(शिक्षिका , कवयित्री , लेखिका)

आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेचे संदर्भ लावत बसू नये नि प्रत्येक अनूभवाचे अन्वयार्थही शोधत बसू नयेत.येऊ द्यावं येणाऱ्या पावसाला , वाहू द्यावं वाऱ्याच्या झोताला, घालू द्यावं आच्छादन अंधाराला ,उगऊ द्यावं पहाटेच्या सूर्य बिंबाला. हे सारं घडतच असतं, घडणारच असतं .आपल्या मनोरथांचे मनोरे आभाळाला भिडतातच असे नाही . कोसळू द्यावेत ते पत्त्यांच्या बंगल्यासारखे, ते दृश्यही मनोहर असते. माणसांचं आतल्या आत कोसळणं घडतच असतं निरंतर .

जमीर चित्रपटातील किशोरदांच्या गाण्यात या ओळी आहेत ,”तेरे गिरनेमे भी तेरी हार नही के तू आदमी है, अवतार नहीं” एका ठराविक उंचीचा गौरीशंकर गाठला की मग उतार सुरू होतोच. कोसळावं…. पुन्हा उसळावं. झुली काढून टाकता याव्यात वेळीच . नाहीतरी नक्षीदार महिरपीतली बिलोरी काच रुतत राहते वस्त्राआड. ऐकत पडावं एखादं आर्त, गहिरं गाणं. उलगडत जावेत त्याचे शब्द आणि शब्दांत न मावलेले संदर्भही. वाहू द्यावेत डोळयांचे डोह अगदी विनाकारणच. रिते रिते होइपर्यंत .

आनंद आणि दुःखाच्याही पार आपल्यातील सूप्त,निद्रिस्त बुध्दाची चाहूल लागेपर्यंत. दाखवता येणारी दु:खे तर भरपूर असतात. पण न सांगता येणारीही एखादी सल असावीच काळजात. तरीही वाहत रहावं नदीसारखं. अडथळयाला वळसा घालत, व्रतस्थपणे.. तटस्थपणेही.. तोडलेल्या झाडाला फुटलेली तांबूस पोपटी पालवी पाहिलीय कधी? नेहमीच बघतो. अबोल आहे निसर्ग . वाणीने नाही शिकवत तो कृतीतून शिकवतो. त्याला बोलता आलं असतं तर ? मग काय म्हणालं असतं अंकुर फुटण्याआधी मातीखाली गाडलं गेलेलं बीज ? कदाचित बोलून दाखवली असती त्याने आपली घुसमट.. उगवून येण्याचं स्वप्नं. जन्मसोहळ्याचे कौतुक. केल्या असत्या वाऱ्याबरोबर गुजगोष्टी .

पावसाच्या सरीसोबत झिम्मा खेळत, सुर्यकिरणांचे हात हाती घेत म्हणालं असतं एखादं बडबडगीत, पाखरांसोबत. कुणी तोडली असती पानंफुलं तर भांडलं असतं . कुणी आलंच असतं कुऱ्हाड घेऊन त्याच्या जीवावर उठायला तर चार हातही केले असते. का धारण केल असावं झाडांनी मौन ? की तीही मूक झाली असावीत एखाद्या अंतस्थ वेदनेने? कुणी संवर्धन करा वा कुणी विध्वंस काही बोलत नाहीत ती.. तरीही सुंदर असते झाडावरून गळणाऱ्या पानाची थरथर . येऊ घालणाऱ्या चैत्रपालवीच्या हिरव्या स्व्प्नांचे पंख असावेत त्याला. सुंदर दिसते विझू पाहणाऱ्या दिव्याच्या वातीची फडफड. इवल्याशा तेजाने तिमिरावर केलेली मात असते ती. विलोभनीय असते अस्ताला जाणा-या सुर्याची सोनकेशरी आभा .अंत नेहमीच दुःखद नसतो. ती असते एका नव्या पर्वाची सुरवात.

जयश्री वाघ
waghjaya81@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us