अग्निपर्व म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने डागलेल्या तोफगोळ्यांमुळे रायगडाने घेतलेला पेट. स्वराज्यवैभवाचे राणीव भोगणाऱ्या रायगडाची ती दुरवस्था. अशा या गडावरील अग्नी तांडवाचे वास्तव म्हणजे “अग्निपर्व”. कंपनीच्या पारतंत्र्याला न जुमानता देशातील तरुणांना, क्रांतिकारकांना आणि समाजसुधारकांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारा रायगड, त्याचे हे “स्वातंत्र्यपर्व”.
१८१८ मध्ये बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे राहणाऱ्या सदाशिवचे कंपनीत कारकुनी पदावर कामास रुजू झाला. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये कंपनीत नव्याने भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हालचाली त्याने टिपल्या. सदाशिवला सुरुवातीपासूनच कंपनीत काहीतरी काळंबेरं शिजतंय याचा सुगावा लागला होता, पण नेमकं काय चालू आहे, हे मात्र त्याला कंपनीने कधीच जाणवू दिले नव्हते. कंपनीच्या काळ्या कामात आणि काळ्या पैशात सदाशिवच्या बाबांचा मोठा पुढाकार होता. आपल्याच घरात इंग्रजांच्या गुलामगिरीची भाकरी भाजली जाते या एका गोष्टीची सदाशिवला नेहमी खंत वाटत होती आणि त्यामुळे तो अधिकच चिंतेत असे.
परंतु सदाशिवचे राष्ट्राप्रती, देशाप्रती आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या आस्थेमुळे, प्रेमामुळे तो कंपनीच्या कपटी कारस्थानात कधीच सहभागी होत नव्हता. उलट कंपनीत काय खलबतं होत आहेत ते शोधण्यासाठी कधी पहिल्या प्रहरी, तर कधी भरदिवसा तो कंपनीत शोधाशोध करीत असे. काही महिने अशाच गोष्टींचा शोध घेण्यात निघून जातात. दरम्यान सदाशिवच्या बाबांना कंपनीकडून महाड येथे नजरकैद होते. कंपनीच्या कपटी राजकारणाला आपले बाबा बळी पडले, ही गोष्ट सदाशिवला आतून खात होती. त्यातच अचानक एके दिवशी कंपनीत वरिष्ठ अधिकारी रायगडाच्या पाडावाचा विजय साजरा करू लागले. महाड येथे मोठे युद्ध झाले असे त्याच्या कानी पडले. त्याने क्षणाचाही विलंब न करता सरळ बॉम्बेपासून रायगडपर्यंत मजल दरमजल करत प्रवास सुरु केला. रायगड किल्ला पाहणे अशी इच्छा सदाशिवने एकदा व्यक्त केली होती, पण काही केल्या बाबांकडून ती पूर्ण झाली नव्हती. आता जेव्हा तो स्वतः रायगडाच्या घेऱ्यात आला आहे हे समजल्यावर त्याने गड पाहायचाच असं ठरवलं आणि कोणताही विचार न करता गड चढण्यास सुरुवात केली.
गडावर पुढे काय झाले? त्याला भेटलेले गृहस्थ कोण होते? अग्निपर्व म्हणजे काय? किल्ले रायगड आणि अग्निपर्व याचा नक्की संबंध तरी काय? असे अनेक प्रश्न या कथेतून उलगडत जातात.
पारतंत्र्यात असताना देखील स्वातंत्र्याची ठिणगी मनात पेटवलेल्या रायगडाच्या अग्निपर्वाची ही कथा आहे.
सदाशिवला रायगड चढण्यापासून ते गडफेरी पूर्ण होईपर्यंत आलेले अनुभव सांगणारी कथा म्हणजे “अग्निपर्व”.