कोरेगावहून आमची शासकीय गाडी पाटण च्या दिशेने निघाली. पाटण मध्ये डोंगर कडा कोसळून माणसे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली आहेत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मदत कार्याचे सहा संयोजन को-ऑर्डिनेशन करण्यासाठी तहसील कार्यालय पाटण येथे पुढील तीन दिवस तुमची नेमणूक करण्यात आली आहे असा जिल्हाधिकारी कार्यालयाचा अतितातडीचा निरोप संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्हाला मिळाला. संपूर्ण सातारा जिल्ह्यात कोरेगाव माण आणि खटाव येथे इतर तालुक्यांच्या तुलनेत मर्यादित पाऊस असल्याने आम्ही तसे निवांत होतो. सरासरी सत्तर ते ऐंशी मिलिमीटर पाऊस रोज पडत असल्याने टँकर लागणार नाही अशा आमच्या गप्पा होत होत्या. तरीदेखील तालुक्यातील डोंगरावर वसलेल्या एकमेव चवणेश्वर गावाची पाहणी मात्र आम्ही केली.

पाटणमधील पावसाच्या बातम्या ऐकत होतो वाचत होतो. दुर्गम तालुका असल्याने पावसाळ्यात कायमच अडचणींना सामोरे जाणारा पाटण तालुका ऐकून माहिती होता. कोयना धरण आणि चाफळचे प्रभू रामाचे मंदिर यापलीकडे पाटण बद्दल आम्ही अज्ञच! पण तीन दिवस राहायचे या हिशोबाने ब्यागा भरून रात्री नऊ वाजता निघालो. नेहमीच्या सवयी प्रमाणे लॅपटॉप व प्रिंटर होताच. यापूर्वी जव्हारला दीड वर्षाहून अधिक काळ काम केल्यामुळे दुर्गम भाग तसा परिचितच.! जव्हारला असताना घर पडझड काही प्रमाणात भूकंप कंपनांबाबत निवारण कामाचा अनुभव गाठी होता. पण पाटणमध्ये नक्की काय परिस्थिती आहे आणि काय काम करायचं आहे याचा अंदाज लागेना.

वाई महाबळेश्वर मधे खचलेले रस्त्यांचे फोटो रस्त्यावर पडलेल्या झाडांचे फोटो What’s app ग्रुपवर पडत होते. आमचे सर्वांचे अनुभव ऐकत प्रवास सुरु होता. आमच्या वाहनचालक मामांनी यापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांच्या गाडीवर काम केल्याने पाटण बद्दल त्यांना तशी माहिती होती. आमच्या सोबत असलेल्या तलाठी यांचे वडील यापूर्वी पाटणात तलाठी होते. भाग खुपच दुर्गम आहे आमचे वडील घरी येईपर्यंत आईला काळजी वाटायची अशा गप्पा चालू होत्या. सोबतचे मंडळ अधिकारी कोरेगावात घरपडझड झाली त्याचा फोनवरुन आढावा घेत होते. तलाठींना पंचनाम्याच्या सूचना चालू होत्या.

तीन दिवस आम्ही पाचजण विश्रामगृहात राहणं शक्य नव्हतं. पाटण गावातंच आमचे स्नेही श्री देसाई (अव्वल कारकून) आहेत. त्यांनी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर बिनधास्त राहा असा फोन स्वतःहून केला आणि रात्री 12 च्या सुमारास दुथडी भरून वाहणाऱ्या कोयनेवरचा पूल ओलांडत आम्ही पाटणमधे पोहचलो. पाऊस थांबला असला पाटणच्या माथ्यावर तरी लाखो लिटर पाणी पाणी पोटात घेऊन काळे ढग कोसळण्यासाठी तयारच होते. फक्त मेघराजा इशारा करणं बाकी होता. रात्र काळी आणि ढग त्याहून काळे! काळोख काळिमा जणू अवतरला होता. भिजट वातावरण त्यात अजून गहिरेपणा आणत होते. रात्री देसाईंनी गरमागरम- कॅाफी आणली. कॅाफी घेऊन आम्ही अंथरुणावर पाठ टेकवली. पाटणकरांच्या वाड्यातील मंदिरात वाजणाऱ्या पहाट सनई चौघड्याच्या आवाजाने जाग आली. पाटणमधे निसर्गाने घातलेले थैमान पाहण्यासाठी आणि आणि त्यानुसार पुढचं काम ठरवण्यासाठी आम्ही आन्हिके आटोपून तहसिल कार्यालय पाटण येथे सकाळी 8 वाजता पोहचलो.

तहसिल कार्यालयाच्या इमारतीची रचना तशी पारंपारिकच होती. आवारात पोलिस स्टेशन आणि दस्त नोंदणी कार्यालय होते. नामदार बाळासाहेब देसाई यांच्या स्मृतीला वाहिलेला एक मोठा हॅाल देखील आवारात होता.दूरध्वनी खणखणल्याबरोबर रात्रपाळीचे शिपाईमामा लगबगीने पुढे आले. पावसाच्या नोंदवहीत महसूली मंडळाच्या पावसाची आकडेवारी नोंदवून बाहेर गेले. पावसाच्या सरी बसत उठत का होईना चालूच होत्या. कामाला सुरुवात करायची म्हणून तालुक्याचा नकाशा मिळवला. मिरगाव, हुंबरळी, आंबेघर तर्फ मरळी आणि रिसवड ( ढोकावळे) या गावांमधे डोंगर कोसळून जिवितहानी मोठ्या स्वरूपात झाली होती. ही ठिकाणे तालुका मुख्यालयापासून किती दूर आहेत याचा नकाशावर अंदाज घेतला. कार्यालयातील कोतवाल, तलाठी यांच्याकडून रस्त्याची सद्यस्थिती कशी आहे याचा अंदाज बांधला. काही दैनिकांचे पत्रकार जिवित व वित्तहानी बाबत अधिकृत माहिती विचारत होते. त्यांचे समाधान होईल अशी उत्तरे त्यांना देण्याचा प्रयत्न चालू होता. वेगवेगळ्या सुस्थितीत असणाऱ्या शाळांमधे स्थलांतरित कुटुंबांचा ओघ वाढत होता. याठिकाणी शिजवलेलं अन्न उपलब्ध करायचं कसं., पोहवायचं कसं, यावर चर्चा सुरु होऊन योग्य ठिकाणी निरोप जायला सुरुवात झाली. शिजवलेली अन्नपाकिटे 300 च्या वर जातील याची खातरजमा झाली.सकाळी कार्यालयात येताना मनुष्यबळ आहे की नाही असा प्रश्न पडला असताना ११ वाजेपर्यंत गोदामच्या हमालांपासून ते सातारा व पुण्यामधील स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आपत्ती निवारण कारणासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात जमू लागले. गोदामाचे हमाल तर अगदी सकाळपासून बसून होते . घडलेली घटना अघटितच होती . प्रत्येक जण अगदी आंबेघर किंवा हुंबरळी येथे जाऊन दबलेल्या आपल्या बांधवांना काढू शकत नव्हता पण जिवंतपणी मृत्यूचे तांडव पाहिलेल्या आणि आपली घरंदारं सोडुन स्थलांतरित झालेल्या भाऊ-बहिणीच्या पोटात अन्नाचा कण पडावा तसेच रात्रभर पावसाचा ठणका झेललेलं आणि गारठलेलं अंग झाकावं यासाठी धडपडत होता.

मिरगाव, हुंबरळी, आंबेघर तर्फ मरळी आणि रिसवड ( ढोकावळे) या तीन ठिकाणी मातीच्या ढिगा खाली दबलेल्या गावकऱ्यांना काढण्याचे काम चालू होते . या ठिकाणी एन डी आर एफ टीम स्थानिक गावकरी तसेच इन्सिडंट कमांडर म्हणून काही महसूल अधिकारी काम कार्यरत होते. शोध आणि बचाव कार्यात अखंड चालू असणाऱ्या पावसामुळे अडथळा येत होता. या ठिकाणी आवश्यक ते साधनसामुग्री पोहोचली होती. पण सर्वात मोठे आव्हान होते ते स्थलांतरितांच्या छावण्यांच्या ठिकाणी चिल्लीपिल्ली काखोटीला मारून घरातील वयोवृद्ध नेसत्या वस्त्रानिशी सोबत घेत घरातील कर्ता स्त्री किंवा पुरुष या ठिकाणी आश्रयाला आलेले होते .प्राथमिक तयारी म्हणून या ठिकाणी किमान दोन वेळचे जेवण , स्वच्छ पाणी पुरवणे आवश्यक होते. रात्री झोपण्यासाठी अंथरून पांघरून याची तजवीज याची करणे आवश्यक होते .तहसील कार्यालयामध्ये ही सर्व सामग्री जमा करून मदत छावण्यांतील नागरिकांची संख्या नुसार त्याचे वर्गीकरण करणे आणि छावणीच्या ठिकाणी पोहोचणे हे काम अति तातडीची होते. जेवणाची तजवीज शिवभोजन केंद्रामार्फत झाली होतीच. अंथरूण-पांघरूण यासाठी पाटणमधील तसेच कराड मधील काही व्यापारी यांच्याशी संपर्क करून ऐनवेळी वेळी किती ब्लँकेट व चादरी उपलब्ध होतील याचा अंदाज घ्यायला सुरुवात झाली. मदत सामग्री येताना जर ती ठराविक पद्धतीने एकत्र होऊन पाकीट च्या स्वरूपात आली तर वाटप सुसह्य होते. म्हणून एका पाकीट मध्ये पाच जणांच्या कुटुंबासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची यादी करून स्वयंसेवी संस्थांना दिली गेली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सातारा शहरातील दानशूर व्यक्तींनी व्यवसायिकांनी अतिशय कमी कमी कालावधीत कोरड्या कोरड्या शिध्याची फुड पॅकेट्स पाठवून दिली . याबाबत आवाहन करून कोरेगाव तलाठी संघटनेने देखील अशाच प्रकारची फुड पॅकेट्स उपलब्ध करून दिली.

मदतीचा ओघ सुरू झाला हे पुस्तकात वाचलेले वाक्य आज मी आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं. आमच्या महसुली पद्धतीप्रमाणे आलेल्या सगळ्या मदतीची नोंदवही ठेवण्यात आली. नोंदीची जबाबदारी पुरवठा निरिक्षकाकडे देण्यात आली. शिबिरांमध्ये असलेल्या बाधितांच्या संख्येनुसार मदतीचे वाटप आधी एक्सेल शीट मध्ये बसवलं आणि त्यानुसार गाड्या भरून रवाना देखील व्हायला लागल्या. या मदतीमध्ये सॅनिटरी पॅड्स चा देखील समावेश होता ही बाब विशेषत्वाने जाणवली असाही विचार एखादी संस्था करू शकते ही बाब विशेषत्वाने भावली. काही ठिकाणी शिधा कमी पडला तर आमचे रेशन दुकानदार मदतीला धावतील असं पुरवठा अव्वल बोलले तेंव्हा आम्ही आश्वस्त झालो.

पहिला दिवस कसा संपला कळलंही नाही. मिरगाव, हुंबरळी, आंबेघर तर्फ मरळी आणि रिसवड ( ढोकावळे) येथून येणाऱ्या बातम्या आणि मृतांची आकडेवारी थरकाप भरवणारी होती. पुढ्यात काय वाढून ठेवलेयं याची कल्पना येत होती. एन डी आर एफ ची एक टीम घटनास्थळीच थांबणार आहे अशी बातमी कळल्यावर उद्याचा सूर्य आशेची किरणे प्रसवणार नाही अशी शंकेची पाल चुकचुकली.

जसे राणी एलिझाबेथ च्या मागे कायम तीन पावले उभ्या असणाऱ्या ड्यूक ॲफ एडिंबरा प्रमाणे महसूलमधे अधिकारांची चढण- उतरण फारच काटेकोरपणे पाळली जाते. पण आज आम्ही सर्वचजण एका वेगळ्या मनोभूमिकेमधे जावून एकमेकांशी बोलत होतो.

“ मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा “
या गदिमांच्या काव्यपंक्ती जणू आम्हाला कवटाळून त्यांच्या पोटी भरलेला अर्थ आम्हाला सांगत होत्या आमच्या अवती- भवती दाखवत होत्या.
सुयोग बेंद्रे (नायब तहसीलदार , कोरेगाव भीमा )
sybendre1717@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us