या जगविख्यात सेनापतींच्या आयुष्यावर नजर टाकली तर संताजी बाबा त्या सगळ्यांमध्ये वेगळे दिसून येतात. दोड्डेरीची लढाई संताजी बाबा यांच्या कारकिर्दीतील पराक्रमाचा सर्वोच्चबिंदू होय. ती केवळ एक लढाई नव्हती तर संताजी बाबाला जगभरातल्या लढवय्या जमातीतून हटके दाखवणारा प्रसंग होता. एका हातात भैरवासारखं खड्ग तर दुसऱ्या हातात शरणार्थ्यांसाठी रोटी देणारा सेनापती ह्या जगाने पाहिल्याचे दुसरे उदाहरण नाही. विजयोन्मत्त होऊन हाती सापडलेल्या सैन्याच्या कत्तली उडवल्याची शेकडो उदाहरणे इतिहासाच्या पानापानांत दिसतील. या धर्तीवर फजिती पावलेल्या असहाय्य शत्रूला संरक्षण देऊन सुखरूप पोहोचवणारा हा पहिलाच सेनापती.
उत्कट राष्ट्रभक्ती, अटळ निष्ठा, अचूक वेळ आणि व्यूहरचना, युद्धतंत्रातील निपुणता, वेगवान हालचाली, अचूक निर्णय क्षमता आणि कर्णाचे औदार्य या गोष्टी संताजी बाबाला सेनापती म्हणून आणखी उठावदार केल्याचे दिसून येतात.