(freelance writer , poet )

मी लेस्बियन आहे. हे सांगतांना मला लाज किंवा संकोच वाटत नाही, कारण मी काहीही वाईट वागत नाहीये. समाजाच्या मते, स्वतःचा स्वीकार करणं चुकीचं असेल, तर मी ही चूक करायला तयार आहे.” सोसायटीत राहणारी सोळा वर्षांची मुलगी तिच्या मित्र-मैत्रिणींसमोर स्वतःच्या लैंगिकतेचा मोकळेपणाने स्वीकार करत होती. घरचे काय म्हणतील? समाज काय म्हणेल? या सगळ्या प्रश्नांच्या आधी या पौगंडावस्थेतील मुलीला आपण कोण आहोत हे स्वत: स्वीकारणं गरजेचं वाटत होतं.

याहून पुढे जात समलिंगी असणं म्हणजे वाईट, काहीतरी वेगळे आहे असे मनात येऊ न देता तिने ‘मला मुलांऐवजी मुलींबद्दल आकर्षण वाटतं,’ असे सांगत या भावनेचा सहजतेने स्वीकार केला होता. तिचे मित्र-मैत्रिणी त्यांच्याच भाषेत सांगायचे, तर तिच्या समलिंगी असण्याबाबत ‘कूल’ होते. यात काही वावगं नाही, ही समज त्यांच्यात होती. सोळा, सतरा, अठरा वर्षांच्या मुलांचा ग्रुप आपल्या बरोबरीची मुलगी लेस्बियन आहे, हे ऐकून त्यावर कोणत्याही प्रकारचे विनोद, पांचट शेरेबाजी न करता तिचं समाजाच्या नजरेतलं ‘तसं’ असणं फार सहजपणे मान्य करत होता. यावरुन जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन पिढीच्या जगण्याचा परिघ मोठा आहे, व्यापक आहे. समाजाच्या चाकोरीबाहेरचे विचार ऐकतांना, त्यांना सामावून घेताना या पिढीला फार श्रम पडत नाहीत. ‘एलजीबीटीक्यू’ असणे म्हणजे इथल्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेचे अधःपतन करणे, असा चष्मा लावलेला मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. यांच्या मते समलिंगी असणे हा आजार आहे. अशा मानसिक गुलामगिरीत जगणाऱ्या व्यक्ती समोरच्याला बायल्या, छक्क्या अशा शब्दांनी हिणवायला पुढे असतात. प्रसंगी शारीरिक मारहाण करायला कमी करत नाहीत. पण या सगळ्यात आशेचा किरण म्हणजे समलिंगी समाज आता स्वतःहून स्वत:साठी उभा राहतो आहे. यात या नव्या पिढीचा टक्का अधिक आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता, स्वतःची लैंगिकता खुलेपणाने स्वीकारली जात आहे.

वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत आता एलजीबीटीक्यू समाजाचे चित्रण मोठ्या पडद्यावरही होऊ लागले आहे. अनेक समाजमाध्यमांवर एलजीबीटीक्यू असणाऱ्यांच्या संघर्षाच्या, स्वीकाराच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ अशा समलिंगी संबंधांवर आधारीत चित्रपटांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मेड इन हेवन’ सारखी वेबमालिका अथवा ‘लव्ह सायमन’ सारखा चित्रपट लोकप्रिय होतो. यातून नक्कीच समाजातील एलजीबीटीक्यू समुदायाला वेगळं मानण्याची वृत्ती कमी होतांना दिसते.

गेल्या काही वर्षांपासून गे, लेस्बियन उभयलिंगी असणं हे बॉलिवूड, फॅशनसारख्या झगमगाटी दुनियेत मोकळेपणाने स्वीकारले जायचे. ते धाडस किंवा तो मोकळेपणा आपल्या दुनियेत मात्र नव्हता. आता मात्र आपला मित्र कॉलेजच्या फॉर्मवर स्त्री, पुरुष सोडून ट्रान्सजेंडरचा पर्याय नोंदवतो तेव्हा तो चर्चेचा विषय आहे असे मुलांना वाटत नाही. आजचे एलजीबीटीक्यू तरुण स्वतःला न लपवता त्यांच्या लैंगिकतेविषयी व्यक्त होतं आहेत. मुख्य म्हणजे मुलीही हे धाडस करीत आहेत. यामुळे नक्कीच त्यांचा सामाजिक स्वीकार करण्याचे वारे वाहू लागले आहेत. एलजीबीटीक्यू वर्गाबद्दल तरुणांमध्ये सकारात्मक चित्र पाहायला मिळत असले, तरी या वर्गातील व्यक्तींच्या घरच्यांना समजावणे, त्यांना आपल्या घरातील सदस्याचे वेगळेपण स्वीकारणे आजही बऱ्याच ठिकाणी जड जाते. मात्र घरातल्यांच्या समाधानासाठी आपल्या लैंगिकतेचा निषेध करण्याचा मार्गही आता निवडला जात नाही.

जळगावचा २८ वर्षीय गे असणारा मानस ज्यावेळी स्वतःच्या लैंगिकतेबद्दल व्यक्त झाला, त्यावेळी घरच्यांचे जग कोलमडून पडले होते. पण मित्रांच्या पाठिंब्याने त्याने स्वतःसाठी ठाम भूमिका घेतली आणि घरच्यांचा विरोध पत्करून त्याच्या जोडीदाराबरोबर पुण्याला स्थायिक झाला. मानस आपली भूमिका आग्रही किंवा आक्रमकपणे न मांडता प्रेमाने, समजावणीच्या स्वरात सतत मांडत राहिला. त्यानंतर तीन वर्षांनी त्याच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाची लैंगिकता ही त्याची खासगी, सर्वस्वी वैयक्तिक बाब आहे हे स्वीकारले. असे कितीतरी मानस आज त्यांच्या घरच्यांसमोर स्वतःच्या नैसर्गिक हक्कांसाठी उभे राहत आहेत. यातूनच अनेक बुजरे मानस प्रेरणा घेऊन स्वतःला न लपवता स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार करीत आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण येनकेन प्रकारे वेगळा आहे. कोणाच्या त्वचेचा रंग इतरांपेक्षा अधिक गडद आहे म्हणून आपल्यालेखी तो काळा आहे. कोणी शरीराने जाड आहे, उंचीने बुटका आहे, गणित येत नाही म्हणून मठ्ठ आहे, स्पष्ट बोलू शकत नाही म्हणून बोबडा आहे, इंग्रजी बोलता येत नाही म्हणून गावंढळ आहे, टेक्नोसॅव्ही नाही म्हणून अडाणी आहे. असे अनेक शिक्के आपण रोज कित्येकांवर बिनदिक्कतपणे मारत असतो.

आपण अनेकदा असे स्वत: बद्दलचे न्यूनगंड जोपासत, वाढवत असतो आणि त्यालाच बळी पडतो. त्यामागे कधी सामाजिक स्वीकारची असुरक्षितता असते, तर कधी बाकीच्यांसारखे आपले जग परफेक्ट नाही याची भीती असते. मात्र जोपर्यंत हा तथाकथित वेगळेपणा नैसर्गिक असल्याचे मान्य करत नाही तोपर्यंत आपल्या माणूसपणाला न्याय मिळणार नाही. आपल्या आजूबाजूला असलेली नवीन पिढी अनेक पातळ्यांवर बदलणारे वास्तव जगते आहे, स्वीकारते आहे. आपली स्वतंत्र ओळख रुजवण्याचा प्रयत्न करते आहे. त्यांचा आदर्श घेत नियमांमध्ये न बसणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा कोणतेही शिक्के न मारता स्वीकार करता यायला हवा. समाज म्हणून जगताना अशा वेगळ्या वाटांच्या शक्यता असू शकतात हे लक्षात घेतले, तर नक्कीच एक अशी सुरक्षित जागा तयार होईल जिथे प्रत्येकजण तो ‘जसा आहे तसा’ स्वीकारला जाईल.

ओशो रजनीश म्हणतात, ‘जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता, ती गोष्टच तुम्हाला दुसऱ्याचा स्वीकार करण्यासाठी योग्य बनवत असते. तुम्ही स्वतःसोबत दुसऱ्यांना स्वीकारायला शिकता.’ याच तत्वाने एलजीबीटीक्यू समुदायाने स्वतःच्या असण्याची लाज न बाळगता खुलेपणाने पुढे येणे गरजेचे आहे. लोक काय म्हणतील, याला फाटा देत त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाचा केलेला स्वीकार समाजामान्य होण्याची पहिली पायरी ठरणार आहे.

-प्राजक्ता नागपुरे

praj1511@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us