(freelance writer, blogger, poet)

आपण अनेक गोष्टी लिहीत राहू ,वेदना मांडू ,दुःख व्यक्त करू , हळहळ व्यक्त करू , लिहितांना आणि आपले दोन चार विचार मांडतांना आपणही चार सल्ले आणि जीवनाचे धडे देऊ. पण #आत्महत्या करणाऱ्या तिथपर्यंत जाणाऱ्याच्या मनाची घालमेल आणि तिथपर्यंत जात असणाऱ्या मनाची व्यथा आपण नाहीच समजू शकत , ती मनस्थिती समजणे इतके सोपेही नाही. नाही … नाहीच हे इतके सोपे…आणि त्याबद्दल बोलणेही.

‘आत्महत्या ‘ कितीही घाव घालणारी गोष्ट असली तरी त्यावेळी ती व्यक्ती ज्या विचारांच्या जाळ्यात गुरफटलेले असते ते आपण नाहीच समजू शकत. म्हणून कदाचित आपण कोणालाही ‘Judge’ करून मोकळे होतो. पण कधी आपण विचार केला आहे का की रोजच्या जीवनात अश्या किती मनावर आपण आघात पोहचवत असतो. साधे चार जास्त msgs आणि 3/4 जास्तीचे कॉल आले तरी आपण समोरच्या व्यक्तीला ‘ Immature ‘ असल्याचा शिक्का देतो. कधी कोणी मैत्रीण मित्र एकच गोष्ट सारखी बोलली तरी आपण बोलून जातो की ‘ लहान आहेस का ? ‘सुरुवात इथूनच होत असते. मग त्या व्यक्तीलाही आपणही negative phase मध्ये नेत असतो.

जगातील आत्महत्याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि त्यागचे संशोधनही. अजूनही लोक आत्महत्या का करतात याचे ठाम उत्तर विज्ञानाला समजू शकले नाही , त्याबद्दल अनेक संशोधन सुरू आहे. त्यामागची अनेक कारणे , लोकांशी हरण्याची मनस्थिती , जगण्याची इचहा नसण्याचे अनेक कारणे समोर येतात. अनेक लोकांना मरायचे नसते पण डिप्रेशनच्या भयानक स्थितीतून ते जात असतात , हे देखील तितकेच महत्वाचे. डिप्रेशनमुळे मानसिक खच्चीकरण होत असते परंतु अनेक जण ते कोणाशीही बोलायला घाबरतात. लोकांना काय वाटेन , मित्र – मैत्रिणींना काय वाटेन , नातेवाईकांना काय वाटेन ह्या जाळ्यात अजून जास्त माणूस अडकत जातो.

ज्याप्रमाणे आपल्या शरीराला इजा झाली की आपण त्यावर त्वरित उपचार करतो तसेच मनावरही इजा , हानी होत असते. त्यावरही योग्य ते उपाय योग्य त्यावेळी करण्याची गरज असते. परंतु , आपण तर शरीराने एकदम चांगले दिसतोय मग हे लोकांसमोर सांगितले तर कोणाला विश्वास बसणार नाही , त्याची खिल्ली उडवली जाईल या भीतीने अशी व्यक्ति आतमध्येच स्वत:ला त्रास करून घ्यायला लागते. इतरांसामोर हसत , खेळत राहूनही अशी व्यक्ति डिप्रेशनच्या भयावह अवस्थेतून जात असते याची कल्पनादेखील आपल्याला नसते. म्हणून कोणाच्याही परिस्थिती आणि मनस्थितील आपण एखाद्या साच्यात बांधू शकत नाही. त्या त्या वेळी लोकांना समजून घेणेही तितकेच योग्य असते.

मी म्हणेल कोणी आयुष्याचे प्रॉब्लेम्स सांगायला आले तर घ्या ऐकून. भले नसेल समजून घेता येत तर निदान दोन शब्द बोलून समोरच्याला ही मोकळे होऊ द्या. एखाद्याची मनस्थिती समजून घेणे आणि त्यावर बोलणे सोपे नसतेच , आपण प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या नकारात्मक वेळेत अडकतो पण त्यातून बाहेर येणे म्हणजे प्रत्येकवेळी दुसऱ्याशी बोलणे असेही नसते.

कुठेतरी स्वतःलाही ह्या नैराश्याच्या दुनियेत खंबीर ठेवणे गरजेचे आहे. आपल्या वागण्यावर आपल्या विचारांचा प्रचंड प्रभाव पडत असतो. आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणातही स्वत:वर विश्वास ठेवून आपण आपले कार्य , ध्येय साध्य केले पाहिजे. समोरची व्यक्ति आपल्याबद्दल कशी आणि काय विचार करते ह्या जाळ्यात स्वत:ला अडकू न देता आपण आपल्याशी किती प्रामाणिक आहोत याकडे लक्ष्य दिले पाहिजे.

आपल्या लोकांशी सोबत महत्वाची असतेच पण कधी कधी आपल्याच लोकांकडून अपेक्षाभंग होऊ शकतो त्यामुळे अपेक्षा करूच नये आणि केल्या तरी त्या पूर्ण झाल्या नाही तर त्याचा खूप जास्त त्रास होऊ देऊ नये ही खूणगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे. आपल्या भावनांवर इतरांपेक्षा स्वत:चा हक्क अधिक असतो त्यामुळे त्याची जबाबदारी देखील आपली आहे.

सगळ्यांच्या आयुष्यात चढउतार येत असतात , दुख: , वेदना , यातना यापासून कोणीही वाचू शकले नाही पण त्याहून सावरण्याचे बळ आपल्यालाच आणावे लागते. इतरांचा आधार घ्यावा पण कुबड्या घेऊन जगायची नाही एवढे खंबीर आपण स्वत:ला केल पाहिजे.

ज्यांना सोबतीची गरज आहे त्यांना साथ द्या , सोबत रहा.
शेवटी आपल्याला त्या ओळी माहीतच आहे ,“ हीच अमुचि प्रार्थना अन हेच अमुचे मागणे ,माणसाने माणसाची माणसासम वागणे”आपल्या लोकांची सोबत हवीच पण दुसऱ्यांपेक्षा स्वतःच्या गुणांच्या आणि सकारात्मक विचारांच्या सोबत असणे जास्त गरजेचे आहे कारण शेवटी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
– © प्रियंका अशोक सरवार
priyasarwar@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us