Majbuti ka nam mahatma gandhi (मजबुती का नाम महात्मा गांधी)

300

Availability: 90 in stock

SKU: 9788193446843-1 Category: Tag:

भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी गांधींनी काहीच केले नाही? डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात शत्रुत्व होतं? दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे गांधींबद्दल काय विचार होते? काय देशाची फाळणी गांधींनी केली? गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी द्यायला लावले? गांधींनी सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते का? नथुराम जे कोर्टात बोलला ते खरे होते का? सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावर गांधींनी अन्याय केला? सुभाषबाबूंनी सेना उभी केली, भगतसिंग फासावर गेले पण गांधींनी देशासाठी काय केले? गांधी काय सशस्त्र क्रांतिकारकांच्या विरोधात होते? त्यांच्यासाठी गांधींनी काहीच केले नाही? गांधी नसते तर काय देश लवकर स्वतंत्र झाला असता?

आपण २० कोटी भारतीय १ लाख इंग्रजांना देशातून हाकलू शकत नव्हतो? खरंच गांधी मुस्लिमधार्जिणे होते? गांधींच्या अहिंसेने काय देशाला भेकड बनवले? गांधींनी डॉक्टरांना औषध देण्यापासून रोखले आणि स्वतः च्या बायकोला मरू दिले, हे खरं आहे काय? गांधींवर एकूण किती हल्ले झाले व ते कुणी केले? गांधींच्या हत्येमागे खरे कारण कोणते?

या सर्व प्रश्नांची तत्कालीन पुरावे आणि संदर्भासहित उत्तरे देणारे एकमेव पुस्तक म्हणजे ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’.

Weight 190 g
Number of Pages

228

Writer

Chandrakant Zatale

Reader's Reviews

  1. Review 1: -डॉ.आशिष लोहे
    वरुड
    मित्रवर्य तरुण तडफदार निर्भिड पत्रकार चंद्रकांत झटाले (अकोला) हे आपल्या रोख-ठोक आणि भूमिका घेऊन लिखाणासाठी सुप्रसिद्ध आहेत नुकतेच त्याचे “मजबुती का नाम महात्मा गांधी” हे पुस्तक प्रकाशित झाले. महाराष्ट्रातील बहुचर्चित लेखक चंद्रकांत वानखडे यांनी “गांधी का मरत नाही” हे पुस्तक प्रकाशित करून एका वेगळ्या विषयांकडे तरुणांना आकर्षित केलं आणि त्या पुस्तकाचा पुढचा भाग घ्यावा असे मला वारंवार वाटत होते. आज “मजबुती का नाम महात्मा गांधी” हे पुस्तक वाचून हे पुस्तक “गांधी का मरत नाही” याचाच दुसरा भाग वाटावा, एवढी एकरूपता आहेपुस्तक लिहित असताना लेखकाने या पुस्तकात आपला जीव ओतला हे आपल्याला वेळोवेळी जाणवते आणि या पुस्तकाचे अजून एक बलस्थान आहे ते म्हणजे पुस्तकांमधे असलेले संदर्भ. अपवादानेच एवढे संदर्भ आपल्याला एखाद्या दुसऱ्या पुस्तकात मिळू शकतील. समजून सांगण्याची पद्धत अतिशय साधी आणि सोपी सरळ आहे. आपल्या व्यवहारातले साधे, सोपे उदाहरण देऊन एक-एक मुद्दा अधिक स्पष्टपणे समजून सांगत पुस्तक पुढे जातो. या पुस्तकांमध्ये असणाऱ्या संपूर्ण १७ प्रकरणांपैकी तुम्ही कोणतेही प्रकरण काढून वाचू शकता. प्रत्येक प्रकरण एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकते. क्रांतिकारकांसाठी गांधींनी काय केले? आणि गांधी व आंबेडकर यांचे संबंध हे दोन्ही विषय या लेखकाने अत्यंत समर्थपणे हाताळलेले आहेत असे म्हणावे लागते.
  2. Review 2 :- रविंद्र साळवे, बुलडाणा
    “मजबुती का नाम महात्मा गांधी” एक दमदार पुस्तक’मजबूरीका नाम महात्मा गांधी’ हा खोडसाळ शब्दप्रयोग रुढ करीत मनुवाद्यांनी आजवर अनेक पिढया नासवल्या. गांधीजींना गोळ्या घालूनही त्यांचे विचार मरत नाहीत म्हणून ते अस्वस्थ आहेत. म्हणूनच की काय आजही ते गांधीजींचे पुतळे तयार करून त्यावर गोळ्या घालतात. एका माजलेल्या वर्गाची विकृती आणि उन्माद आज चरम सीमेवर असताना चंद्रकांत झटाले यांचे “मजबुती का नाम महात्मा गांधी” हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. जाणून घेऊ ‘आश्वासक’ मध्ये या पुस्तकाविषयी…
    खरे तर स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी नत्थ्याने गांधीजींना मारण्याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की नत्थ्या आणि त्याच्या टीमच्या पाताळयंत्री कामात नि:शस्त्र गांधींची त्यांना मोठी भीती होती आणि अडचणही होती. अजूनही या टीमला गांधीजींची भिती वाटते. त्यामुळेच ते गांधीजीपासून लोकांना दूर करू पाहतात. नत्थ्याचे उदात्तीकरण करतात. ज्यास ब्राम्हणी व्यवस्था गोंजारते, पुरस्कृत करते ते बहुजनांनी नाकारावे आणि ज्याचा ब्राम्हणी व्यवस्था तिरस्कार करते ते स्विकारावे, इतके तर गेल्या काही वर्षात बहुजन समाजाला पक्के ठाऊक झाले आहे. गांधी असो वा नेहरू वा बाबासाहेब या सर्वांचा मनुवादी जितका द्वेष करतील तितके हे महापुरुष लोकांच्या हृदयस्थानी विराजमान होतील. गांधी, नेहरू आंबेडकर हीच आज भारताची ओळख आहे.
    गांधीजी, ज्यांनी सत्याचे प्रयोग केले त्यांना असत्याचे प्रयोग करून नथुरामी गॅंग बदनाम करू पाहत आहेत. तेल्या तांबोळ्यांनी संसदेत काय तागडी धरायची? असा ओबीसी विरोधी मनुवादी विचार मांडणारे टिळक जोवर कॉंग्रेसचे अध्यक्ष होते तोवर कॉंग्रेस पक्ष शेंडी जानव्यात कुलूपबंद होता. कॉंग्रेसला सर्वहारा समुदयाने स्वीकारले नाही. काँग्रेसला लोकाभिमुख केले ते गांधीजींनी. जनसामान्यांपर्यंत पोहोचविले ते गांधींनी. दिडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्रजांना गांधीजी घालवू शकतात तर ते निघून गेल्यावर खैबरखिंडीतून आपलीही रवानगी होईल त्यामुळेच त्यांना गांधींची भिती वाटत असावी. अजूनही त्यामुळेच त्यांना गांधीजी चालत नाही. गांधींवर ते नाटके लिहितात. अश्लील जोक्स तयार करतात. सिनेमा काढतात. पुस्तके लिहितात. खरेदीदारांना भक्कम डिस्काउंट देत भूरळ पाडतात. नवी पिढी एकीकडे थुकरट विषयात गुंतवून सोशल मिडियावर इकडचा कचरा तिकडे फेकत असतानाच काही विवेकी तरुण मात्र गांधीजी नव्याने समजून घेत नत्थुरामी गॅंगला एक्स्पोज करीत आहे. हीच आज खरी आश्वासक बाब आहे.
    अशाच एका विवेकवादी तरुणाचे नाव आहे चंद्रकांत झटाले. गांधीजींना समजून घेण्यासाठी त्यांनी शेकडो ग्रंथ वाचले. गांधीजींवरील परिसंवादाला हजेरी लावली आणि संशोधनपर पुस्तक लिहिले. गांधींवर मनुवादी कलम कसायांनी चढवलेली आरोपाची पुटं दूर केली. ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ हे त्यांचे पुस्तक गांधीजींच्या स्मृतीदिनी प्रसिद्ध झाले. हे पुस्तक वाचकप्रिय ठरत आहे. २२८ पानांच्या या पुस्तकात एकूण १७ प्रकरणे आहेत. यातून चंद्रकांत झटाले यांनी गांधीजींची मजबुती जगासमोर आणली आहे. गांधी विरोधकांच्या असत्याची पोल खोलली आहे. त्या पृष्ठ्यर्थ पुरावे दिले आहेत. या पुस्तकाला महात्मा गांधींचे पणतू मा. तुषार गांधी यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे. लेखक चंद्रकांत झटाले यांनीही ते गांधींवरील या पुस्तकाच्या लेखणापर्यंत कसे पोहोचले याबद्दल यात लिहिले आहे.
    भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी गांधींनी काहीच केले नाही? डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात शत्रुत्व होतं? काय देशाची फाळणी गांधींनी केली? ५५ कोटी पाकिस्तानला गांधींनी द्यायला लावले? नत्थुराम जे कोर्टात बोलला ते खरे होते का? काय सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावर गांधींनी अन्याय केला? सुभाष बाबूंनी सेना उभी केली, भगतसिंग फासावर गेले पण गांधींनी देशासाठी काय केले? गांधींच्या अहिंसेने काय देशाला भेकड बनवले? गांधींवर किती हल्ले झाले? गांधींच्या हत्येमागे खरे कारण कोणते? अशा प्रश्नांची या पुस्तकात उत्तरे सापडतात. प्रश्नार्थक शीर्षकावरून वाचकांची उत्कंठा वाढत जाते. सहज व सुंदर भाषा हे या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. न्यू ईरा पब्लिशींग हाऊस पुणे यांनी त्याचे प्रकाशन केले आहे. गांधींवर केल्या जाणाऱ्या बहुतेक सर्व आरोपांचे निराकरण या पुस्तकात आहेत. गांधींवर आजवर आलेल्या अनेक पुस्तकांपेक्षा हे एक वेगळे पुस्तक आहे. आपल्या आदर्शांना निर्भळ स्वरूपात लोकांपर्यंत पोहचविण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेस पक्षाने तर खडबडून जागी होऊन या पुस्तकाचे आपापल्या स्तरावर वितरण केले पाहिजे. विविध भाषांमध्ये भाषांतर करून भारतभरच नव्हे तर जगभर पोचवायला हवे. लेखक चंद्रकांत झटाले यांनी या पुस्तकासाठी घेतलेली मेहनत खरोखरच अभिनंदनीय स्वरूपाची आहे. आज लोक जाती धर्माच्या नावाने अधिक कडवट होत आहेत. एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. मुडद्याच्या राशी पाडून त्यावर राज्य करण्याचे मनसुबे रचले जात आहेत, अशा काळात पुराव्याच्या आधारे गांधीजींमधली मजबुती समजून घेणे अधिक गरजेचे झाले आहे. नेमके हेच नेक काम चंद्रकांत झटाले यांनी केले आहे. त्यामुळेच ते अभिनंदनास पात्र आहेत
  3. पुत्र सांगती
    चरित्र पित्याचे….

    विचारांची नाती ही नेहमीच रक्ताच्या नात्यांपलीकडे असतात. सर्व काळात होऊन गेलेल्या महापुरुषांच्या रक्तातील नात्यांनी त्यांचा विचार पाळलेला, टिकवलेला किंवा वाढवलेला नाही उलट ज्यांची वैचारिक नाळ जुळली अशा देश, प्रांताच्या सीमा ओलांडून असंख्य वैचारिक नात्यांनी आपल्या देशात महापुरुषांचे विचार जगवले आणि वाढवले आहेत.असाच महात्मा गांधींपायी झोप उडून गांधी समजून घेण्याची उरात काहिली उठलेला एक तरुण होता, चंद्रकांत झटाले. तुम्ही त्याला झपाटले सुद्धा म्हणू शकता. वडील बापूराव झटाले गेली ५ दशके घरात शेकड्यानी पुस्तके आणतात. पण त्याकडे ढुंकूनही न पाहणारा चंद्रकांत “गांधी च्या नादाला लागून लौकिकार्थाने पुरा वाया गेला. पुस्तकांचा फडशा पाडायला लागला, जे मित्र चंदूला ओळखून होते त्यांना हा बदल तर चमत्कारच वाटत होता, एका चंदूभाऊ मुळे गावोगावचे चंदू झपाटले गेले.

    तर आमच्या चंदूने “गांधींवरील शेकडो पुस्तकांचे अनेकदा वाचन केल्यावर या पुस्तकात गांधींची कोणती बाजू आली नाही यावर विचार करीत गेल्या वर्षभरात दोनशे पुस्तके वाचली आणि त्याच्या लक्षात आले की “ये गांधी भी दुनिया के सामने जाना चाहीये” त्यातून जन्म झाला “मजबुती का नाम महात्मा गांधी” या अभ्यासू पुस्तकाचा. पुण्यातील शरद तांदळे यांच्या न्यू ईरा प्रकाशनाने हे २०० पानांचे पुस्तक प्रकाशित केले. जानेवारीला गांधी पुण्यतिथी दिनी पुण्यात त्याचे प्रकाशन होत आहे. गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणजे बाप म्हणतो त्या अर्थाने पुत्र सांगती चरित्र पित्याचे असा हा सोहळा आहे.

    लागोपाठ बारामती आणि कोल्हापूर येथेही या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. चंद्रकांत झटाले या माझ्या मित्राचे हे वैचारिक अपत्य आहे. याचा त्याच्यापेक्षा मला आणि दै.अजिंक्य भारत परिवाराला जास्त आनंद आहे. चंदूचे “मोडलेली चौकट” हे दर गुरुवारी अजिंक्य भारत मध्ये प्रकाशित होणारे सदर जो वाचतो त्याला चंदूची खरी ताकद कळत असते. आगामी काळात चंदू विवेकी पुस्तकांची खाणच वाचकांना उपलब्ध करून देईल यात मला अजिबात संशय नाही. प्रकाशन समारंभ अन या तरुण लेखकाच्या स्वतःला व्यक्त करण्याचा असून या घटकेला माझ्या अनंत सदिच्छा…

    -पुरुषोत्तम आवारे पाटील
    (मुख्य संपादक दै अजिंक्य भारत, अकोला, वाशीम-बुलडाणा)

  4. चंद्रकांत दादांचे हे पुस्तक हातात आल्यापासून टप्प्याटप्प्याने वाचून काढलं.
    २०१४ च्या निवडणूका लागण्याच्या एखाद दोन वर्षापूर्वी देशात एक पोकळ आणि उथळ पिढी तयार झाली. जिला गांधी हा अतिशय बोरिंग विषय वाटायला लागला. नुसताच बोअर नाही तर, देशाचं नुकसान गांधी ने केलंय वगैरे ही पिढी बोलायला लागली. अहिंसा म्हणजे पळपुटेपणा.. गांधी म्हणजे भित्रा म्हातारा.. या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात इतक्या फिट बसल्या की अगदी गांधींना त्यांनी सुभाषचंद्र बोस व बाबासाहेब आंबेडकरांचे शत्रू म्हणून घोषित केले. आणि दुर्दैवाने गांधी नावाचा म्हातारा या सगळ्यांच्या अपप्रचाराचा बळी ठरला. मात्र या गोडसेचा उदोउदो करणाऱ्या पिढीला सातत्याने विरोध करणारी माझ्यासारखी गांधीप्रेमी पिढी दुसरीकडे जीवतोडून सांगत होती आणि आजही सांगतेय की गांधी नावाचा म्हातारा अमर आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण तो मरणार नाही.
    चंद्रकांत झटाले यांनी लिहिलेलं ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ वाचायला हातात घेतलं आणि आपसूकच तोंडातून शब्द निघाले, ‘अरे.. हेच तर मला म्हणायचंय.. गांधी मजबूर नाही मजबूत आहे..’हे पुस्तक वाचताना बऱ्याच गोष्टींची आपोआप उकल होते. खूप प्रश्नांची उत्तरं मिळतात. अनेक संदर्भ आणि पुरावे देऊन हे पुस्तक अतिशय informative तसेच मुद्देसूद लिहिले आहे. केवळ आणि केवळ गांधी पुन्हा एकदा कळवा याच अनुषंगाने या पुस्तकाची रचना लेखकाने केलीय. आपला म्हातारा ज्यांनी बदनाम करायचा प्रयत्न केला, त्यांच्या तोंडावर दिलेली चपराक म्हणजे हे पुस्तक आहे.

    जी पोरंटोरं विचारतात की, गांधींनी देशासाठी काय केलंय? त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी हे पुस्तक एकदा मजबुरीने तरी हातात घ्यावं. म्हणजे आमचा गांधी किती मजबूत होता हे तुम्हाला तंतोतंत कळेन.

    चंद्रकांत दादांचे मनापासून अभिनंदन..
    -तेजस्वी बारब्दे पाटील
    अमरावती
    (प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र)

  5. ३० जानेवारी २०२२ अर्थात शहीद दिनी अकोला येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा युवा गांधी अभ्यासक चंद्रकांत झटाले यांचे ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. न्यू ईरा पब्लिकेशन हाऊस पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. एका तरुण लेखकाने लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे. पहिलेच पुस्तक अत्यंत प्रभावी झाले आहे. प्रचंड संशोधन करून अत्यंत वेधक अशी मांडणी या पुस्तकात झटाले यांनी केली आहे. विशेष म्हणजे सदर पुस्तक हे अशा काळात आले आहे ज्या काळात गांधी विचारांचा खून दररोज होतो आहे. गांधीला बदनाम करणाऱ्या रेशमी झुंडीच्या झुंडी रोज तयार होत असताना त्या झुंडीस सडेतोड उत्तर देण्यासाठी हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल. एके काळी गांधी विचारांचा विरोधक असलेले चंद्रकांत झटाले पुढे मात्र गांधीचा नव्याने शोध घेतात आणि वेगवेगळ्या गैरसमजातून गांधी यांना मुक्त करतात. या प्रवासात तुषार गांधी, चंद्रकांत वानखडे, अमर हबीब, अविनाश दुधे, सुधाकर जाधव, भुजंग बोबडे या विचारवंतांनी त्यांना मदत केली. २०१८ मध्ये जळगाव येथे आम्ही सारे फाउंडेशनने घेतलेल्या गांधी समजून घेताना या शिबिराने चंद्रकांत झटाले हा कार्यकर्ता पूर्ण बदलून गेला आणि एका सर्वांग सुंदर पुस्तकाचा जन्म झाला.
    महापुरुषांच्या मूळ प्रतिमा हरवत चाललेल्या आहेत. देशाचे तुकडे करू पाहणारे लोक अखंड देशाचे कसे स्वप्न पाहत होते असा भ्रम समाजात निर्माण केला जातो आहे. देशाला एका सूत्रात बांधणाऱ्या गांधी नावाच्या हाडामासाच्या माणसाला कायम बदनाम केले जात आहे. देशाची फाळणी गांधीने केली, भगतसिंग यांना त्यांनी वाचवले नाही, मजबुरी का नाम गांधी, सुभाषचंद्र बोस आणि गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांचे वैर, मुस्लिम धार्जिणा गांधी, असे अनेक आरोप गांधींवर ठेवण्यात आलेले आहे. फाळणी केली म्हणून गांधीची हत्या केली हा युक्तिवाद लेखकाने अत्यंत ताकदीने खोडून काढला आहे.
    फाळणीचा विषय ऐरणीवर नव्हता तेव्हा पासून गांधी वर हल्ले का करण्यात आले याची चिकित्सा या पुस्तकात करण्यात आली आहे. १९३४ पासून गांधींवर हल्ले करण्याचे कारण काय? फाळणी होऊ नये या साठी आर.एस.एस. आणि हिंदू महासभा यांनी भूमिका का घेतली नाही? फाळणीसाठी पोषक वातावरण कुणी निर्माण केले? १९१६ ला लाहोर करार झाला. यातच फाळणीची बीजं रोवली गेली. यात टिळक आणि जिना यांचा रोल महत्वाचा होता. मात्र हा रोल जाणीवपूर्वक झाकून ठेवण्यात येतो. सरदार पटेल देशातील संस्थाने विलीन करीत होते, तेव्हा सागरामध्ये उड्या मारणारे मात्र संस्थानिकांना स्वतंत्र भारतात विलीन होवू नका अशी विनंती, आवाहन करीत होते. तेव्हा अखंड भारतासाठी त्यांचा प्राण का तळमळत नव्हता? १९३६-३७ मधील स्वातंत्र्य पूर्व भारतातील निवडणुकीत मुस्लिम लीग सोबत कुणाची युती होती, तिथे कुणाचे सरकार होते? जिथे सरकार होते तो भाग पाकिस्तान मध्ये गेला. मुस्लिम लीगने पाकिस्तानचा प्रस्ताव पारित केला त्यावेळी त्याचा मित्र पक्ष गप्प का होता? असे अनेक प्रश्न झटाले यांनी उपस्थित केले आहे. फाळणी हे गांधी हत्येचे खरे कारण नाही. खरे कारण समजून घ्यायचे असेल तर मनातील गांधी द्वेष बाजूला ठेवून सदर पुस्तक वाचावे लागेल. ज्या अकोल्यातील एक महाराज गांधी विरुद्ध गरळ ओकतो त्याच अकोल्यातील एका तरुण लेखकाचे हे पुस्तक आहे.
    आपल्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे काम करेलच. पुढच्या पिढीसाठी एक नवा प्रकाश देणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या प्रकाशात गोडसे नावाचा काळोख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. मलाही गांधी कधी आवडला नाही. माझे ही खूप गैरसमज होतेच. खास करून पुणे कराराबाबत. पण लेखकाने जीव ओतून या पुस्तकाला आकार दिला. अशी पुस्तके राष्ट्राला आकार देण्यासाठी आवश्यक असतात. प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.
    -संतोष अरसोड, यवतमाळ (‘प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा’ पुस्तकाचे लेखक)
  6. जगभरात सर्वाधिक लिखाण, चर्चा, वाद-विवाद, आक्षेप ज्यांच्यावर झालेत अशी ऐतिहासिक व्यक्ती म्हणजेच महात्मा गांधी. ऐतिहासिक अंगाने गांधीच्या जीवनाचा साधार आढावा घेणा-या पुस्तकांध्ये “मजबुती का नाम महात्मा गांधी” हे चंद्रकांत झटाले यांचे पुस्तक आपले वेगळेपण राखणारे आहे.
    “गांधी का मरत नाही” या चंद्रकांत वानखडे यांच्या पुस्तकानंतर गांधींच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर गांधीविरोकांकडून होणा-या आरोपांना पुराव्यानिशी खोडून काढणारे “मजबुती का नाम महात्मा गांधी” प्रत्येक भारतीयाने वाचावं. पुस्तकाची भाषा ही वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. त्यामुळे गांधी समजून घेणे अधिक सुलभ होते. पुस्तक वाचताना लेखकाने यासाठी घेतले परिश्रम आपसूकच जाणवतात. गांधींच्या जीवनातील प्रसंगाचे अन्वयार्थ लावताना लेखकाने ऐतिहासिक तथ्यांना जाणिवपूर्वक जपले आहे.
    सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऐतिहासिक लिखाणात संभवणारा अभिनिवेशाचा धोका. या लिखाणात अभिनिवेश नाही. महात्मा गांधींवर लिहिल्या गेलेल्या आजवरच्या लिखाणामध्ये मौलिक भर घालणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा अनुवादही इतर अनेक भाषांमध्ये व्हावा. लोकांपर्यत हे जावं.राहुल बरडे
    अमरावती
  7. चंद्रकांत झटाले, सध्याच्या काळातील प्रखर, परखड व तेवढंच प्रभावीपणे लेखन करणाऱ्या उदयोन्मुख लेखकाचं नाव.
    त्यांचं “मजबुती का नाम महात्मा गांधी” वाचण्यात आलं. त्याचं व माझं नाव सारखंच. पण वयात फरक.
    त्यामुळे नामसाधर्म्यावर मात करण्यासाठी आमचा मित्र परिवार मला चंद्रकांत (सिनियर) तर झटालेला चंद्रकांत (ज्युनिअर) म्हणतो. पण हे अन्यायकारक आहे. चांगदेवाला वयामुळे श्रेष्ठ व ज्ञानदेवाला कनिष्ठ ठरविता येत नाही. तसंच काहीसं हे आहे.
    “मजबुती का नाम महात्मा गांधी” या चंद्रकांत झटाले लिखित पुस्तकाची प्रेरणा निश्चितच “गांधी का मरत नाही”हे पुस्तक आहेच या बाबत शंका नाही.
    पण ते तिथेच न थांबता ते “गांधी का मरत नाही” या पुस्तकाचा अनेक अर्थाने केलेला विस्तारही आहे हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते.
    गांधींच्या अनेक दुर्लक्षित वेगवेगळ्या पैलूंवर झटालेंनी प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे. जो मलाही ज्ञात नव्हता.
    त्यामुळे “मजबुती का नाम महात्मा गांधी” हे पुस्तक आपण अवश्य वाचावे, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती राहील. पुस्तकाचा शेवट करताना लेखक म्हणतो,
    “गांधींना संपविण्याच्या इराद्याने त्यांना जमिनीत गाडू पाहणाऱ्यांना हे माहीतच नाही की गांधी हे एक बीज आहे, ते अंकुरणारच…”
    सध्याच्या “भोंगे” राजकारणाच्या पार्श्वभूमीवर “मजबुती का नाम महात्मा गांधी” सारखी “रामधून” पुस्तक रुपाने चंद्रकांत झटाले सारखा उदयोन्मुख लेखक वाजवतो ही निश्चितच आशादायक व तेवढीच उमेद वाढविणारी बाब आहे असं मी मानतो.
    अभिनंदन लेखकाचे व त्याला पुढील सकस लिखाणासाठी शुभेच्छा.• (चंद्रकांत वानखडे)
    (‘गांधी का मरत नाही’ पुस्तकाचे लेखक)
Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us