऱ्हाटा पातशाह असे का?
    राज्याभिषेकानंतर दक्षिण भारतात कर्नाटकच्या मोहिमेत शिवाजी महाराज ‘सम्राट’ म्हणून उतरले असताना डचांनी शिवाजी महाराजांची अनेक चित्रे रेखाटली. या गोष्टी नजरेसमोर ठेऊनच लेखकाने पुस्तकाचे ‘मऱ्हाटा पातशाह’ नामकरण केले.
    तसं पुस्तकाची सुरवातच अगदी मुखपृष्ठावरून होते, तेही प्रसिद्ध चित्रकार प्रमोद मोर्ती यांनी शिवाजी महाराजांच्या काढलेल्या अभ्यासपूर्ण चित्रावरून..
    ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी।
    शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे,
    शिवरायांची सलगी देणे, कैसी असे।।’
    या पंक्तीची उत्तरे आणि उकल आपल्याला प्रस्तुत पुस्तकातून ऐतिहासिक अभ्यास व पुराव्यांसह पाहायला, वाचायला मिळेल. ज्याचे वर्णन इंग्रज, डच अश्या परकीय लोकांनी स्वतः शिवरायांना पाहिल्यानंतर आपल्या लेखणीतून केलेले आहे.
    छत्रपती शिवाजी महाराजांची २२, संभाजी महाराजांची ५, थोरले शाहू महाराजांची २ तर बाकी काही ऐतिहासिक दुर्मिळ चित्रांबद्दल आणि ती चित्रे कोणी काढली? चित्रांची जडणघडण कशी झाली? याबाबत रंजक इतिहास केतन दादांनी पुस्तकात वर्णन केला आहे. गंमत म्हणजे वर्णन वाचून चित्र न्याहाळताना मोबाईलच्या सवयीप्रमाणे मीच २-३ वेळा झूम करण्याचा प्रयत्न केला. एवढे बारकावे सांगणारे वर्णन पुस्तकात केले गेले आहे.
    आग्र्याच्या दरबारात अपमानाला सहन न करणारा स्वाभिमानी बाणा, परकीयांसोबत बोलत असताना जगाची माहिती घेण्याचे कुतूहल, शहाजी महाराज अटक किंवा अफजल वध याप्रसंगी कणखर भूमिका, राजापूरच्या वखारीबाबत सावधपणा, फ्रेंचांना दाखवलेली ताकद आणि सामर्थ्य यातून शिवाजी महाराज सतराव्या शतकात एक परिपूर्ण व्यक्ती होते, हे अनेक इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांच्या लेखणीतून आणि चित्रांतून कळते. चित्रांची ओळख करून देताना असे अनेक प्रसंग पुस्तकात रेखाटण्यात आलेले आहेत.
    चित्रकलेचे ‘लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, रुक्मिणी स्वयंवर’ मध्ये आलेले महत्व देखील लिहायला लेखक विसरले नाहीत. परकीय निकोलस मनूची, व्हॅलेंटीन, हर्बर्ट डी यागर, निकोलस विटसेन यांनी शिवाजी महाराजांवर केलेलं लिखाण आणि चित्रे आज आपल्यासाठी अमूल्य आहेत. त्याचसोबत औंध संस्थानचे स्व.आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी इर्विन बॉसनी याला शिवरायांची काचेवर काढण्यास सांगितलेली चित्रे आणि तीच त्यांची राहिलेली अपूर्ण इच्छा.. याबद्दल आवर्जून माहिती लेखकाने दिली आहे.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिसण्या-वागण्या बद्दल सांगणारे अनेक पुरावे, चित्रे मांडणारे अभ्यासक आज असूनदेखील पडद्यावर अजूनही महाराज नीट मांडता येत नाहीत, ही आपली शोकांतिका आहे.
    पुस्तकाऐवजी ‘संशोधन ग्रंथ’ म्हणले तर चूक ठरणार नाही. उत्कृष्ट, समजेल अशी मांडणी असलेले केतन पुरी लिखित ‘मऱ्हाटा पातशाह’ प्रत्येक इतिहासप्रेमींच्या संग्रही असायलाच हवे.
Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us