२०१३ साली लंडन येथे प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते “द यंग आंत्रप्रेन्युअर” हा जागतिक दर्जाचा पुरस्कार मिळाल्यानंतर शरद तांदळे महाराष्ट्रातील नव उद्योजकांच्या गळ्यातील ताईत झाले. त्यांच्यावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. विविध ठिकाणी त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन होऊ लागले. नवीन पिढी त्यांना आदर्श मानू लागली.
परंतु शरद तांदळे यांची सुरुवात शून्यातून झालेली होती, हे मोजक्याच लोकांना माहिती होते. त्यातीलच काही जवळच्या मित्रमंडळींनी त्यांना त्यांचा प्रवास पुस्तक रूपात मांडण्याचा आग्रह केला.
आपला प्रवास जर इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकणार असेल, तर आपण तो नक्कीच मांडला पाहिजे, असा विचार करून शरद तांदळे यांनी “द आंत्रप्रेन्युअर” हे पुस्तक लिहिले.
अगदी थोड्या काळातच पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले आणि शरद तांदळे यांच्या उद्योजक होण्याच्या प्रवासाने अनेक युवकांना प्रेरणा दिली.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी तरुणांना कुठलेही पोकळ स्वप्न न दाखवता उद्योग विश्वाची ओळख करून देण्यात लेखकाला यश आलं आहे. स्वतःचा प्रवास लिहिताना शरद तांदळे यांनी महाराष्ट्रातील सर्वच मध्यमवर्गीय तरुणांचा प्रवास लिहिला आहे, अशा अनेक प्रतिक्रिया या पुस्तकाला मिळाल्या.
उद्योजक होण्यासाठी केवळ स्वप्न न पाहता त्या स्वप्नांना वास्तवाशी जोडून, स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून स्वतःला घडवणं म्हणजेच यशस्वी आयुष्याचे गमक शरद तांदळे यांनी तरुणांना या पुस्तकामार्फत दिले आहे.