मराठ्यांनी अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर जाऊन केलेला पराक्रम म्हणजे काहून. जी लढाई फक्त आणि फक्त मराठेच करू शकतात ती लढाई म्हणजेच काहून.
१८१८ मध्ये इंग्रजांनी इथले किल्ले जरी ताब्यात घेतले असले, तरी सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या मावळ्या मराठ्यांचा लढाऊबाणा इंग्रज चांगलेच जाणून होते. कोणत्याही परिस्थितीला म्हणजे नैसर्गिक किंवा लढाईला तोंड देण्याचे सामर्थ्य, थोरल्या महाराजांनी दिलेली शिकवण ते कधीही विसरले नाहीत आणि विसरणार नाहीत, त्याची प्रचिती आपल्याला काहून वाचताना येते. सह्याद्रीसारख्या निसर्गरम्य ठिकाणाहून अफगाणच्या वाळवंटात तग धरून राहणं ही साधी सोप्पी गोष्ट नाही. त्या गोष्टीवर मात करून बॉम्बे रेजिमेंट (मराठा लाईट इन्फंट्री)च्या युनिटने सिद्ध करून दाखवले की, गनिमीकावा करून रणसंग्राम कसे जिंकता येतात.
काहूनची लढाई ही तिथल्या स्थानिक लुटारू टोळीवाल्यांबरोबर असली तरी त्यापेक्षा तिथल्या वाळवंटी वातावरणाबरोबर सुद्धा कशी आहे, हे लेखकाने अतिशय अभ्यासपूर्वक सांगितले आहे. काहून वाचताना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की, मुघल सैन्य सपाटीचा प्रदेश सोडून जेव्हा आपल्या सह्याद्रीत यायचं तेव्हा इथल्या डोंगरदाऱ्यांमध्ये त्यांचे असेच हाल झाले असतील का? शिवाजी महाराजांनी जेव्हा उंबरखिंडीत खानाची कोंडी केली आणि त्याला तिथून माघार घ्यावी लागली, तेव्हा आपला विजय झाला हे आपल्याला माहीत आहे. पण मुघल सैन्याच्या बाजूने विचार केला, तर तिथे त्यांची प्रचंड जीवित व आपत्तीची हानी झाली होती. अगदी तसाच प्रसंग आपल्यावर ओढवल्यावर आपली मानसिकता काय असेल, हे काहून वाचताना लक्षात येते.