महेश लांडगे
सहाय्यक पोलीस निरीक्षक, नांदेडवाचलेले अन भावलेले पुस्तक.रायरी – गोष्ट शिवभक्तांची (वाहवत चाललेल्या युवा पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी)
रायरी असा शब्द उच्चारताच आठवण होते छत्रपती शिवाजी महाराज यांची. रायरी म्हणजेच रायगडाचे जुने नाव. मुखपृष्ठावर रायरी हा शब्द देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधी स्थळाचे दर्शन घडवतो आणि ही कॅलिग्राफी चक्क लेखकाने स्वयंसिद्ध साकारली आहे. मुखपष्ठावर असलेला गड आणि युवकाच्या खांद्यावर ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हात हा एक वेगळाच विश्वास निर्माण करून देतो. तर मलपृष्ठ, रायरी म्हणजे काय आहे? त्यात कोणते प्रश्न दडले आहेत? त्याची उत्तरे म्हणजे “रायरी”.
आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असणारी चरित्र पुस्तके वाचली, व्याख्याने ऐकली, कविता, पोवाडे ऐकल्या आणि स्वतः कविता लिहिली. परंतु रायरी वाचताना ती वरील सर्वांपेक्षा वेगळी असल्याचे जाणवत राहते. एकूण नऊ भागात लेखकाने ही कादंबरी साकारली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त डोक्यावर घेऊन साजरे करण्याचा विषय नाही, तर डोक्यात घेऊन आचार विचार अंगीकृत करून कृतीत आणण्याचा विषय आहे आणि जो हे विचार अंगीकारतो आणि कृतीत उतरवतो तो नक्कीच यशस्वी होतो, हा विचार लेखकाने अतिशय सुंदर, सहज आणि सोप्या ग्रामीण आणि प्रमाणित भाषेत मांडला आहे. ग्रामीण भागात सध्या महापुरुषांची जयंती मोठ्या जल्लोषात अर्थात राड्यातच साजरी करायची असते, असा पायंडा पडत असताना लेखक त्याला एक नवी दिशा देऊ इच्छितो. खरं तर ही दिशा समजून आणि उमजून घेण्यासाठी “रायरी” एकदा वाचायलाच हवी.
रायरीत शिवविचारांचा एकेक धागा पकडून त्याची केलेली गुंफण वाचताना नेहमी जाणवत राहते. त्यासाठी लेखकाने शिव विचार मांडताना काल्पनिकरित्या कथेत अलगदपणे मांडले आहे, जे वाचताना वाचक नकळतपणे त्यात रममाण होऊन जातो. कथेत वर्णन केलेली डुगारवाडी, त्यातील पात्रे आप्पाराव (आप्पा), संताजी (संत्या), प्रतीक (पत्या), अमोल (आमल्या) आणि नाना (नान्या) ही चपखलपणे प्रतिकात्मकरित्या वापरून शिवविचारांचा धागा गुंफला आहे. शिवविचार कृतीतून जगणारा आप्पा त्यांच्या मित्रांना हळुवारपणे जागृत करतो. गोव्याला जाण्याचा अट्टाहास करणाऱ्या मित्रांना नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी रायगडावर घेऊन जायचे प्लॅन करतो. ते करत असतानाच शिवाजी महाराज हे फक्त गळ्यात, कंड्यात, दोऱ्यात आणि अंगठ्यात, फोटोत दाखवून नाही तर कृतीत आणण्याचा विषय आहे हे समजून सांगतो. व्यसनाधीनता चांगली नाही हे वारंवार समजून सांगून त्यांना ते सोडण्यास भाग पाडतो. भीमा आबाचे घरकुल मंजूर होत नाही तेव्हा भीमा आबा ग्रामपंचायतमध्ये सरपंचाकडे दाद मागायला येतो, त्यावेळी संत्या त्याला तेथून दादागिरी करून हाकलून देतो. पण जाताना भीमा आबा त्याला म्हणतो, “तुझ्या नेत्याला एक निरोप सांग. त्याला म्हणावं, त्याच्या खुर्चीम्हागं लावलेला शिवाजी महाराजांचा फोटो तेव्हढा काढून कपाटात ठिव. त्यांच्या दरबारात आसं गरिबावर अन्याय नव्हता व्हत.” अशा कित्येक प्रसंगातून लेखक शिव विचारांची पेरणी अलगदपणे करत जातो. वाचक सुद्धा नकळत आपण असे कधी चुकीचे वागलो का याचा विचार करायला प्रवृत्त होतो. हीच खरी या “रायरीची” ताकत आहे असे जाणवत राहते.
गावातील सरपंच किंवा राजकीय नेते आपल्याच गावातील युवा पिढीला कसे आपल्या दावणीला बांधून त्यांच्याकडून हवे ते काम करून घेतात, त्यांचा वापर करून आपले राजकीय आणि आर्थिक स्वार्थ साध्य करतात, गावातील बड्या बापाच्या पोरगा पप्प्या हा गावातीलच संगीला अडवून छेडछाड करतो आणि त्याबाबत संगीचा बाप पोलिसांत तक्रार करूनही त्यावर कारवाई होत नाही, त्यातील आरोपीला कसे पाठीशी घालतात, हे सध्याच्या वास्तव परिस्थितीला अनुरूप असे राजकीय वर्तन दिसून येते.
पत्या आपल्या स्वार्थासाठी एका मुलीची बदनामी करतो आणि त्याबदल्यात दारू ढोसून पडतो पण त्याचवेळी आप्पा त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव करून देतो आणि त्याच्या मनात शिवविचार पेरतो. बेरोजगार असणारा पत्या गवंडी काम करून घामाचे पैसे गाळून आईला पहिल्यांदा साडी घेतो, त्यावेळी त्याच्या आईला झालेला आनंद त्याच्यासोबत वाचकाच्या डोळ्याच्या कडा पाणावतात. असे अनेक प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर मांडले आहे. पानोपानी वाचताना शिव विचारांचा जागर मनात जागृत होत जातो.
नववर्ष दिनी रायगडावर जाण्याची आप्पाची संकल्पना सत्यात उतरवून मित्रांसह आप्पा रायगडावर पोहचतो. जाताना त्यांना “महाड” येथील “चवदार तळ्याची” कथा सांगतो. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला संघर्ष सांगतो. रायगडावर असणारी महत्त्वाची ठिकाणे, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सांगत मित्रांचे स्फुल्लिंग चेतवत राहतो. “रायगड हे स्थान फक्त फिरायला यायचे नाही तर मन, मेंदू आणि मनगट सशक्त करण्याचे मंदिर आहे.” अशा अनेक प्रेरणादायी वाक्यातून आप्पा आपल्या मित्रांवर शिवसंस्कार करत राहतो. गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा युवक ते शेतकरी, शिव आदर्श मंडळाचा अध्यक्ष, पॅनल प्रमुख, आमदार आणि राज्यमंत्री असा प्रवास असणारा आप्पाराव पवार, शिव विचारांचा आदर्श घेऊन काम करणारा तरुण. खरंतर अशा तरुणांची आजच्या युवा पिढीला गरज आणि ही प्रेरणा रायरी गोष्ट शिवभक्तांची नक्कीच देते असा माझा दृढविश्र्वास आहे.
एकविसाव्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय? महापुरुषांबद्दल तो काय विचार करतोय? गाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे? महिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात? युवाशक्तीचा वापर कोण व कसा करून घेतोय? महापुरुषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय? शेतकऱ्यांना राजा मानणाऱ्या समाजात सध्या त्याचे स्थान कुठे आहे? सर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातोय? राजकारण नावाचे शस्त्र रयतेच्या संहारासाठी का संरक्षणासाठी? रयतेला नासवायचे आणि नागवायचे पाप कुणाचे? लोकशाहीतली खुर्ची कोण ठरवतं? खरं प्रेम काय? सामान्य जनतेने ठरवले तर काय होऊ शकतं? काळ बदलण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे? खरे शिवभक्त कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे “रायरी” आहे. अर्थात यासाठी आपल्याला रायरी वाचायला हवी. एकदा तुम्ही “रायरी” वाचायला हातात घेतली की तुम्ही खाली ठेवणार नाहीत, याचा मला विश्वास आहे. कारण केलेली विषयाची, आशयाची, पात्राची व विचारांची आणि त्यातून आलेल्या कृतीची मांडणीच इतकी जबरदस्त आहे की ती तुम्हाला खिळवून ठेवते. अगदी सहज, सोप्या, अस्खलित ग्रामीण आणि प्रमाणित भाषेत असलेली “रायरी” आजच्या वाहवत चाललेल्या युवा पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.
धन्यवाद!