डॉ. प्रकाश कोयाडे
लेखक प्रकाश कोयाडे सरांचे वडील शिक्षक असल्याने त्यांना अवांतर वाचन, लेखन आणि शिक्षणाचा वारसा घरातूनच मिळाला. एमबीबीएसचे कठीण शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप आणि जॉब करण्याऐवजी प्रकाश यांनी त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून रुंजी घालत असलेली “प्रतिपश्चंद्र” ही रहस्यमय कादंबरी लिहायला घेतली. त्यानंतरची जवळपास चार वर्षे झपाटल्यासारखे लिखाण करून ही कादंबरी नावारूपास आली.
या प्रवासात केवळ लिखाणच होते, अशातला भाग नाही. रहस्यमय कादंबरी असल्याने भरपूर वाचन, कादंबरी संबंधित सर्व स्थळांना प्रत्यक्ष भेट देणे, असा त्यांचा एकूण उहापोह चालू होता. त्यांच्या अशा वागणुकीमुळे अनेक परिचितांनी प्रकाश यांना लिखाणाचा नाद सोडून जॉबवर आणि करियरवर लक्ष देण्यास सांगितले, परंतु प्रकाश यांनी माघार न घेता कादंबरी पूर्णत्वास नेली.
“प्रतिपश्चंद्र” या कादंबरीने मराठी साहित्य विश्वात अक्षरश: धुमाकूळ घातला. अशा तोडीचे रहस्यमय लिखाण मराठी साहित्यात क्वचितच वाचायला मिळते. प्रतिपश्चंद्र कादंबरीने प्रकाश कोयाडे यांना ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या डॉक्टरकीला सुरुवात केली. पुण्यातील वाय सी एम हॉस्पिटलमध्ये डॉ.प्रकाश कोयाडे सेवा देत आहेत. कोरोना काळात रात्रंदिवस एक करून कोयाडे यांनी अनेकांचे प्राण वाचवले आणि त्यासोबतच सोशल मीडियावरून सतत सामान्य जनतेला योग्य मार्गदर्शन करत राहिले. कोयाडे सर एक डॉक्टर व लेखक तर आहेतच, पण त्यासोबतच एक संवेदनशील माणूस आणि समाजसेवकही आहेत. मराठी वाचक आणि नेटकऱ्यांची कोयाडे यांनी मने जिंकली आहेत.
लवकरच डॉ. प्रकाश कोयाडे त्यांची “१७ जून- केदारनाथ” ही पुढची रहस्यमय कथा घेऊन येत आहेत, जिची मराठी वाचक आतुरतेने वाट पाहत आहेत.