( शिक्षिका , कवयित्री , लेखिका )
ख्रिस्तपूर्व तेराव्या शतकात ट्रॉय हे सर्वच दृष्टया भरभराटीला आलेलं एक संपन्न राज्य होतं. जन्मजात दैवी सौंदर्याची देणगी लाभलेला ‘पॅरिस’ हा तिथला राजपुत्र. त्याचं मन जडलं ते पश्चिमेकडच्या ग्रीक साम्राज्यातील स्पार्टाचा राजा मेनेलॉस याची पत्नी हेलनवर. हेलन म्हणजे त्याकाळची त्रिभुवन सुंदरीच जणू! अनेक देशांतील राजांना तिचा मोह झाला होता. पूर्व – पश्चिमेच्या राज्यांतील शांतता कराराची बोलणी करण्यासाठी पॅरिस आपला भाऊ हेक्टरसोबत स्पार्टा येथे गेला असताना त्यांच्यात हे प्रेम उमललं. हेलनला पॅरिसने ट्रॉयमध्ये पळवून आणलं. पॅरिसची ही चूक ट्रॉय साम्राज्याच्या विनाशाला कारणीभूत ठरली. हेलनचा नवरा फार भडकला. आपल्या स्त्रीने असं सोडून जाणं त्याला फार अपमानास्पद वाटलं.
ग्रीसमध्ये त्याच्या स्पार्टन राज्याला अत्यंत खास दर्जा होता कारण ग्रीसमधील सर्वात बलाढ्य राजा ऍग्मेनॉन याचा तो भाऊ होता. ऍग्मेनॉन हा देखील ट्रॉयचा कब्जा मिळवण्याचे मनसुबे रचत होता. त्यात त्याला वहिनीचं निमित्त सापडलं. ग्रीसमधील शक्तिशाली योद्धयांसह सुमारे हजारभर जहाजं आणि पन्नास हजारहून अधिक सैन्य घेऊन तो भूमध्य समुद्रामार्गे ट्रॉयच्या किनाऱ्यावर उतरला. यावेळी त्याच्या सोबत होता ‘अकिलीस’.
अकिलीसला त्याकाळी जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा मानलं जात होतं. तो प्रत्यक्ष त्याच्या राजाला देखील घाबरत नसे. अशी दंतकथा प्रचलित होती की एका आकाशवाणीनुसार त्याची आई थेटीस आणि वडील पेलिअस यांनी अकिलीसला स्टिक्स नदीत बुडवून काढलं, त्यामुळे त्याचं शरीर वज्रासारखं अभेद्य झालं. (महाभारतातल्या कर्णाची इथे आठवण आल्याशिवाय रहात नाही.) पण मूल पाण्यात बुडवताना त्याचा पाय आईच्या हातात असल्याने तो भाग कोरडाच राहिला. त्यामुळे अकिलीसच्या पायाची घोट्याजवळची जागा अभेद्य होऊ शकली नाही. ट्रॉयच्या युद्धाच्या शेवटी याच जागी विषारी बाण लागून त्याचा घात झाला. सुमारे दहा वर्ष ट्रॉयचं युद्ध सुरू होतं. या काळात ग्रीकांचं प्रचंड सैन्य मारलं गेलं. प्लेगसारखा साथीचा भयंकर आजार देखील या सैन्यावर आघात करून गेला. पण ट्रॉयचा पाडाव काही होत नव्हता आणि ऍग्मेनॉनदेखील मागे हटायचं नाव घेत नव्हता. अर्थातच हे युद्ध केवळ एका स्त्रीसाठी चाललेलं युद्ध नव्हतं.
राजा ऍग्मेनॉन हा सत्ताकांक्षी राजा होता. ट्रॉयचा राजा प्रियाम याची गादी त्याला काहीही करून मिळवायची होती. या युद्धात ट्रॉयचा धैर्यशील, गुणवान राजपुत्र हेक्टर हा अतिशय निकराने लढला, पण शेवटी तो धारातीर्थी पडला. ट्रॉयचा भुईकोट किल्ला अभेद्य होता. या युद्धापर्यंत कोणत्याही आक्रमणकर्त्यांना किल्ल्याची तटबंदी ओलांडून आत जाता आलं नव्हतं. युद्धविरामाच्या काळात ट्रोजन्सना भेटवस्तू पाठवण्याच्या निमित्ताने ग्रीकांनी एक मोठा लाकडी घोडा पाठवला. त्या जगप्रसिद्ध ‘ट्रॉयच्या घोड्यातून’ काही ग्रीक योद्धे किल्ल्यात घुसले आणि त्यांनी ट्रॉय ताब्यात घेतलं. यावेळी नगराची प्रचंड हानी करण्यात आली. तिथल्या वास्तू, प्रासादांची जाळपोळ केली गेली, मौल्यवान वस्तूंच्या लूटमारीसह तिथली प्रसिद्ध शिल्पं, बागा – उद्याने यांची नासधूस करण्यात आली. या इतिहासप्रसिद्ध युद्धात वैभवशाली ट्रॉय साम्राज्य बेचिराख झालं. महान कवी होमरच्या ‘इलियड’ या प्रसिद्ध महाकाव्याचा अकिलीस हा प्रमुख नायक आणि ट्रॉयचं युद्ध ही त्याची सूत्रकथा. या कथेवर आधारित ‘Troy’ नावाचा सिनेमा 2004 साली आलेला आहे.
या सिनेमातलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ब्रॅड पिट या प्रतिभावंत अभिनेत्याने साकारलेला योद्धा अकिलीस! केवढं जीव ओतून काम केलं आहे ब्रॅडने या भूमिकेसाठी! त्याची आई थेटिसच्या भूमिकेत ज्युली ख्रिस्टी एका सीनमध्ये दिसली आहे. Diane Krugar ने केलेली हेलन काय आकर्षक दिसली आहे यात! मला मात्र खास आवडला तो वृद्ध राजा प्रियामच्या भूमिकेतला पीटर ओ’टूली यांनी केलेला अभिनय. राजपुत्र हेक्टर आणि अकिलीस द्वंद्वयुद्धासाठी आमनेसामने येतात त्या वेळी हेक्टर म्हणतो, “आपण एक करार करूया. विजेता योद्धा पराजिताचे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करेल.” पण त्यावर अकिलीस उत्तरतो, ” सिंह आणि योद्ध्यांसाठी कोणतेही करार नसतात.” हेक्टर पडतो तेव्हा त्याचा मृतदेह अकिलीस आपल्या रथाला बांधून शिबिराकडे घेऊन जातो. त्या रात्री थरथरत्या देहाचा वृद्ध प्रियाम अकिलीसच्या शिबिरात आपल्या मुलाचा मृतदेह मागण्यास येतो. शूर योध्याला साजेसे अंत्यसंस्कार त्याच्यावर व्हावेत अशी प्रियामची इच्छा असते. त्यावेळचे अकिलीस आणि प्रियाम यांच्यात झालेले संवाद आणि त्यांचा अभिनय खरोखरच लक्षात राहण्यासारखे आहेत. वूल्फगॅंग पीटर्सन यांच्या दिग्दर्शनाखाली निर्माण झालेला हा भव्य ऍक्शनपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.
– मनीषा उगले
ugalemm@gmail.com