नांगरे पाटलांचं एका शाळेत झालेले भाषण खूप फेमस झालं होतं. तेच ते स्पर्धा परीक्षा, If you fail to plan.., साडेतीन वाजता उठणं, स्वर्गीय कारण वगैरे! ते भाषण खूपच व्हायरल झाल्यामुळे नांगरे पाटील जवळजवळ सगळीकडे माहित झाले. इतकं नाव आधी कोणत्या अधिकार्‍याचं झालेलं नसेल. अर्थात ते भाषण वक्तृत्वाचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. भाषेतील अलंकार त्यात उत्कृष्ट रीतीने वापरलेले आहेत, उदाहरणार्थ अतिशयोक्ती! पण त्या भाषणाचा एक वेगळाच परिणाम अधिकारीवर्ग आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर झाला. त्यानंतर अनेक आभाळहेपले अधिकारी उदयास आले. की जे अभ्यास कसा केला, काय वेगळं केलं; यापेक्षा त्यांनी केलेला तथाकथित संघर्ष, गरीबी, परिस्थिती, उपासमार, ठेचा, ठोकरा, हलवेपणा सॉरी हळवेपणा, देशाची सेवा वगैरे अशा भंपक चावून चोथा झालेल्या गोष्टींवर गप्पा झोडायला लागले आणि पेठेतील तसेच इतर ठिकाणची जंता, हे असेले भाषणं ऐकण्यालाच अभ्यास समजायली लागली.

नंतर भाषणांची दुसरी लाट आली ती आयपीएस (पक्षी: आयआरएस) अधिकारी भरत आंधळे यांच्या रूपाने. गावाकडच्या पोरा-पोरींना धंद्याला लावण्यात यांचा मोदींचा (पक्षी: सिंहाचा) वाटा आहे. नावं ठेवणारे लोक्स, गावाकडच्या गप्पा, संघर्ष, एवढे वर्ष अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा; स्पर्धा परीक्षा पास होऊन माझ्यासारखं आभाळ हेपलून फेमस होता येईल, हा भाषणाचा सार होता. ज्यांना एमपीएससीतला ‘एम’ सुद्धा माहित नव्हता, ते सुद्धा हे भाषण पाहायचे आणि गाय-छाप खात इन्स्पायर व्हायचे. आंधळ्येंच्या भाषणानंतर, मग एकाहून एक उपटसुंभ अधिकारी भाषणबाजी करून, वर्षभर सेलिब्रिटी होऊन, गायब झाले. ग्रामीण भागातील काहीतरी काम धंदा करणाऱ्या पोरांना या असल्या भाषणबाजांनी एमपीएससी-यूपीएससीच्या धंद्याला लावलं आणि पोरांनी स्वतःचीच लावून घेतली.

तर प्रश्न असा आहे की, मुळात एवढे लोक्स इकडे येतातच कशाला? एवढ्या कमी जागा असतानासुद्धा? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे समाजात मिळणारा ‘स्टेटस’. एकदा का तुम्ही अधिकारी झाले की, लोकांची जिभ घासून जाते पण ते अधिकार्‍यांची चाटूगिरी सोडत नाही, पावर मिळते. दुसरं म्हणजे ‘पैसा’ एक तर बर्‍यापैकी पगार, अलाउन्ससेस आणि वरतून खायला भरपूर पैसे असतातच.

अजून एक गोष्ट अशी की राजकीय पुढाऱ्यांच्या शिक्षण सम्राटगिरीचा परिणाम म्हणुन शहरांच्या कोपरापासून, गावाकडच्या खोपच्यात कॉलेजं निर्माण झाली. त्यामुळे अकारण शिक्षणाचा फुगा तयार झाला. वर्षभर कॉलेज न करता सुद्धा बीए, बीएस्सी, बीकॉम वगैरे करून बेकाम झालेले कार्यकर्ते सुद्धा IIT, AIIMS, NIT आणि इतर चांगल्या महाविद्यालयातील टॉपर पोरांशी स्पर्धा करून आयएएस, आयपीएस, डीसी तहसीलदार वगैरे होण्याची स्वप्न पाहतात आणि घरच्यांना आशेला लावून ठेवतात. मग पुण्यातल्या पेठेतील चहाच्या दुकानावर गप्पा करण्यात किती वर्ष निघून जातात, याचं काही मोजमाप राहात नाही. रोजचं पेपर वाचन, करंट अफेयर्स मुळे; राजकारणही वाचण्यात येतं. मग हे राजकीयतज्ञ पार राजकारण्यांचे आई-बाप एक करतात. एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेला C-Sat क्वालिफाय न ठेवल्यामुळे जेवढे अभ्यासू पोरं नापास झाले नसतील, तेवढे पवार साहेबांच्या राजकीय डावपेचांच्या गप्पा करण्याने झाले. आणि मोदी उदयानंतर राजकीय गप्पा तर पार भारत महासत्ता होण्यापासून, यूपीएससी करणाऱ्यांनी तलाठ्याची परीक्षा देण्यापर्यंत पोहोचल्या. असो.

त्यानंतर मग पोरांची वाट लावण्यात मोठा वाटा आहे तो क्लासेसचा. धर्माधिकारी सरांनी राजकीय इच्छेने आयएएस सोडल्यानंतर व भाजपने त्यांना तिकीट न दिल्यामुळे; सरांनी मग ‘कार्यकर्ता अधिकारी’ घडवायच्या नावाखाली ‘चाणक्य मंडळ’ नावाचा एक आदर्शवादी क्लास सुरू केला. सरांचंही वक्तृत्व चांगला असल्यामुळे अनेक  ढक्कलपास पोरं सुद्धा ह्या धंद्याला लागली. नंतर स्टडी सर्कल, युनिक वगैरेंनी या धंद्याला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रूप आणलं. मग डायरेक्ट बारावी नंतरचे पोरं कॉलेजात व्यक्तिमत्व विकास करायचा सोडून; घटनेची कलमं, गव्हर्नर जनरल आणि खजुराहोचे शिल्प कोणी तयार केले, हे वाचून स्वतःला ज्ञानी समजू लागले. आता तर शाळेपासूनच पोरं, शेंबूड पुसत मला कलेक्‍टर व्हायचं असं सांगतात. आधी डॉक्टर-इंजिनिअर तरी सांगायचे. माझ्याच नात्यातली एक व्यक्ती सांगत होती की मला पोराला IAS बनवायचं आहे. सध्या त्यांचा पोरगा सहा वर्षाचा आहे. त्यांनी पोराकडून अनेक थुकराट देशांच्या राजधान्या पाठ करून घेतल्याय. उदाहरणार्थ थायलंडची राजधानी बँ’कॉंक’ वगैरे. ह्या राजधानीचं नाव इंग्लिशमध्ये सुद्धा डबल मीनिंग वाटतं, त्याविषयी अधिक काय बोलावं. असो. रट्टा मारायला अभ्यास समजणारे अनेक महान लोक्स, मी माझ्या ह्या चक्षूने पाहिलेत.

बाय डिफॉल्ट ह्या परीक्षांमध्ये बहुतेकजण फेल होणार हे आधीच ठरलेलं असतं. म्हणजे बघा, साधारण दहा लाख परीक्षार्थी यूपीएससीचे फॉर्म भरतात, मेन्सला दहा हजाराच्या आसपास जातात, इंटरव्ह्यूला अडीच एक हजार आणि फायनल रिझल्ट येतो सातशे ते आठशे जणांचा! कारण जागाच तेवढ्या असतात, त्यातले साधारण 180 आयएएस, तितकेच आयपीएस आणि बाकीचे मग फेमलेस पोस्ट घेऊन आयुष्यभर कुढत बसतात. त्यात परत केडर सिस्टीममुळे एकदा एका राज्यात पोस्टिंग झाली, की आयुष्यभर त्याच राज्यात जॉब करावा लागतो. म्हणजे एकदा तुम्ही काश्मीर किंवा नॉर्थ-ईस्टला जॉईन झाले, तर आयुष्यभर तिथेच सर्विस करावी लागते, तिथेच राहावं लागतं. फार्फार तर शेवटी दिल्लीला मंत्रालयात सेक्रेटरी वगैरे होत येतं. MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांचं  देखील असंच गणित आहे.

दुसरी एक चिऊताईगिरी म्हणजे जी यूपीएससी आणि एमपीएससी दोन्हीने करून ठेवलीय. ती म्हणजे मोक्कार वयं वाढवली. यूपीएससीने 38 पर्यंत आणि एमपीएससीने पार 43 पर्यंत! म्हणजे पोरांनी आयुष्य ह्यातच घालावं, पण सरकारला प्रश्न विचारू नये, हा सरकारचा चुध्द्द (पक्षी: शुद्ध) हेतु. या फालतूपणामुळे पोरं वर्षानुवर्ष पोस्ट नंतरच्या जीवनाचं स्वप्नरंजन करत, आशेवर जगतात मग त्यातले 99.99% बाय डिफॉल्ट घरी जातात, किंबहुना जावंच लागतं त्यांना. असो. भरपूर मोदीअवलोकन (पक्षी: सिंहावलोकन) झालं. तर मुद्दा असा आहे की कोणत्याही अधिकाऱ्याने कितीही वृषण पाणावनार्‍या कथा सांगितल्या, क्लास वाल्यांनी कितीही स्वप्नांचा बाजार मांडला किंवा मोटिवेशनल स्पीकर वाल्यांनी कितीही ‘नेव्हर गिव्ह अप’ चे तारे तोडले, तरी उगाच मेंढरांगत पोरांनी या क्षेत्राकडे येऊन स्वतःची आणि घरच्यांची वाट लावू नये. त्यापेक्षा खाजगी क्षेत्रात नोकरी, स्वतःचा एखादा उद्योग-धंदा किंवा शेती व निगडीत क्षेत्रात कर्तृत्व गाजवावे. कला-काम-क्रीडा क्षेत्रातही चांगल्या संधी आहेतच. डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगला कंटेंट तयार करून कुठल्याही आयएएस अधिकार्‍यापेक्षा जास्त फेमस होता येतं आणि समाजावर प्रभाव टाकता येतो.

मी आत्ताच “पीटर थील’ ह्या लेखकाचं एक ‘झिरो-टू-वन” नावाचं एक पुस्तक वाचलं. त्यात लेखकाचं म्हणणं आहे की माणसाने झिरो-टू-एन काम करावं. म्हणजे माणसाने असं काम निवडावं ज्यात तुम्ही फेल जरी झाले तरी झिरो व्हायला नको. जसं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत होतं. एक तर हिरो नाहीतर डायरेक्ट झिरो. समजा तुम्ही एखादा उद्योग सुरू केला आणि त्यात तुम्ही ठरवलं, की एका वर्षात मी दहा लाख रुपये कमावणार. आणि जर तुम्ही ते टार्गेट अचिव्ह करण्यात फेल झाले आणि तुम्ही 10% टार्गेट जरी अचिव्ह केलं, तरी तुम्ही एक लाख कमावणार. म्हणजे झिरो पेक्षा चांगल्या स्थितीत राहणार. त्याच ठिकाणी तुमची पोस्ट निघाली नाही तर तुम्ही झिरो होणार.

तर मुद्दा असा आहे काहीतरी प्रॉडक्टीव क्षेत्र निवडा. उगाच भाकाळ लोकांची, भाकाळ भाषणं ऐकूण आपल्या स्वप्नांची दिशा ठरवू नका. कसं आहे, माणूस एकदा यशस्वी झाला की, त्याने काही फेकलं तरी समाज ते खरं मानतो. विस्टन चर्चिल  म्हणतातच “Nothing Succed like success” यशासारखे यश नसते! देशाला चांगल्या उद्योजकांची, कलाकारांची, तंत्रज्ञांची, शेतकऱ्यांची गरज आहे. म्हणून आपल्या आवडी-निवडी नुसार क्षेत्र निवडा. आणि आपल्या आवडीनिवडी का निर्माण झाल्या ते सुद्धा तपासून बघा. त्या खरंच आपल्या आवडी आहे की, कुठल्यातरी सामाजिक प्रेशर मुळे म्हणा किंवा स्टेटस मुळे म्हणा त्या तुमच्या आवडी झाल्या आहेत ते बघा. मी पण बघतोय. तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या जमतात, ज्या गोष्टीत आनंद देतात; अशा गोष्टी केल्या तर चांगलं यशस्वी होता येतं. उगाच लोकं इज्जत देताय म्हणून अधिकारी व्हायच्या मागे लागू नका. “लोकं आधी घोडीवर बसवतात, आणि मग घोडा लावतात”!

आयुष्य खूप छोटं आहे. त्यात आयुष्याची एवढी वर्ष एका गोष्टीच्या मागे घालवण्यात काही अर्थ नाही. उठा, जागे व्हा आणि सरकार किंवा सरकारी व्यवस्थांच्या नादी लागू नका. लोकशाही सरकार ही मुळातच एक अनप्रॉडक्टीव आणि इनइफीसीएंट सिस्टीम आहे. विल्सन नावाचा एक लोकशाही समर्थक ब्रिटिश विचारवंत सुद्धा म्हणला होता की “We accepted democracy only because, it is a relief from autocratic rule, it is not a perfect system”! तुमच्या आणि माझ्या जीवनात जे काही चांगले बदल घडत आहेत ते खाजगी क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे, त्यातल्या मुक्तपनामुळे. सरकार ही व्यवस्था मुक्त पणाला अडथळा असतो. तिचा कंट्रोल हा कमी-कमी होत गेला पाहिजे. असो. म्हणून खाजगी घुसा क्षेत्रात. पण ओल्ड-राजेंद्रनगर व पेठेतल्या आधीच माजलेल्या लोकांचे घरं भरणं बंद करा. एवढे बोलून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो !

जय साडे तीन वाजता उठणं! (झोपेतून)
जय स्वर्गीय कारण!
-Vijay Rahane #vijubaba
( vijayrahane@ymail.com )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us