श्री.संदीप खुरुद
लेखक श्री.संदीप खुरुद हे जिल्हाधिकारी कार्यालय,बीड येथे अव्वल कारकुन या पदावर कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळत त्यांनी वाचन व लेखनाची आवडही जोपासली आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘रानमेवा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन बीडचे जिल्हाधिकारी श्री.राधाबिनोद शर्मा व श्री.अरविंद जगताप, प्रसिद्ध सिनेनाटय लेखक,गीतकार यांच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आले आहे. सदर कथासंग्रहाची प्रस्तावना ही महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेनाटय लेखक,गीतकार श्री. अरविंद जगताप यांनी लिहिलेली आहे.
संदीप खुरुद यांच्या रानमेवा कथासंग्रहातील गोष्टी अस्सल आहेत. मातीतल्या आहेत. अनुभवलेल्या आहेत. त्यात उसनवारी नाही. निरीक्षण उत्तम आहे. आणि कथेचा परिसर आणि पात्र जिवंत करायची सहजता त्यांच्यात आहे. स्वतःला थोर न मानणारे लेखक खूप निरागस वाटतात. निर्मळ वाटतात. त्यांच्या गोष्टी तुमच्या आमच्या असतात. दाद घेण्यासाठी ताणलेला आलाप नसतो. दिखाऊ स्वर नसतो. संदीप खुरुद माणूस म्हणून साधे आहेत. त्यांची कथाही तशीच आहे. आव नसलेली. पण खूप काही सांगून जाणारी, विषयांची कमी नाही त्यांच्याकडे. स्वतःच्या प्रेमात पडलेली माणसं वारंवार आरसा पाहतात. स्वतःपलीकडे पण जग सुंदर आहे याची जाणीव असलेली माणसं गोष्टी टिपत राहतात. संदीप खुरुद यांनी टिपलेल्या आणि सहजतेने मांडलेल्या गोष्टी वाचनीय आहेत. रानमेवा या कथासंग्रहामध्ये त्यांनी शहरी व ग्रामीण भागातील वाचकांच्या मनाचा वेध घेऊन कथा लिहिलेल्या आहेत.