साधारण तीन वर्षांपुर्वी फेसबुक च्या माध्यमातुन ऑनलाईन पध्दतीने पुस्तकभिशीची सुरुवात करणेत आली. आपण आत्तापर्यंत पैशांची, सोन्याची भिशी ऐकली होती परंतु पुस्तकांची भिशी असं कधी ऐकलं नव्हतं. प्रत्येक वाचकाला पुस्तकं घ्यायची असतात पण सर्वसामान्य वाचकांनी कितीही ठरवलं तरी दुकानात जाऊन पुस्तकं घेणं कधी घडत नाही. याच विचारातुन पुस्तकभिशीची कल्पना सुचली आणि फेसबुक द्वारे केलेल्या आवाहनाला वाचकांचा ऊत्तम प्रतिसाद मिळाला. ज्यामध्ये आठवड्याला १०० रु जमा करुन वाचकांना त्यांच्या आवडीची पुस्तके सवलतीमध्ये देण्यात सुरुवात केली. सुरुवातीला ४० सदस्यांपासुन सुरु झालेली ही वाचनवेल आता बघता बघता १०,०००चा टप्पा पार करुन पलिकडे गेलेला आहे.

पुस्तकभिशी सोबतचं वाचनवेल प्रतिष्ठान अंतर्गत वेगवेगळे समाजोपयोगी ऊपक्रम राबवले जातात. ज्यामध्ये जे आपले सैनिक बांधव आहेत जे आपल्या घरापासुन, आपल्या माणसांपासुन दुर राहुन कोणताही विचार न करता आपल्या देशासाठी आपल्या जिवाचाही त्याग करतात अशा आपल्या जवानांकरीता त्यांना मानवंदना आणि त्यांच्या फावल्या वेळत त्यांचा सोबती म्हणुन वाचनवेल पुस्तकभिशी अंतर्गत ५०% सवलतीमध्ये पुस्तके दिली जातात.

त्यासोबत वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी या विचाराने वाचनवेल प्रतिष्ठान अंतर्गत गावोगावी वाचनालय ऊभी केली जातात. ज्यामधुन होतकरु विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसंदर्भाची पुस्तके ऊपलब्ध करुन देणे, लहानग्यांपासुन ज्येष्ठांपर्यंत त्यांच्या आवडीनुसार वाचनालयामध्ये पुस्तके ऊपलब्ध करुन दिली जातात, जेणेकरुन प्रत्येक वयोगटातील वाचकाला याचा लाभ घेता येतो.

दरवर्षी सर्व सदस्यांकरीता स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये सर्व नवोदित कवी आणि लेखकांसाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते. या स्नेहसंमेलनामध्ये दरवर्षी ऊत्तम लेखक, ऊत्तम पुस्तक या संदर्भात पुरस्कार दिले जातात.

दर महीन्याला ई-मासिक प्रकाशित केले जाते ज्यामध्ये सदस्यांचे लेख, कविता आणि राबवलेल्या ऊपक्रमांची माहीती दिली जाते. त्यासोबत ‘पुस्तक,लेखक आणि गप्पा’ या सदराखाली नवोदीत लेखकांच्या मुलाखती घेतल्या जातात. ज्यामध्ये वाचकही लेखकांना आपल्या मनातील प्रश्न विचारु शकतात.

काही विशेष दिवसांमध्ये जसे महीला दिन किंवा जागतिक पुस्तक दिनी अशा विशेष दिवसांमध्ये लेखना संदर्भात स्पर्धा घेतल्या जातात आणि विजेत्यांना बक्षिसरुपात भेट म्हणुन पुस्तके पाठवली जातात.

असं म्हणतात कि वाचनाने समाज समृध्द होतो आणि विचारांनी समृध्द झालेला समाज कोणत्याही समस्येला किंवा नकारात्मक विचारसरणीला छेद देऊ शकतो, म्हणुनच वाचनवेल प्रतिष्ठान आपल्या परीने याकरीता काम करीत आहे.

रुपाली सोनावणे,
संस्थापिका, वाचनवेल प्रतिष्ठान.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us