माणूस म्हणून विचारांची, तत्त्वांची आणि एकूणच व्यक्तीमत्त्वाची सर्वगुणसंपन्न अशी श्रीमंती हवी असेल, तर छत्रपती शिवरायांची जागा ही राजकारण्यांच्या व्यासपीठावर नाही; तर या अखंड हिंदुस्थानात नि विशेषतः महाराष्ट्राच्या घराघरांतील ‘स्टडी टेबल’वर निश्चित करायला हवी. लक्षात घ्या.. भूतकाळात कोणी काय लिहीलं, ते चांगलं की वाईट, ठोस की वादग्रस्त इत्यादि गोष्टींसाठी इतिहासकार बसले आहेत. ते तार्किक वाद, अभ्यास, संशोधन आदीच्या जीवावर या गोष्टी उजागर करत राहतील. त्यातून आपापला फायदा कमावण्यासाठी काही संधीसाधू तरुणांची माथी भडकवत राहतील. अशा निरर्थक वादांतून कधीच ‘उत्तरं’ मिळत नाहीत. त्यात तुम्ही-आम्ही सामान्य माणसं आहोत, ज्यांचं महाराजांवर निःस्वार्थ प्रेम आहे. त्यामुळे आपण केवळ आणि केवळ जे चांगलं आहे, जे अनुकरणीय आहे त्यावरच बोलू, त्याचेच चिंतन करू, त्याचीच अंमलबजावणी करू आणि खऱ्या अर्थाने घराघरात शिवबा घडवू. एक-एक करत असा समाज निर्माण करू, जो महाराजांचीच तत्व अंगीकारून माथी भडकवणाऱ्यांकडे संयमाने दुर्लक्ष करेल आणि या मातीच्या कणाकणांत संयमी, धोरणी, मुत्सद्दी, कुटुंबवत्सल ‘छत्रपती शिवाजी’ जन्माला येतील हे वाक्य खरं ठरवेल.
या पुस्तकाची खास बाब म्हणजे या पुस्तकाचे कोणतेही पान उघडून कुठल्याही धड्यापासून वाचायला सुरुवात करता येते. संपूर्ण पुस्तक एकाच बैठकीत वाचून संपवता येते किंवा रोज एकेका विचाराचे पारायणही करता येते. आपल्या आयुष्यात जो प्रसंग अडचणीचा वाटतो, त्याचे उत्तर शिवरायांच्या चरित्रात शोधण्याचा मार्ग या पुस्तकातून सापडतो. चिंतन, मनन आणि अंमलबजावणी असे तीन खांब या पुस्तकाला आहेत. यासाठी म्हणून दस्तुरखुद्द शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील निवडक ५० गुणवैशिष्ट्यांसह “छत्रपती म्हणे” हे पुस्तक दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाहून तुमच्या घरात स्टडी टेबलवर येण्यासाठी सज्ज झाले आहे…
आता हे छत्रपती म्हणे तुमचे झाले..
ते तुम्ही अवघ्यांचे करा.
बाकी आई भवानी समर्थ आहे.
जय शिवराय !