ज्यावेळी अवनीचा बंदोबस्त करण्याची बातमी आली त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून याचा निषेध झाला, सोशल मीडियावर तर याचा प्रचंड प्रमाणात विरोध दर्शवला व संताप ही. कारण, अवणीचा बंदोबस्त म्हणजे तिचा अंत होता. याचे कारणही तसेच होते. कारण एक सामान्य वाघीण ज्यावेळी नरभक्षक होते त्यावेळी तीची दहशत अनेकांच्या जीवावर बेतते, त्यामध्ये मुख्य म्हणजे शेतकरी आणि खेड्यापाड्यात राहणारे सामान्य नागरिक. महाराष्ट्रातील अनेकांप्रमाणे मलाही या बातमीचा प्रचंड संताप आला होता, कारण वाघ हा असा प्राणी/ प्रजाती आहे जिचे रक्षण करणे गरजेचे आहे. अगदी विलुप्त होण्याच्या मार्गावर ही प्रजाती आहे. मग अशावेळी एका वाघिणीला मारणे हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न मलाही अनेकांप्रमाणे पडला होता. पण त्याच बरोबर नरभक्षक या शब्दाचा अर्थही मला भेडसावत होता. कारण, एका वाघिणीला वाचवण्यासाठी आपण तिचा ज्या भागात वावर आहे त्या भागातील शेकडो लोकांच्या जीवाची जर बाजी लावत असेल तर मग नक्कीच या प्रश्नावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला सुद्धा तुमच्या अनेक प्रश्नाची उत्तरे मिळतील याची मला खात्री आहे. मग शेवटी प्रश्न जो राहतो तोच की “अवनीचा बंदोबस्त हा तिला मारूनच करणे योग्य होते की अयोग्य?” हे पुस्तक तुम्हाला तुमचे उत्तर मिळवून देण्यास नक्कीच मदत करेल ही अशा व्यक्त करतो.